आला क्षण गेला क्षण
परवाच एका मैत्रिणीकडे तिच्या वाढदिवसानिमित्त जमलो होतो. खूप दिवसांनी असे एकत्र भेटण्याचा प्रसंग आला, आणि त्यातही सगळ्या जुन्या मैत्रिणी.. संध्याकाळी ७ वाजताची वेळ ठरलेली. सगळे जमले, पण मीराचा काही पत्ता नाही. "अगं, ती येणार Indian Time प्रमाणे", मंजू म्हणाली.
"हो ना, कध्धीच वेळेवर पोचणार नाही ही, माहितेय ना आपल्याला", इति वर्षा.
शेवटी ८ वाजता मीरा आली. तोपर्यंत पार्टी अर्धी होऊन गेली होती. सगळ्यांनाच हळहळ वाटली. पण आश्चर्य म्हणजे, लहानपणापासूनची मीराची सवय अजून तशीच होती. तिच्या आयुष्यातील काही आनंदाचे क्षण तिने गमावले होते.
बरेचदा आपल्या या उशिरा येण्याच्या सवयीचा दुसर्यांना जास्त त्रास होतो. माझ्या घरासमोर एक शाळेची बस येते. ती येण्याच्या ५ ते १० मिनिटे आधीपासून मुले वाट बघत असतात. प्रभात फेरी करता करता, मी त्या सगळ्यांचे निरीक्षण करत असते. त्यात एक मुलगा रोज न चुकता उशीर करतो. कधी कधी तर बसवाला जोराने हाॅर्न वाजवतो. तरी ही स्वारी हालतडुलत येणार. त्याचे कारण काहीही असो, मला उगाचच हे दृष्य खटकते. कधी कधी तर बस थोडा वेळ थांबून निघून जाते, मग आई निघणार झाशीच्या राणी सारखी स्कूटर घेउन. शाळा गाठायची म्हणून एकदम वेगात. ते बघून तर आणखीनच काळजी वाटते. यांना वेळेचे महत्त्व कसे समजवायचे?
असेच प्रसंग आयुष्यात घडत असतात, अशा बेफिकीर व्यक्ती भेटत असतात. आपण दिलेली वेळ न पाळल्याने दुसऱ्यांना काही त्रास होऊ शकतो, हे यांच्या गावीच नसते.
आयुष्याची उणीपुरी तीस वर्षे अध्यापन क्षेत्रात घालवली. खूप वेगवेगळे अनुभव आले. सकाळच्या ९ वाजताच्या तासाला काही ठराविक मुले नियमितपणे १० वाजेपर्यंत येत राहत. भरपूर कारणे असत, त्यांच्याकडे. ती खरी नाहीत हे कळायला कुठल्या डिग्रीची गरज नव्हती. पण अगदी अलिकडे तर, "मी झोपूनच उठलो नाही", असे सांगणारे सुद्धा भेटले. हे महाभाग परीक्षेला सुद्धा वेळेवर पोचत नसत. या मंडळींच्या मेंदूचे परीक्षण करायला हवे असे मला उगाच वाटायचे. कारण कुणी वेळ पाळत नाहीये बघितलं की माझ्या जीवाची घालमेल होत असे. पण यातही लक्षात राहिला सुरेंद्र, तो भिवंडीत राहून, ३० कि.मी. प्रवास करून वर्गात सर्वात आधी पोचलेला असे. त्याच्या वर्गातही दादरहून १० मिनीटांच्या अंतरावरून येणारे लेट लतीफ होतेच..
आम्हीही विद्यार्थी होतोच की..त्या वेळी एकदा शिक्षक वर्गात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रवेश करणे, उचित नव्हते. मला आठवतंय आम्हाला "Network Theory" हा विषय शिकवायला राणे सर होते. खूप सुंदर शिकवायचे. त्यांचा तास सकाळी ९ वाजता असायचा. त्यांना विद्यार्थ्यांनी उशीरा वर्गात आलेले अजिबात आवडत नसे. त्यांची शिस्त अंगवळणी पडेपर्यंत सुरुवातीला एकदोनदा सरांनी शिकवणे सुरू केल्यानंतर काही मुलांनी वर्गात शिरायचा प्रयत्न केला. त्यावर "Is it a cinema theater?" असा प्रश्न ते विचारत. मुले त्यावर निरूत्तर होत, व शांतपणे निघून जात. इथे मुलांनी शिकण्यापासून वंचित रहावे, हा उद्देश नव्हता, तर त्यांना शिस्त लागावी हा हेतू होता. एकदा काही सेकंद उशीर झाल्यामुळे मला २ तास बाहेर काॅमन रूम मधे बसून काढावे लागले, त्याचे दुःख मलाच माहित. पण त्यानंतर आजतागायत मी अगदी कसोशीने दिलेली वेळ पाळण्याचा आटोकाट प्रयत्न करते. सरांच्या वर्गातील किती लोक पुढे जाऊन इतरांच्या वेळेचा सन्मान करायला शिकले माहित नाही, पण त्यांच्या वर्गात मुले उशीरा कधी आली नाहीत. तेवढी संवेदनशीलता नक्कीच त्यांच्यात होती.
दिलेली वेळ पाळणे हा मोठा गुण आहे, पण दुर्दैव असे, की शाळेच्या प्रार्थनेत उशीरा येऊन शिक्षकांचा डोळा चुकवून उभी राहणारी मुलगी नायिका ठरते. ती रोज वेळेवर शाळेत जाते, असे आपण का नाही दाखवत? सिनेमाच्या पडद्यावर दाखविण्यात येणार्या सगळ्याच प्रतिमा अनुकरणीय नसतात. अनुकरण कशाचे आणि कुणाचे करायचे हे आपले आपण ठरवायचे असते..
कुणाला दिलेली वेळ जर तुम्हाला पाळता आली तर, तुम्ही त्या व्यक्तीच्या नाही तर स्वतःच्या वेळेचाही सन्मान करताय. आयुष्यात येणार्या प्रत्येक क्षणाचा उपभोग घेताय.. गुलजार त्यांच्या कवितेत सांगतात, "आनेवाला पल, जानेवाला है, हो सके तो इसमे, जिंदगी बिता दो, पल जो ये जानेवाला है।" शाळेत असताना आम्ही एक कविता शिकलो होतो, "आला क्षण, गेला क्षण" या कवितेत घड्याळाचे काटे पुढे सरकत असतात, आणि आयुष्यातील सर्व महत्त्वाच्या टप्प्यांचे साक्षीदार असतात. घड्याळ एका जागी असते पण वेळ कुणासाठी थांबत नाही, हा या कवितेचा अर्थ आहे..
त्या कवितेच्या शेवटाच्या ओळी फारच सुंदर आहेत,
वार्धक्य जर सौख्यात जावया
व्हावे, पश्चात्ताप नुरुनिया,
तर तरुणा रे! मला वाटते,
ध्यानी सतत अपुल्या आण
घडय़ाळ जे हे अविरत वदते-
‘आला क्षण-गेला क्षण’
©️ अंजली देशपांडे