देव...
परवा कोणीतरी सहज म्हणाले , ज्यांचा देवावर विश्वास नाही, जे पूजा-अर्चा करत नाहीत त्यांच्या आयुष्यातले प्रश्न सुटत नाहीत, संकटे येतात सगळ्यांवर, पण पूजाअर्चा करणाऱ्यांचे प्रश्न फार मोठे नसतात, त्यांच्यावरची संकटे पटकन दूर होतात. वगैरे वगैरे .....

देव मानणाऱ्यांना यात काहीच वावगे वाटणार नाही.
देव न मानणारे म्हणतील काहीही पुरावे , संशोधन नसताना असे निष्कर्ष काढणे चुकीचेच नाही का?
आपण स्वतः आस्तिक आहोत की नास्तिक याचा विचार करताना मला ना धड आस्तिक असल्यासारखं वाटतं ना नास्तिक असल्यासारखं...माझ्यासारखे अनेक असतील खरंतर, आपण नेमके कोणत्या गटात मोडतो हेच न कळणारे!
त्या सगळ्यांच्या भावना प्रातिनिधिक स्वरूपात मांडण्याचा हा प्रयत्न...
तुम्हाला वाटतं का देव आहे, तर तुम्ही तो मानावा.
तुम्हाला वाटतं तो मूर्तीत आहे, तर तुम्ही पूजा करा, होम हवन करा,
तुम्हाला त्यात परमानंद आणि परमसुख लाभो!
तुम्हाला देव नाही असे वाटते का?
तुम्ही पूजा-अर्चा काहीच करत नाही का?
ठीक आहे, तुमची मर्जी...
ज्याला त्या श्रद्धेतून संकटे तरुन जायची ताकद मिळते त्याने ती जरूर मिळवावी.
देव आहे की नाही, तो कसा आहे यावर प्राचीन काळापासून अनेक कल्पना मांडल्या गेल्या, सिद्धांत मांडले गेले.
वेद काळात निसर्गाच्या विविध रूपांना देव मानलं गेलं, कोणी कर्म महत्वाचं मानलं, कोणी सगुण रुप, कोणी निर्गुण निराकार तत्व मानलं, कोणी नाम संकीर्तन महत्वाचं मानलं तर कोणी 'यावज्जीवेत् सुखं जीवेत् । ऋणं कृत्वा घृतं पिबेत् ।।' असा जीव आहे तो पर्यंत ऋण काढून आंनद उपभोगावा या चार्वाकाच्या चंगळवादाचा स्वीकार केला.
या सगळ्यात एकवाक्यता तेव्हाही नव्हती, आताही नाही आणि नसेलही..
'पिंडे पिंडे मति: भिन्ना:' या न्यायाने प्रत्येकाची मति भिन्न आणि गतीही भिन्न.
मला असं वाटतं की
एक अनाम शक्ती नक्की आहे. जी आपल्याला सावरते, सकारात्मकतेने जगायला शिकवते, आनंद घ्यायला शिकवते, आनंद द्यायलाही शिकवते.
पण ती शक्तीस्थाने नेमकी कोणती? आपल्याकडे तर अनेक देव, त्यांचे अनेक अवतार, अनेक रूपं....
सर्वांची पूजा करायची आहे का?
आपल्या मनाला पटत असेल, रुचत असेल आणि तसे केल्याने समाधान लाभत असेल तर जरूर करावी!
मला मात्र देवतांची पूजा करण्यापेक्षा देवत्व भुरळ घालतं.
ते कुठेही बघता येतं.
दारात आलेल्या कोण्या अनोळखी व्यक्तीस पाणी देणाऱ्यात, निस्वार्थ भावनेने इतरांना मदत करणाऱ्यात, हेवेदावे न करता सहजपणे साधं जीवन जगणाऱ्यात, प्रामाणिक कष्ट करणाऱ्यात, आल्यागेल्याची मनापासून विचारपूस करणाऱ्यात, दुसऱ्याचे मनापासून कौतुक करणाऱ्यात, दुसऱ्याला समजून घेणाऱ्यात, आपपर भाव न बाळगणाऱ्यात, दुसऱ्याची पडलेली वस्तू पटकन उचलून देणाऱ्यात, खरेपणाची साथ देणाऱ्यात, दुसऱ्याशी तुलना न करणाऱ्यात, कोणाचा मत्सर न करणाऱ्यात, अशा एक ना अनेकांमध्ये दिसते देवत्व.
किती गोष्टींची यादी करू? अगणित, अनंत अशा चांगुलपणात देवत्व आहे, झाडात, पानात, फळा-फुलात...तुम्हा आम्हा सर्वांमध्येच त्याचाच अंश आहे ना?
मग तो स्वतःतील अंश ओळखणं, शोधणं, त्यावर अज्ञानाची, स्वार्थाची, अहमहमिकेची, अहंकाराची चढलेली पुटं दूर करणं, स्वतःतील चांगुलपणा लख्ख करणं म्हणजेच पूजा.
त्या देवाचे गुण आपल्या अंगी निर्माण व्हावे म्हणून पूजा करायची ना?
श्रीकृष्णाने सुदाम्याच्या मैत्रीची जाण ठेवली तशी जाण आपल्यामध्ये निर्माण होणे, दुष्टांचा संहार करणाऱ्या देवीची हिम्मत आपल्यामध्ये निर्माण करणे, गणपती सारखी बुद्धिमत्ता मिळवणे व तिचा सदुपयोग करणे, लक्ष्मीचा सहवास लाभला तरी न उतणे न मातणे, प्रसंगी पार्वतीसारखी उग्र तपश्चर्या करायची वेळ आली तरी न डगमगणे हे सारे दैवी गुण... ते अंश रूपाने का होईना आपल्यामध्ये निर्माण करणे हीच खरी पूजा...
देवाची पूजा ही त्याच्या गुणांसाठी करावी, नुसतेच त्याची कृपा व्हावी म्हणून नाही, असं मला वाटतं. देवाचं देवत्व म्हणजे त्याचे दैवी गुण. ते गुण अंगी बाणवणं हा एक प्रवास असतो तमा कडून तेजाकडे जाण्याचा. पूजेत लावल्या जाणाऱ्या दिव्याला जे महत्व असते ते याचमुळे. दिवा अंधाराचा नाश करतो व तेजाने प्रकाशतो. आपल्यातील दुर्गुणांचा म्हणजेच आपल्यातील तमाचा नाश आणि सद्गुणांचा स्वीकार म्हणजेच तेजाची प्राप्ती नाही का? हे तेज अंगी बाणवून आपल्याला काजव्याइतकं जरी चांगुलपणाने प्रकाशित होता आलं तरी जीवन सार्थक.....
जसा देव सर्वत्र असतो, तसा तो माझ्या कामात आहे.
मला माझ्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या डोळ्यात देव दिसतो.
मलाच नव्हे प्रत्येक शिक्षकाला तो जाणवतो.तो हसतो, बोलतो, खेळतो, शिकतो, चुकतो आणि आपल्यालाही शिकवतो...
चैतन्याचे ते अंश आपल्यावरच्या विश्वासाने येतात, आपल्यालाही विश्वास देतात, आधार देतात, आपलं मन असं काही रमवतात की आपल्याला घर दार सगळ्याचा विसर पडतो, सर्व प्रश्न विसरायला होतं... आपण नाहून निघतो त्या चैतन्यात....
देवासमोर बसून त्याला पत्री् फुलं, नैवेद्य अर्पण करताना मिळतो तोच आनंद या विद्यार्थ्यांच्या छोटया छोट्या कृतींचे कौतुक करताना, त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान पाहून मिळतो.
इतकं सुंदर देवत्व रोज आपल्यासमोर येतं, आपली पूजा मनोमन स्वीकारतं तेव्हा देव्हाऱ्यातल्या देवाला स्वतःचीच पूजा झाल्यासारखे नक्कीच वाटत असेल.
पूजा मूर्तीची असो वा कोणत्याही रुपातील देवत्वाची....शेवटी त्यातून मिळणारं समाधान हेच सर्वात मोठे साध्य!
नाही का?
- शर्वरी विशाल ताथवडेकर