top of page
Search

"देवो दुर्बल घातक:"

अश्वं नैव, गजं नैव, व्याघ्रं नैव च नैव च। अजापुत्रं बलिं दद्यात्, देवो दुर्बलघातक: ।।

 

"देवो दुर्बल घातक:" ह्या लेखाचा Podcast ऐकण्यासाठी खाली click करा.

देव देखील दुर्बल लोकांचाच घात करतो, अशा अर्थाने वरील वाक्प्रचार वापरल्या जातो. देव आपले रक्षण करतो, असे आपण म्हणतो, पण जेव्हा बळी दिल्या जातो तेव्हा गरीब दुर्बळ बकरीचाच बळी दिल्या जातो. घोडा, हत्ती किंवा वाघाची त्यासाठी निवड होत नाही, असा या श्लोकाचा अर्थ आहे. पण तुम्ही दुर्बळ राहिलात तर देव सुद्धा तुमची मदत करू शकणार नाही असा याचा अर्थ घ्यावा. कारण देव कुणाचा घात कशाला करील? देव ही एक वृत्ती आहे, एक शक्ती आहे, जी प्रत्येक सजीवाच्या ठायी आहे आणि ही वृत्ती कधीच कुणाचे वाईट चिंतित नाही, किंवा वाईट होऊ देत नाही. समाजात वावरत असताना आपल्याला बघायला मिळते कि शारीरिक दृष्ट्या किंवा आर्थिक दृष्ट्या वरचढ किंवा सबळ असलेले लोक आपला फायदा करून घेताना दिसतात. त्यांचा कुणी केसदेखील वाकडा करू शकत नाही. त्यामुळेच स्वतःला बलिष्ठ बनविण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. समर्थ रामदास स्वामी म्हणूनच म्हणतात "समर्थाचिया सेवका वक्र पाहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे?" इथे समर्थ म्हणजे सामर्थ्यवान असा अर्थ आहे. निसर्ग नियम समाजावताना सुद्धा आपण "Survival of the Fittest" (बलिष्ठ अतिजीविता ) असे म्हणतो.


शिवाजी महाराजांनी तर आपल्या बुद्धीच्या बळावर, तुटपुंज्या सेनेसह, मुघलांना नामोहरम करून स्वराज्याची स्थापना केली. एवढेच नव्हे तर जे सैन्य त्यांनी जमवले त्यातील प्रत्येक मावळा हा शरीरानेच नाही तर मनानेही खंबीर होता. सहजासहजी कुणाला घाबरणारा, कुणाला शरण जाणारा नव्हता. एक अतिशय प्रेरणादायक कविता आमच्या बालभारती पाठ्यपुस्तकात होती. ती त्यावेळी मनावर खूप खोल परिणाम करून गेली होती, म्हणून आजही चांगली आठवते. राज्याची पाहणी करण्यासाठी वेष बदलून निघालेल्या महाराज ओळखायला नाआल्यामुळे त्यांनाच एक बाल मावळा (सावळ्या) अडवतो आणि तुम्ही थोडे जरी पुढे गेलात तर तुमचे काही खरे नाही हे त्यांना दरडावून सांगतो. तो म्हणतो, "खबरदार जर टाच मारूनी जाल पुढे चिंधड्या उडविन राई राई एवढ्या". खुद्द राजांना अंगणात या म्हणून आव्हान देतो. महाराज देखील त्याची परीक्षा घेतात, त्याला म्हणतात तू काय एक लहानसा मुलगा आहेस, तू काय लढणार रे माझ्याशी? तुझ्याकडे ना भाला ना बर्ची. तू आपला गुमान मळ्यात जा आणि काम कर "मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा, कशाला ताठा तुज हा हवा" हे ऐकून तर सावळ्या आणखीन चिडतो आणि स्वाराला म्हणजेच महाराजांना म्हणतो "आपण मोठे दाढीवाले आहा वीर बायकी, किती ते आम्हाला ठाउकी " आमच्या शिवाजी राजांसमोर उभे देखील राहू शकणार नाही तुम्ही, असे ठणकावून सांगतो. या प्रसंगी त्याचे वय लहान असले तरी तो अतिशय खंबीर आहे हेच दिसून येते. म्हटलेच आहे ना, "यथा राजा तथा प्रजा". असा राजा आणि अशी प्रजा यामुळेच हिंदवी स्वराज्य स्थापन होऊ शकले. सामर्थ्याबरोबर चारित्र्य देखील तेवढेच महत्त्वाचे आहे अशा अर्थाचे वाक्य पूज्य गोळवलकर गुरुजींनी लिहिलेले आठवते. चारित्र्यहीन व्यक्ती जर सामर्थ्यवान असल्या तर समाजात अराजकता माजेल. याउलट चारित्र्यसंपन्न व्यक्ती जर सामर्थ्यवान सुद्धा असेल, तर समाजाची प्रगती घडून येईल. बलवान व्यक्ती जर चारित्र्यहीन असेल, तर गुंडागर्दी वाढेल. त्यामुळे सामर्थ्य हे शिवाजी महाराजांसारखे हवे.

आज अमेरिका आपल्या आर्थिक बळावर जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र म्हणून गणले जाते. त्यामुळे साऱ्या जगातील राजकारणाची सूत्रे हलवण्याची क्षमता आज अमेरिकेकडे आहे. वाघाच्या अंगी असलेल्या प्रचंड शक्तीमुळे तो जंगलाचा राजा ठरतो. इतर दुबळ्या प्राण्यांवर आपली सत्ता गाजवतो. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अशी अनेक उदाहरणे बघतो, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात साधा सरळ एखादा विद्यार्थी आला तर त्याला त्रास दिल्या जातो, कधी कधी याचा अतिरेक होतो, प्रसंग विकोपाला जातो. ही अशी बलिष्ठता काहीच कामाची नाही. अंगी असलेल्या बळाचा उपयोग हा जगाच्या कल्याणासाठीच व्हायला हवा. विद्यार्थी दशेत असताना तर आपले बौद्धिक सामर्थ्य वाढविण्याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्याने करावा. मोठ्यांचे तर जाऊद्याच, अगदी लहानलहान मुलांना खेळताना बघितले तर त्यातील अंगाने मजबूत व शक्तिवान इतर दुबळ्यांना आपल्या मनाप्रमाणे वागायला भाग पाडतात. धनवान लोक आपल्या पैशाच्या बळावर गरीबांना आपल्या कह्यात ठेवतात. त्यांना अपमानास्पद वागणूक देतात. वेळप्रसंगी त्यांची अडवणूक करतात. काही लोक आपल्या बुद्धीच्या बळावर इतरांना तुच्छ लेखतात. त्यांचा पाणउतारा करताना दिसतात. सत्तेच्या बळावर जनतेची पिळवणूक करणारे राजकारणी नेते तर सगळ्यांना माहिती आहेतच. वास्तविक पाहता ईश्वराने जेव्हा सृष्टीची रचना केली, तेव्हा त्याने समाजात, निसर्गात समतोल राहावा म्हणून प्रत्येकाला काही एक विशिष्ट क्षमता दिली. त्या क्षमतेचा वापर जगाच्या कल्याणासाठी व्हावा असाच त्याच हेतू होता. निसर्ग आपल्या क्षमतेचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी करताना दिसतो, वृक्ष अजूनही प्राणीमात्रांना फळे देतात, सावली देतात, नद्या पाणी देतात, समृद्धता देतात, समुद्र पाऊस देतो. पण मानव मात्र आपल्याला मिळालेल्या क्षमतेचा उपयोग स्वार्थासाठी, किंबहुना इतरांना त्रास देण्यासाठी करतो. ही वृत्ती बदलणे तर आवश्यक आहेच पण प्रत्येक व्यक्तीने शरीराने सुदृढ आणि मनाने कणखर असणे तेवढेच आवश्यक आहे.


असे अनेक प्रसंग आयुष्यात येतात, की माणूस मनाने खचतो, बरेचदा जीवनात मिळणारी असफलता, परीक्षेत मिळणारे अपयश हे एखाद्या व्यक्तीला निराशेच्या गर्तेत लोटतात. पण अपयशानंतर यश हे जीवनचक्र आहे, त्यामुळे असे अपयश पचविण्याची ताकद ही वाढवायलाच हवी. त्यासाठी त्या व्यक्तीनेच नाही तर त्याच्या सभोवतालच्या सगळ्यांनी मिळून त्याचे मानसिक बळ वाढवायला मदत केली पाहिजे. असे बळ वाढवण्यासाठी आपल्या हिंदू संस्कृतीत योगासने, प्राणायाम, ध्यानधारणा यासारखे मार्ग उपलब्ध आहेत. कधी कधी अचानक आयुष्यात अशा विपरीत घटना घडतात की एखाद्या व्यक्तीचे संपूर्ण आयुष्यच बदलून जाते. सॅम ब्लूम ही एक समुद्री खेळांमध्ये तरबेज असलेली, जगण्यावर मनापासून प्रेम करणारी तीन मुलांची आई कुटुंबासोबत थायलंडला सुटीसाठी जाते, आणि अचानक एक जीवघेणा अपघात घडतो. त्यात तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत होते, आणि तिचे आयुष्य पार बदलून जाते. सतत कामात व्यस्त असणारी सॅम आता दिवसभर घरात बसून राहिल्यामुळे अस्वस्थ होते, तिचे मानसिक संतुलन बिघडेल कि काय, असे वाटत असतानाच एक जंगली मॅगपाय नावाचा पक्षी जखमी अवस्थेत सॅमच्या मुलाला सापडतो. त्याला ते घरी आणतात. त्याची शुश्रूषा करताकरता, त्याची उडण्याची धडपड बघता बघता सॅम पुन्हा आयुष्यावर प्रेम करू लागते आणि कयाकिंग ची प्रॅक्टिस करायला लागते. तिचा आत्मविश्वास वाढतो, आणि ती "वर्ल्ड चॅम्पियन कॅनॉईस्ट" बनते. इथे ती तिचे शारीरिकच नाही तर मानसिक बळसुद्धा वाढवते, नाहीतर तिचे आयुष्य वाया गेले असते. ती नशीबाच्या खेळाची शिकार ठरली असती.कधी अंगी असलेली क्षमता दिसून येण्यासाठी कुणीतरी मधाचे बोट लावायला लागते. पूर्णा ही एक तेलंगणाच्या एका छोट्याशा खेड्यात राहणारी अतिशय गरीब मुलगी. ती आणि तिची चुलत बहीण प्रिया स्थानिक शाळेत शिकत असतात. वडील शाळेची फी भरू शकत नसल्यामुळे रोज शाळा झाडण्याचे काम त्या दोघींना करावे लागते. एक दिवस प्रियाला वर्तमान पत्राचा एक कपटा मिळतो. त्यात ती वाचते की, सरकारी शाळेत प्रवेश घेतला तर शिक्षण तर मोफत मिळतेच, शिवाय जेवण देखील मिळते. इथल्या कटकटीतून सुटका व्हावी म्हणून प्रिया सुचवते की आपण दोघी नवीन शाळेत जाऊयात. दोघी पळून जाण्याचे ठरवितात, पण त्यांचा बेत फसतो. त्या पकडल्या जातात, आणि प्रियाचे वडील तिचे लग्न लावून देतात. शिक्षण फुकटात मिळणार म्हणून पूर्णाचे वडील तिला "सोशल वेलफेयर" शाळेत दाखला घेऊन देतात. माझ्या तर नावातच "Poor" आहे, यापेक्षा आणखी गरीबी काय असू शकते असे "गरीब-गरीब" हा खेळ खेळताना मैत्रिणींना गमतीने सांगणारी ही पूर्णा गिर्यारोहणात अतिशय तरबेज असते. तिथे ती इतर विद्यार्थ्यांसोबत "रॉक क्लाइम्बिंग" चे धडे घेते. तिचे प्रशिक्षक तिचे "गिर्यारोहण कौशल्य" हेरून घेतात. तिची चिकाटी बघून तिची निवड "माऊंट एवरेस्ट" सर करण्यासाठी होते. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून ती "माऊंट एवरेस्ट" सर करणारी सर्वात लहान गिर्यारोहक बनते. तिचे कर्तृत्वच तिची ओळख ठरते. हे सगळे साध्य करण्यासाठी लाजरी पूर्णा स्वतःला सामर्थ्यवान करण्यासाठी अपार कष्ट घेते, मनाचे सामर्थ्य वाढवते. तिला मधाचे बोट तिची बहीण प्रिया लावते. पूर्णाला पुढे जाण्यास ती नेहमी प्रोत्साहन देते.जे व्यक्तींच्या बाबतीत, तेच देशालाही लागू पडते. कारण शेवटी देश म्हणजे काय तर देशातील माणसेच ना. पण देशाच्या बाबतीत विचार करताना, देशाला सामर्थ्यवान करण्यासाठी समर्थ नेतृत्व हवे. तसेच विविध प्रकारची साधन सामुग्री हवी. देश बलवान व्हावा, शत्रूपासून आपला बचाव आपल्याला करता यावा म्हणून भारतात वेगवेगळी शस्त्रास्त्रे, राफेल सारखी लढाऊ विमाने आपण घेतो, म्हणून पाकिस्तान सारखा कुरापत करणारा देश आपल्याला वचकून आहे. आपले पराक्रमी सैन्य सीमेवर तैनात आहे, त्यामुळे चीनसारख्या पाताळयंत्री देशाला त्याचे घातकी बेत साध्य करता आलेले नाहीत. आज मेक इन इंडिया सारख्या योजनांमुळे देश बऱ्याच क्षेत्रात स्वतंत्र होऊ लागलाय, इतकेच नव्हे तर तंत्रज्ञान, औषधी आणि वैद्यकीय उपकरणे अशा क्षेत्रात एक नेता म्हणून उदयाला येतो आहे. हा देखील मोदीजींसारख्या सामर्थ्यवान नेतृत्वाचा प्रभाव आहे. त्यांचे देशप्रेम आणि देशाला सर्वोत्तम ठरवण्याच्या दृष्टीने उचलेले प्रत्येक पाऊल , त्यांचे मानसिक सामर्थ्य दर्शविते. यात कुठेही दुसऱ्यांना कमीपणा दाखवण्याचा उद्देश नाही. स्वत:चा टेंम्भा मिरवण्याचा तर नाहीच नाही. फक्त आपल्या देशाच्या वाटेल कुणी जाऊ नये यासाठीची ही तळमळ आहे. इथे पूज्य साने गुरुजींचे "बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो" हे स्फुरणदायी गीत आठवते. या गाण्याचा प्रभाव प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनावर अजूनही आहे आणि हे गाणे ऐकले कि अजूनही अंगावर रोमांच उभे राहतात. .


भारत देश जेव्हा पारतंत्र्यात होता तेव्हा वीर सावरकरांनी जाणले होते कि देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल, तर मला सामर्थ्यवान व्हायला हवे. या भावना व्यक्त करताना, इंग्लंडमधील ब्रायटन समुद्रकिनाऱ्यावर सागराला उद्देशून लिहिलेल्या कवितेत ते म्हणतात, "जगदनुभव योगे बनुनी मी, तव अधिक शक्त उद्धरणी मी" म्हणजेच जगाचा अनुभव घेऊन, अधिक सामर्थ्यशाली होऊन तुझ्या उद्धारासाठी येईन असे मी माझ्या मातृभूला वचन दिले होते, पण मी तर हा असा परदेशात, आता हा विरह मला सहन होत नाही, आता मला परत माझ्या मातृभूला घेऊन चल, "ने मजसी ने परत मातृभूमीला" अशी विनंती ते सागराला करतात. जर तिच्यासाठी माझ्या विद्येचा "बौद्धिक" सामर्थ्याचा उपयोग झाला नाही तर ती विद्या काय कामाची असे भाव देखील ते व्यक्त करतात. "जरी उद्धरणी व्यय ना तिच्या हो साचा, हा व्यर्थ भार विद्येचा" म्हणजेच माझ्या सामर्थ्याचा उपयोग हा मातृभूच्या कल्याणाकरता व्हावा ही तळमळ त्यांच्या मनात होती. हे गाणे ऐकताना नेहमीच मन व्याकुळ होते. अशाच प्रकारे जर प्रत्येकाने मिळालेल्या क्षमतेचा उपयोग जगाच्या कल्याणासाठी केला, तर "बळी तो कान पिळी" या म्हणीचे अस्तित्त्वच नाहीसे होईल तसेच आयुष्यात येणाऱ्या विपरीत प्रसंगांना पुरून उरण्याची देखील क्षमता अंगी बाणवली तर या पृथ्वीवर स्वर्ग निर्माण होईल. .


मनात जेव्हा होतो निश्चय, गाठायचा मज हा सागर

तमा ना उरते सरितेला मग, पार कराया कुठले अंतर ।


उमेद धगधगते उडण्याची, देहाची जरी राख होतसे,

कवेत घेण्या अवकाशाला, फिनिक्स पक्षी झेप घेतसे ।


आव्हानांना आयुष्यातील सडेतोड देण्याला उत्तर

सक्षम होऊनी सर्वांगाने, प्रत्येकाने व्हावे तत्पर - डॉ. अंजली देशपांडे

bottom of page