top of page
Search

वासुदेव बळवंत फडके : क्रांतीची बीजे अर्थात भाग १

आज ४ नोव्हेंबर म्हणजे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील खरोखरच एक महत्वाचा दिवस. आज वासुदेव बळवंत फडके यांची १७५ वी जयंती. आपल्यापैकी बऱ्याचं जणांना वासुदेव बळवंत म्हटले की ‘आद्यक्रांतिवीर’ आठवत असेल.पण दुर्देवाने या शब्दापलीकडे बहुतेक जण त्यांच्याबद्दल काहीच सांगू शकणार नाहीत. परंतु, इतके वादळी, चढ-उताराने आणि संघर्षाने व्यापलेले परंतु फक्त ३७ वर्षेच आयुष्य लाभणाऱ्या या वासुदेव बळवंत फडके यांचे जीवन म्हणजे एक खराखुरा thriller आणि adventures चित्रपटचं जणू. अर्थात हे ‘आद्यक्रांतिवीर’ बिरुद त्यांच्या नावामागे लागले त्याचे कारण म्हणजे त्यांचे हे ध्येयवेडेपण.

खरे पाहायला गेलो तर वासुदेव बळवंत म्हणजे प्रथम एका साध्या मध्यमवर्गीय माणसासारखे आयुष्य जगणारे आणि सरकारी नोकरी करणारे गृहस्थ. पण या साध्या माणसाचा ‘आद्यक्रांतिवीर’ कसा झाला? असे काय त्यांच्या आयुष्यात घडले की सरळ मार्गाने आणि संथ गतीने जाणाऱ्या त्यांच्या जीवन नौकेचे चक्रच फिरले आणि त्या नौकेने सरळ एका वादळात आपणहून प्रवेश केला ज्याने सारेच चक्रावले.

कदाचित तुम्हाला ही अतिशयोक्ती किंवा एखादी दंतकथा वाटावी. पण खरेच १७५ वर्षांपूर्वी ‘वासुदेव बळवंत फडके’ नावाच्या व्यक्तीने हा चमत्कार करून दाखवला होता आणि तो ही आपल्याला मिळालेल्या अवघ्या ३७ वर्षांच्या तुटपुंज्या आयुष्यामध्ये आणि त्याचबरोबर केले ते कार्य इतके मोठे होते की, त्याबद्दल त्यांना आद्यक्रांतिवीर ही पदवी देखील मिळाली आणि याच त्यांच्या कार्यामुळे आज तब्बल १७५ वर्षांनी देखील त्यांचे जीवन म्हणजे अनेकांसाठी एक प्रेरणा स्रोत आहे.

तर वासुदेव बळवंत फडके या वादळातून इतिहास रचणाऱ्या या जीवन नौकेचा प्रवास आणि त्यातील साहसी कथा आपण त्यांच्या जयंतीनिमित्त पुढील पाच भागांमध्ये पाहू.

 

वासुदेवरावांचा जन्म मंगळवार दिनांक ४ नोव्हेंबर १८४५ रोजी रायगड परगण्यातील शिरढोण या गावी बळवंतराव आणि कल्याणच्या बोरगांवकर घराण्यातील सरस्वतीबाई यांच्या पोटी झाला. फडके घराणे म्हणजे कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार वासुदेवाचे आजोबा म्हणजे अनंतराव फडके हे मुखतः हे किल्लेदाराचे काम करत असत.

लहानपणापासूनच वासुदेवाची शरीरयष्टी अत्यंत सुदृढ आणि तंदरुस्त होती आणि स्वभाव मात्र अत्यंत खोडकर आणि वांड. वयाच्या सातव्या वर्षापर्यंत वासुदेवाने कधी हातात पाटी-पुस्तक देखील घेतले नव्हते. दिवसभर बैलगाडीतून गावभर हिंडणे, खोड्या करणे आणि त्याचबरोबर रोज केलेल्या खोड्यांच्या घरी तक्रारी घेउन येणे हा त्याचा दिनक्रम.

मात्र वासुदेव अवघा १२ वर्षांचा होता तेंव्हा १८५७ चे स्वातंत्र्यसमर पेटले. उठावातील झाशीच्या राणीच्या, तात्या टोपेंच्या, नानासाहेब पेशव्यांच्या पराक्रमी कहाण्या व प्रसंग बाल वासुदेवाच्या कानी पडत होते. या कहाण्या कदाचित त्याला त्यावेळी फारशा कळाल्या नसतीलही, त्याची धग त्याला तितक्या तीव्रतेने जाणवली नसेलही. पण त्या कुठेतरी खोलवर आपला ठसा वासुदेवाच्या मनात उमटवत होत्या. त्या कहाण्या त्याला बेचैन करत होत्या. म्हणूनच १८५९ साली तात्या टोपेंना फाशी दिल्यावर हाच वासुदेव अगदी ढसा-ढसा रडला होता.

आत्तापर्यंत १८५७ चे बंड चिरडण्यात आणि आपली ब्रिटिश सत्ता अजूनच बळकट करण्यामध्ये इंग्रजांना चांगलेच यश आले होते. इकडे वासुदेवाचे देखील वय वाढत चालले होते. शिक्षणात तो चांगलेच प्राविण्य मिळवत होता म्हणून त्याला पुढील शिक्षणासाठी आधी मुंबई आणि नंतर पुण्याला पाठविण्यात आले. इथे त्यांनी मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण घेतले आणि बरोबरीनेच इंग्रजी भाषेवरही चांगलेच प्रभुत्व मिळवले.

एव्हाना वासुदेवाचे लग्न देखील झाले होते. त्यामुळेच तो आता मुंबईला रेल्वे कार्यालयामध्ये महिना २० रुपयांच्या नोकरीवर रुजू झाला. परंतु येथील इंग्रज अधिकारी मात्र कार्यालयातील लोकांना फार त्रास देत असे. कोणी काही मिनिटे जरी उशिराने आला किंवा कामात काही छोटीशी जरी चूक झाली तरी त्याला अत्यंत कठोर अशा शिक्षा केल्या जायच्या. मात्र हा अधिकारी स्वतः मात्र कोणतेही काम वेळेवर करत नसे. पण त्याला मात्र ह्यापैकी कोणताच नियम लागू नव्हता कारण फक्त एकच तो एक इंग्रज होता. मात्र पहिल्या तीन-चार महिन्यातच वासुदेवाला ही त्याची अरेरावी असाह्य झाली आणि मजबूत, पिळदार शरीराचा आणि सहा फूट उंचीचा वासुदेव एक दिवस त्याच्यावर गरजला आणि म्हणाला, ‘ हे पहा तुमची ही अरेरावी अशीच चालू राहिली तर एक दिवस तुम्हाला खुर्चीसकट खिडकी बाहेर फेकून देईन.’ एका इंग्रज अधिकाऱ्याला असे सडेतोड उत्तर दिल्यामुळे अर्थात वासुदेवाला त्या नोकरीवर पाणी सोडावे लागले.

नंतर ‘ग्रांट मेडिकल’ मध्ये त्याने तीन महिने नोकरी केली. नंतर वासुदेव एका दुसऱ्या इंग्रजी कंपनीमध्ये नोकरीला लागले आणि काहीच दिवसात आपल्या सुंदर अक्षरामुळे बढती मिळून वासुदेव फडके आपले बिऱ्हाड घेउन पुण्याला आले. तेथे त्यांनी सदाशिव पेठेतल्या नरसिंहाच्या मंदिरात आपले घर केले.

१८७० साल उजाडले होते. वासुदेव आपल्या वयाच्या पंचविशीत प्रवेश करत होता आणि त्याचबरोबर आपल्या कामातील कुशलतेमुळे आणि प्रावीण्यामुळे वासुदेवाचा पगार देखील आता ६० रुपये महिन्यापर्यंत पोहोचला होता. पण येथेच वासुदेवाच संपूर्ण जीवनचं बदलून टाकणारी आणि त्यांच्या आयुष्यालाच कलाटणी देणारा प्रसंग घडला. शिरढोणला गावी वासुदेवाची आई अंथरुणाला खिळली होती आणि सतत वासुदेवाच्या आठवणीने व्याकुळ होत होती, आपल्या अखेरच्या घटका मोजत होती. आईची तब्येत बिघडल्याची तार मिळताच वासुदेवाने आपल्या वरिष्ठांकडे गावी जायची परवानगी मागितली. तर त्यांनी सांगितले की,’तुम्ही सुट्टीसाठी रीतसर अर्ज करा’.

पण वासुदेवाकडे इतका वेळ नव्हता. त्याने तसे पुन्हा सांगितले तर उत्तर आले,’Enough Phadke’. म्हणून नाईलाजाने वासुदेवाने अर्ज केला.पण दोन दिवसांनी उत्तर आले आणि रजा नाकारली गेली. यावर वासुदेव प्रचंड संतापला आणि तडक शिरढोणला रवाना झाला. पण अखेर ज्या गोष्टीची भीती होती तेच झाले. वासुदेव पोहोचण्याआधीच त्यांच्या आईने आपले प्राण सोडले. या आई आणि मुलाची अखेरची भेट काही होउ शकली नाही. याचा वासुदेवाच्या मनावर फार खोलवर परिणाम झाला.

या घटनेची वासुदेवाने वरच्या कार्यालयात तक्रार केली. परंतु त्याची कोणी दखल घेतली नाही की त्यावर कोणते उत्तर आले नाही. उलट आईच्या वर्षश्राद्धाच्या रजेचा अर्ज सुद्धा नामंजूर करण्यात आला.

या प्रसंगांनी वासुदेव फारच बदलला. त्यांचे नोकरीतून मन उडाले. त्याचा इंग्रज सरकारविरुद्धचा राग बळावू लागला आणि ही जुलमी ब्रिटिश सत्ता उलथवून या इंग्रजांना या देशातून हाकलून देण्याचे आखाडे वासुदेवाच्या मनात बांधले जाऊ लागले.

ही ह्रदयात लागलेली आग वासुदेवाला अस्वस्थ करत होती. याच आगीला त्याने एकट्याने एका वणव्यात आणि क्रांतीमध्ये कसे परिवर्तित केले हे आपण पुढील लेखामध्ये पाहू.


- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी

वासुदेव बळवंत फडके : आघात अर्थात भाग २ वाचण्यासाठी येथे click करा.

bottom of page