वासुदेव बळवंत फडके : आघात अर्थात भाग २
वासुदेव बळवंत फडके : क्रांतीची बीजे अर्थात भाग १ वाचण्यासाठी येथे click करा.
मागील लेखात आपण वासुदेव बळवंत फडक्यांचा लहानपणीच प्रवास पहिला. त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा आणि त्यांचे संपूर्ण जीवनाचं बदलून टाकणारा हृदय प्रसंग देखील पहिला. याच प्रसंगामुळे एक सामान्य जीवन जगणाऱ्या वासुदेवाचा एका क्रांतिकारकांच्या खडतर आणि साहसी जीवनाकडे प्रवास सुरु झाला.
मुळातच वासुदेवराव म्हणजे निष्ठावंत दत्त भक्त आणि त्यातच आईची अखेरची भेट देखील चुकल्यामुळे मनावर झालेला आघात. यामुळे सध्या वासुदेवरावांचे मन कुठेच लागत नसे. आयुष्याला एक रितेपण प्राप्त झाले होते. त्यामुळेच कोठेतरी मन गुंतवायला आणि बरोबरीनेच असलेल्या शास्त्रांच्या व संस्कृत भाषेच्या सखोल अभ्यासाच्या जोरावर त्यांनी ‘दत्त लहरी’ या संस्कृत ग्रंथाचे मराठीत भाषांतर करायला सुरुवात केली. ते पुरे होताच स्वतःचा ५१ अध्यायी असा ‘दत्त महात्म्य’ हा ग्रंथ लिहिला.
त्याचबरोबर पुण्यातील १८७० चा काळ म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानड्यांच्या काळ. न्या.रानडे देशात अनेक ठिकाणी देशप्रेमाचे व स्वदेशीचे धडे लोकांना देत होते. पुण्यातील सार्वजनिक सभेचे ते अध्यक्ष देखील होते. याच सार्वजनिक सभेच्या त्यांच्या व्याख्यानांना लोक हजारोने गर्दी करत. वासुदेवरावदेखील या सभांना नेहेमीच जात असत आणि येथेच त्यांच्यावर स्वदेशी धोरणाचा फार प्रभाव पडला. आधीच आयुष्यातील घडलेल्या घटनांमुळे अन्यायी ब्रिटिश सत्तेविरुद्ध मनात असलेला आणि त्यात न्यायमुर्ती रानड्यांची भारावून टाकणारी ती भाषणे आणि स्वदेशीची घातलेली आर्त हाक.
या साऱ्यामुळे वासुदेवराव अगदी निष्ठावंत स्वदेशी बनले. इतके की त्याकाळी छत्री विदेशातून येत असे म्हणून त्यांनी छत्री वापरणेच सोडून दिले. भर पावसातून ते भिजत फिरत असत पण छत्री वापरली नाही म्हणजे नाही. हे आपले स्वदेशी व्रत ते मुद्दामून लोकांना कळेलअशा रीतीने पाळत असत. एकदा कोणीतरी मुद्दामून त्यांच्या ऑफिस मधल्या टेबलवर विदेशी टाक (पेन) आणून ठेवला तर त्यांनी कोणाचीही पर्वा न करता इंग्रज अधिकाऱ्यांसमोरच रागारागाने त्याचे तुकडे-तुकडे करून फेकून दिले.
वासुदेवराव आता चांगलाच व्यायाम करू लागले होते. आधीच भक्कम असलेले शरीर आणखीनच पिळदार होत होते. भविष्यातील काहीतरी योजना उराशी बाळगून ते व्यायामाबरोबरच लहुजीबाबा मांग आणि राणबा महार यांच्याकडून दांडपट्टा, तलवार यांसारखी पारंपरिक तर बंदुकीसारखी आधुनिक शस्त्रे देखील शिकत होते आणि त्याचा सराव करत होते.
दरम्यानच्या काळात कोणत्यातरी आजाराने त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर त्यांनी गोपिकाबाईंशी दुसरा विवाह केला. तिला त्यांनी व्यवहारिक आणि शालेय शिक्षण द्यायला सुरु केली. पण त्याचबरोबर वयाच्या १२व्या वर्षी ऐकलेल्या १८५७ च्या उठवतील कहाण्यांमधल्या झाशीच्या राणीच्या पराक्रमाने प्रेरित झालेले वासुदेवराव आपल्या पत्नीला देखील दांडपट्टा, तलवार आणि बंदूक चालवण्याचे चांगलेच शिक्षण देउ लागले.
आता हळू-हळू वासुदेवरावांमधील क्रांतिकारी वृत्ती बळावत चालली होती. ते अजूनही सरकारी नोकरी करताच होते. पण मनात काही वेगळ्याच योजना फेर धरू लागल्या होत्या. दिवस काम करण्यात आणि रात्र क्रांतिकारी उठावाची गणिते मांडण्यात, काही योजना करण्यात जात होती. यासाठी वासुदेवरावांची तयारी तर शस्त्रे चालवण्याच्या शिक्षणामुळे झाली होती. पण आता त्यांना हवी होती ती म्हणजे सेना आणि लोकांची साथ. त्यांना लोकांशी खूप बोलायचे होते, आपल्या मनात पेटलेले हे क्रांतीचे वादळ लोकांमध्ये पसरवायचे होते. यासाठी त्यांनी सभा घ्यायचे ठरवले. पण याची दवंडी गावभर द्यायला यांच्याकडे मनुष्यबळ कोठे होते ?
शेवटी पुण्यातील सदाशिव पेठेच्या चौकामध्ये व अन्य अनेक ठिकाणी उभे राहून वासुदेवराव सायंकाळी शनिवार वाड्यावर सभा असल्याची दवंडी स्वतःच पिटू लागले. त्यामुळे सभेला गर्दी जमली आणि वासुदेवरावांनी इंग्रजांचे अत्याचार, लोकांचा केलेला छळ, दिलेली तुच्छ वागणूक, केलेली लूट हे देशाचे सारे विदारक आणि त्यांना स्वतःला असह्य होणारे चित्र लोकांनसमोर मांडले. १८५७ नंतर प्रथमच कोणीतरी असे विचार प्रकटपणे आणि सार्वजनिक रित्या बेधडकपणे मांडत होते. वासुदेवरावांच्या बोलण्यात एक आर्त सूर होता, आपलेपण होते त्यामुळे ते विचार लोकांच्या मनाला देखील भिडले. त्यांच्या सभेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या त्यांच्या सभांना बळवंतराव (लोकमान्य) टिळक देखील हजार असायचे.
पुढे त्यांनी हीच स्वदेशी आणि देशप्रेमाची धोरणे ठेउन वासुदेवरावांनी ‘पूना नेटिव्ह इन्स्टिट्यूशन’ या संस्थेची स्थापना केली . पुढे त्यांनी अशा अनेक सभा घेतल्या. त्यांना प्रत्येक सभेला प्रतिसाद देखील उत्तम मिळाला, लोकांच्या टाळ्या मिळाल्या, वाहवा मिळाली. पण प्रत्येक्ष साथ, मनुष्यबळ मात्र मिळेना. तेव्हा त्यांनी ठरवले ह्या पांढरपेशा लोकांसमोर बोलून काही देखील फायदा नाही हे लोक वाहवा करतील. पण प्रत्यक्ष मदत मात्र करणार नाहीत.
आता १८७६ साल उजाडले होते आणि आपल्याबरोबर येताना प्रचंड असे दुष्काळाचे संकट घेउन आले होते. त्यावर्षी जवळ-जवळ संपूर्ण भारतभर भीषण असा दुष्काळ पडला. लोकांना हाताला काम आणि खायला अन्न मिळेना. लोक अन्नान दशा होउन मृत्युमुखी पडू लागले. पण सरकार मात्र अगदी शांत होते. कारण कोणत्याच ब्रिटीश अधिकाऱ्याला याची झळ पोहोचत नव्हती. त्यांना विदेशातून सर्व काही व्यवस्थित मिळत होते. पण आपल्या देशबांधवांची ही स्थिती वासुदेवरावांना काही सहन होईना. म्हणून ते मध्य भारत भ्रमणासाठी निघाले आणि बाहेरील परिस्थीचा अंदाज घेतला. त्यानंतर तर त्याचा इंग्रज सरकार विरुद्धचा राग विकोपाला केला आणि त्यांनी ठरवले की हीच ती वेळ. आता इंग्रज सरकारला धडा शिकवायलाच हवा.
पण यासाठी शहरातील शिकलेल्या आणि पांढरपेशा लोकांकडून त्यांना मदतीची काहीच अपेक्षा नव्हती. म्हणून ते पुण्याजवळील गावांमधील रामोशी लोकांना भेटला गेले. हे रामोशी लोक स्वतःला ‘रामवंशी’ म्हणवत, त्यातूनच हा ‘रामोशी’ शब्द आला असावा. हा समाज अत्यंत धाडसी आणि जीवावर उदार होउन जगणारा. वासुदेवरावांनी त्यांच्या गावांमध्ये सभा घेउन त्यांचे मतपरिवर्तन केले व आपल्या कार्यासाठी त्यांची साथ मिळवली.
रामोशी लोकांची साथ तर वासुदेवरावांनी मिळवली आणि ते लोक देखील त्यांना आदराने महाराज म्हणू लागले होते. पण आता गरज होती ती त्यांना लढाईचे तंत्रशुद्ध आणि आधुनिक शिक्षण देण्याची. कारण ज्यांच्याशी लढायचे होते त्यांच्याकडे पारंपारिक शस्त्रांबरोबरच आधुनिक तंत्र सुद्धा होते. म्हणूनच आता वासुदेव बळवंत फडक्यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील गुलटेकडी आणि नरसिंहाच्या मंदिरामागे तालमी सुरु झाल्या. यात नंतर पुण्यातील टिळकांसाखी देखील काही तरुण मंडळीही वासुदेवरावांना येउन मिळाली. त्याचबरोबरीने वासुदेवरावांच्या पत्नी गोपिकाबाई देखील ह्या कार्यात सामील झाल्या.
हे सर्व काही अत्यंत गुप्तपणे चालू होते. एक-एक चाल विचार करून आणि कुशलतेने खेळली जात होती. पण ही वादळापूर्वीची भयाण शांतता होती. हे वादळ आता पुढे कसे फेर धरणार आणि कोणाकोणाला आपले तडाखे देणार हे आपण पुढील लेखात पाहू.
वासुदेव बळवंत फडके : धाडस अर्थात भाग ३ वाचण्यासाठी येथे click करा.