top of page
Search

वासुदेव बळवंत फडके : धाडस अर्थात भाग ३

वासुदेव बळवंत फडके : आघात अर्थात भाग २ वाचण्यासाठी येथे click करा.

 

मागील लेखात आपण पहिले की, वासुदेव बळवंत फडक्यांच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळाली. काही काळ त्यांच्या आयुष्यात रितेपण भरून राहिले होते. या काळात त्यांनी काही साहित्यनिर्मिती देखील केली आणि बरोबरीनेच दांडपट्टा, तलवार, बंदूक अशी शस्त्रे चालवण्याचे प्रशिक्षणही घेतले. पुण्याच्या आजूबाजूच्या गावातून त्यांनी रामोशी लोकांना बरोबर घेउन एक सेना देखील उभी केली.

पुण्यातील गुलटेकडी आणि नरसिंह मंदिरा मागील भागात त्यांच्या या सेनेचा कसून सराव चालू होता. पारंपरिक शस्त्रे वापरून गनिमीकाव्याने युद्ध कसे करायचे, बंदुकीने बरोबर नेम कसा धरायचा असे विविध प्रकारचे प्रशिक्षण आणि सराव तेथे जोर धरू लागले होते. अखेर १८७९ च्या मध्याला ही सेना लढाईस तयार झाली. आतापर्यंत या सेनेमध्ये सैनिकांची संख्या ३०० च्या घरात गेली होती. या सेनेतील प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या युद्धकलेमध्ये पारंगत झाला होता. तेंव्हा आता वेळ होती ती म्हणजे या सेनेचे नेतृत्व निवडण्याची. तेव्हा सर्वांनी मिळून उंच धिप्पाड अशा दौलतराव या तिशीतल्या तरुणाची निवड केली. दौलतराव म्हणजे निधड्या छातीचा आणि जीवावर उदार झालेला सैनिक त्याने हे काम अत्यंत आनंदाने स्वीकारले.

एव्हाना सेना जमली, त्याचे प्रशिक्षण देखील पार पडले. पण आणखी एक संकट या सर्वांसमोर आ वासून उभे होते ते म्हणजे पैसा. अर्थात ह्या सेनेकडे हुरूर, आत्मविश्वास आणि त्याग या गोष्टींची कोणतीच कमी नव्हती. पण फौज काही फक्त जोशावर आणि त्यागावर चालत नाही. तिला दारुगोळ्याला, शस्त्रांना आणि सेनेच्या अन्नपाण्याला पैसा लागतोच. तो तर इथे कोणाकडेच नव्हता. वासुदेवराव अनेक सावकारांकडे जाउन आले, अनेक संस्थानिकांकडे जाउन आले. या सर्वांना स्वातंत्र्यासाठी, देशाच्या कार्यासाठी पैसा उधार मागितला. परंतु परिणाम शून्य. लोक वाहवा करत पण आर्थिक मदत करताना मात्र सर्वांचा हात आखडताच. कित्येकांनी तर त्यांची चेष्टा आणि अपमान देखील केले. पण हार मानतील ते वासुदेव बळवंत फडके कसले ?

त्यांनी देखील आपल्या कार्याचा जोर आणखीनच वाढवला. पण तरी काही त्याला यश येताना दिसेना. शेवटी त्यांनी ठरवले की, ज्या जनतेच्या आणि सामान्य माणसाच्या कष्टातून आणि घामातून ह्या धनिकांनी धनसंचय केला ते धन जर ते देशकार्यासाठी देउ शकत नसतील तर आपणाला त्याच्याकडून ते हिसकावून घ्यावे लागेल, लुबाडावे लागेल. अर्थात सुरतेची लूट जशी शिवाजी महाराजांनी स्वार्थासाठी केलेली नव्हती, तर स्वराज्यातून लुटलेला पैसाच स्वराज्य कामासाठी परत आणला होता. अगदी त्याचप्रमाणे आपलीही लूट स्वार्थासाठी नाही तर या भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठीच आहे. त्यामुळे आता त्यांनी आपले लक्ष धनसंचयासाठी काही बेत तयार करण्याकडे वळवले.

प्रथम त्यांनी सरकारी कार्यालयावर छापा घालायचे ठरवले. सगळी पाहणी झाली, बेत ठरला. पण कोणीतरी ऐनवेळेस हे गुपित बाहेर फोडले आणि तो बेत फसला आणि असे सरकारी कार्यालयांवर छापे घालण्याचे काहीतरी कारस्थान सुरु असल्याचा सुगावा लागल्याने सर्व सरकारी कार्यलयांची सुरक्षा देखील वाढवण्यात आली होती. त्यामुळे आता तिथे छापा घालणे अश्यक्य झाले. पण लवकरात लवकर पैसा उभा करणे गरजेचे होते. कारण आत्ता सैन्यामध्ये हुरूप होता, लढण्याची हुरहुरी होती. त्या शक्तीचा वापर करून घेणे गरजेचे होते.

म्हणून आता वासुदेवरावांच्या सैन्याने आपला मोर्चा गावातील लुबाडू आणि धनिक सावकारांकडे वळवला. त्यासाठी प्रथम पुण्याजवळील धामरी या गावाची निवड करण्यात आली. त्याआधी वासुदेवरावांनी आपल्या पत्नीला आणि मुलाला माहेरी सोडून आले. खरेतर गोपिकाबाईंचे माहेरी जाण्याची तयारी नव्हतीच. त्यांनाही या स्वातंत्र्याच्या मोहिमेत सहभागी व्हायचे होते आणि त्यासाठीची तालीम देखील घेतली होती. परंतु ह्या सेनेमध्ये एकही स्त्री नव्हती त्यामुळे कशीतरी समजूत काढून वासुदेवरावांनी त्यांना माहेरी जाण्यास तयार केले.

आता पहिल्या मोहिमेची तयारी झाली होती. सेना धामरी गावात येऊन पोहोचली. आधी त्यांनी गावातील चौकामधे उभे राहून स्वातंत्र्य लढ्यासाठी काही पैसे उधार देण्यासाठी दवंडी पेटली. पण उपयोग शून्य. शेवटी त्यांनी गावच्या सावकाराची तिजोरी लुटली. या नंतर एकामागून एक असे ३-४ छापे घेतले. पण इकडे या लुटीच्या बातमीने सरकार मात्र चांगलेच हादरले होते. सरकारने वासुदेवरावांच्या सेनेमागे चांगलेच हाथ धुउन लागले. पण छाप्याच्या बातम्यांपेक्षा अधिक त्यांच्या हाथी काहीच लागत नव्हते. जनतेमध्ये लोक वासुदेव बळवंत फडक्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा अवतार समजू लागले आहेत. हे समजल्यावर तर सरकारचे धाबेच दणाणले.

त्याच् पाठोपाठ एके दिवशी पुण्यात सगळीकडे पत्रके लावण्यात आली. "हिंदुस्थानी जनतेची अन्नान दशा झाली आहे. रोगराईमुळे माणसे तडफडून मरत आहेत. या सर्वांना खायला अन्न व जगायला पैसा सरकारने दिला पाहिजे. ते जमत नसेल तर हा देश सोडून चालते व्हावे. अन्यथा आम्ही तुम्हाला हाकलू - वासुदेव बळवंत फडके.’’

प्रथमच कोणीतरी आपल्या नावासकट उघडपणे अशी पत्रके लावण्याचे धाडस करत होता. त्यामुळे जनतेतही एक चैतन्याचे आणि विद्रोहाचे वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. आता मात्र सरकारला १८५७ च्या उठावाची आठवण होउ लागली. त्यामुळे परिस्थिती आपल्या हाथाबाहेर जाण्यापूर्वी सरकारने मेजर डॅनिअल या विशेष अधिकाऱ्याची नेमणूक वासुदेव बळवंत फडक्यानं पकडण्याच्या कामगिरीवर केली.

सरकारने वासुदेवरावांवर तब्बल ४००० रुपयांचे बक्षीस जाहिर केले आणि पुण्यात पत्रके लावली की, ‘वासुदेव बळवंत फडके याला पकडून देणाऱ्याला सरकार तर्फे ४००० रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.’



परंतु, लगेच दुसऱ्या दिवशी उत्तरादाखल वासुदेवरावांनी पत्रके लावली. त्यात म्हटले होते, ‘जो कोणी मुंबईच्या गव्हर्नराचे डोके आणून देईल त्याला आमच्या तर्फे ५००० रुपयांचे बक्षिस देण्यात येईल.’ मुंबईच्या गव्हर्नरालाच थेट आव्हान देणाऱ्या या घटनेची बातमी थेट लंडनपर्यंत पोहोचली.

आता मात्र वासुदेवराव सरकारला चांगलेच डोईजड होउ लागले होते. पण ही तर कुठे वासुदेवरावांच्या स्वातंत्र्यलढ्याची सुरुवात होती. अजून बरेच काम त्यांना करायचे होते. पण इकडे मेजर डॅनिअल देखील फडक्यांना पकडण्यासाठी दिवस-रात्र एक करत होता, गावामागून गावे पालथी घालत होता. या लढाईमध्ये कोण जिंकणार?, ध्येयाने आणि देशप्रेमाने भारलेली वासुदेव बळवंत फडक्यांची सेना की, आपली सर्व शक्ती आणि प्रचंड फौजफाटा आणि शास्त्रे घेउन उतरलेला मेजर डॅनिअल?

ही चित्तथरारक कहाणी आपण पुढील लेखामध्ये पाहू.

- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी

 

वासुदेव बळवंत फडके : युद्ध अर्थात भाग ४ वाचण्यासाठी येथे click करा.

bottom of page