top of page
Search

वासुदेव बळवंत फडके : युद्ध अर्थात भाग ४

वासुदेव बळवंत फडके : धाडस अर्थात भाग ३ वाचण्यासाठी येथे click करा.

 

मागील भागात आपण पाहिले की, त्यांनी शून्यातून सुरुवात करून मोठ्या कष्टाने सेना उभी केली. या सेनेमध्ये आता ३०० हून अधिक सैनिक स्वतःहून भरती झाले होते. पण त्यांच्या समोरचा सगळ्यात मोठा प्रश्न होता ते म्हणजे या कामासाठी लागणार पैसा कोठून आणायचा? यासाठी त्यांनी अनेक धनिकांचे उंबरठे झिजवले आणि अपमान सहन केले. अखेर त्यांनी काही छापे घालायला सुरुवात केली. त्याने तर इंग्रज सरकार वैतागून केले होते व वासुदेव बळवंत फडक्यांना पकडण्यासाठी ४००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले आणि बरोबरच मेजर डॅनिअल याची या कामावर खास नियुक्ती देखील केली.

एव्हाना डॅनिअला देखील वासुदेव बळवंत फडके म्हणजे काय चीज आहे याची चांगलीच कल्पना आली होती. कारण इतके प्रयत्न करून आणि दिवस-रात्र एक करून देखील अजूनपर्यंत डॅनिएलच्या हाती काहीच लागले नव्हते. अखेर त्याला गुप्तहेरांकडून खबर मिळाली की, वासुदेव फडक्यांची सेना सध्या कोकण प्रांतात आहे आणि तेथून ते मावळ प्रांतातून पुढे जाणार आहेत. बस! डॅनिएलने ठरवले आता यांना इथे मावळ प्रांतातच गाठायचे. त्याने आपले सारे सैन्य या भागाकडे वळवले आणि तिकडे जोराने कूच करू लागला. इकडे दौलतरावांनासुद्धा ही खबर लागलीच होती. त्यामुळे तेही जोराने आपला रस्ता काटू लागले. पण अखेर मावळ प्रांताच्या तोंडाशी डॅनिएलने त्यांना गाठलेच.

दोन्हीकडचे सैन्य एकमेकांवर तुटून पडले. तलवारी एकमेकांवरती आदळू लागल्या, बंदुकीच्या फैरी झडू लागल्या. सतत तीन-चार तास ही लढाईची धुमश्चक्री चालू होती. पण डॅनिएलच्या अजस्त्र सेनेपुढे वासुदेव बळवंतांच्या सेनेला युद्ध जड जाऊ लागले. अखेर दौलतरावाने वासुदेवरावांना मागील रस्त्याने निघण्यास सांगितले. कारण लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे.

पण युद्ध सोडून जाण्यास वासुदेवराव काही तयार होईनात. शेवटी अनेक प्रयत्नानंतर दौलतरावाने त्यांची समजूत घातली. कारण उरलेल्या सैन्याचे मनोबल वाढवण्यास आणि आणखी सैन्य उभारण्यासाठी वासुदेव बळवंतांसारख्या माणसाची गरज होती.

आता दौलतराव आपली बाजू सांभाळत होते, डॅनिएलला मारण्यासाठी अखेर त्यांनी शर्थ लढवली. पण अखेर या लढाईमध्ये दौलतराव मुत्यूमुखी पडले आणि वासुदेव बळवंत फडक्यांचा उजवा हातच गळून पडला. इकडे वासुदेवराव कर्नाटकात पोहोचले. तिथे त्यांना कळले की, दौलतराव पडले आणि जमवलेला पैसादेखील इंग्रज सरकारच्या हाती पडला. आता पुढे काय करावे हे त्यांना सुचेना. सगळे काही संपल्यासारखे वाटू लागले. आयुष्यच निरर्थक वाटू लागले. म्हणून ते शैल्यच्या मल्लिकार्जुन मंदिरामध्ये अन्न-पाणी त्यागून सात दिवस अनुष्ठानासाठी बसले.

तेथे ते आपले मागील आयुष्य आठवत होते आणि पुढील आयुष्याची गणित मांडत होते. तेव्हा असेच त्यांना एक प्रसंग आठवला. एकदा पुण्यात पोलिस आणि डॅनिएल त्यांचा पाठलाग करत होते. पोलिसांना हुलकावणी देत-देत वासुदेवराव ओंकारेश्वरची नदी पार करून पलीकडे असलेल्या मंदिरांमध्ये शिरले. पण त्यांच्या मागोमाग फौजदार वैद्य नावाचे एक पोलीस अधिकारी देखील त्याच मंदिरात शिरले आणि वासुदेवराव लपून बसलेल्या दिशेने चालायला लागले. पण त्यांनी आपल्या बंदुकीला हात न घालता सरळ वासुदेव बळवंतांच्या पायालाच हात लावून नमस्कार केला आणि म्हणाले, ‘’मी तुम्हाला या मंदिरात शिरताना पहिले आणि बाकी लोकांना इतर मंदिरात झडती घेण्यासाठी पाठवलेले आहे. तेव्हा ते कोणत्याही क्षणी येथे येतील. त्याआधी तुम्ही येथून निघा. मला तुम्हाला अटक करायचे पाप करायचे नाही. मी पोटासाठी इंग्रजांची चाकरी करतो आहे. माझे हात तुमच्या रक्ताने माखायला नकोत.’’ असे म्हणून त्यांनी वासुदेवरावांना या संकटातून वाचवले. असे एक ना अनेक वासुदेव बळवंतांना आले होते. अनेक लोकांनी त्यांना आपले जीवन अर्पण केले होते. पण आपण लोकांनी आपल्याला दिलेली जबाबदारी पार कशी पडायची हा त्यांच्यासमोर प्रश्न होता?

त्यासाठी ते तेथून पुढे हैदराबाद संस्थानात गेले. कारण आधी जमवलेले सारे सैन्य आता त्यांच्याबरोबर नव्हते. काही लोक विखुरले गेले, काहींचा ठावठिकाणाच नव्हता तर काही झालेल्या युद्धात मारले गेले. पण हा उभारलेला लढा थांबून चालण्यासारखे नव्हते. त्यामुळे वासुदेवरावांनी हैद्राबाद संस्थानातील आपल्या काही साथीदारांना बरोबरीला घेउन नवीन सैन्य उभारायला सुरुवात केली. त्यासाठी त्यांनी रोहिल्यांशी बोलणी केली व त्यांना आपल्या बरोबरीला घेतले.

इकडे मेजर डॅनिएल वासुदेव बळवंत फडक्यांना शोधण्यासाठी सारे मुलुख पालथे घालत होता. त्याने त्याच्या कार्यालयात चौकशी केली तर कळाले की, पुढील काहीही सूचना न देता वासुदेव बळवंत रजेवर गेले आहेत. त्याने त्यांचा पत्ता मिळवून त्यांच्या घरावर छापा घातला. तिथे त्याला अनेक शस्त्रे सापडली. त्याला गुप्तचरांकडून बातमी आली की, वासुदेव बळवंत सध्या कर्नाटकात आहेत.

आता पुनश्च सैन्य तर उभे राहिले, पण त्याची बाकीची व्यवस्था करण्यात गुंतलेले आणि पायपीट करणारे वासुदेवराव एकदा कर्नाटक सीमेवरील बुद्धविहारामध्ये काही वेळ विश्रांती घेण्यास थांबले होते. थकून-भागून आल्यामुळे त्यांना लगोलग पडल्या जागीच झोप लागली. पण, काही वेळाने मात्र त्यांना आपल्या छातीवर काहीतरी जड वजन ठेवल्यासारखे जाणवू लागले. त्यांनी डोळे उघडून पाहिले तर त्यांच्या छातीवर बसला होता मेजर डॅनियल.

या झोपेने त्यांचा घात केला. त्यांनी मेजर डॅनिएलला युद्धाचे आवाहन देखील दिले. परंतु डॅनिएलला त्याचे युद्ध कौशल्य दाखवण्यात रस नव्हता. तर इतके दिवस आपली झोप उडवणाऱ्या वासुदेव बळवंत फडके या व्यक्तीला बेड्या घालण्यामध्ये त्याला रस होता.

पुण्यातील सर्व लोकांना ब्रिटिश सरकारचा धाक बसवण्यासाठी वासुदेव बळवंतांना पुण्यातून फिरवण्यात आले आणि शेवटी तुरुंगामध्ये ठेवण्यात आले.या तुरुंगात मात्र त्यांच्या फार छळ केला जाऊ लागला. त्यामुळे त्यांनी फाशी घेउन आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला पण तो फसला. शेवटी त्यांच्या वर राणीसरकार विरुद्ध उठाव करणे, कट करणे, दरोडे घालणे आणि राजद्रोहाचे आरोप ठेवण्यात आले. पण सरकारच्या भीतीने त्यांच्या बाजूने कोणी वकील उभाच राहीन. शेवटी पुण्याचे सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाणारे गणेश वासुदेव जोशी ह्यांनी वासुदेव बळवंताच्या बाजूने उभे राहिले आणि म्हणाले, ‘सरकारच्या या दडपशाहीला मी घाबरत नाही. होउन होउन काय होईल तर एका वासुदेव बळवंताबरोबर हा गणेश वासुदेव देखील फाशी जाईल.’

पुढे चार दिवस खटला चालला. या चार दिवसात खटल्याच्या कामकाजात अनेक चढ-उतार आले, वाद-विवाद झाले. आता या खटल्याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते. वासुदेव बळवंत फडक्यांना शिक्षा होणार हे तर सर्वांना माहितीच होते. पण फक्त त्यांना फाशी होणार की काळ्या पाण्याची शिक्षा हाच प्रश्न होता. पण इतके असूनही वासुदेव बळवंतांचे धैर्य काही खचले नव्हते. ते अजूनही निधड्या छातीने या संकटांचा सामना करत होते.

त्यांच्या या पुढील लढ्याची कहाणी आपण पुढील शेवटच्या लेखामध्ये पाहू.


- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी


 

वासुदेव बळवंत फडके : 'नैनं छिन्दन्ति' अर्थात भाग ५ वाचण्यासाठी येथे click करा.

bottom of page