top of page
Search

वासुदेव बळवंत फडके : 'नैनं छिन्दन्ति' अर्थात भाग ५

वासुदेव बळवंत फडके : युद्ध अर्थात भाग ४ वाचण्यासाठी येथे click करा.

 

मागील भागात आपण पाहिले की, वासुदेव बळवंत फडके आपली दुसरी सेना उभारण्यासाठी हैदराबाद प्रांतामध्ये गुंतलेले होते. परंतु एकदा त्याच कामगिरीवर असताना कर्नाटकच्या सीमेवरील एका बुद्ध विहारात थकून-भागून काहीवेळ विश्रांतीसाठी पडलेल्या वासुदेवरावांना डॅनिएलने पकडले. तेथून त्यांना पुण्याच्या तुरुंगामध्ये आणण्यात आले आणि तेथे मात्र अतोनात छळ चालवला. त्याला कंटाळून त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न देखील केला. परंतु तो फोल ठरला. आशातच त्यांचे वकीलपत्र घ्यायला देखील कोणी तयार होईना.

कोर्टामध्ये सलग चार दिवस अनेक दावे-प्रतिदावे, वाद-विवाद झाले. या सर्वांमध्येच वासुदेव बळवंत फडक्यांचे एक साथीदार रंगा महाजन हे माफीचे साक्षीदार झाले व त्यांनी वासुदेवरावंविरुद्ध कोर्टात साक्ष दिली. त्यानंतर पाचव्या दिवशी वासुदेव बळवंतांनी आपले देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले असे निवेदन कोर्टात सादर केले त्यात ते म्हणाले, "देश पारतंत्र्यात असल्याचे मी सुतक पाळीत आहे. ईश्वराला माझी हीच प्रार्थना होती की त्याने माझे प्राण घ्यावेत, पण हिंदी प्रजासत्ताक स्थापून माझ्या देशबांधवांना सुखी करावे. मी व्याख्याने देत हिंडलो, पण उपयोग झाला नाही. आम्ही मूर्ख आहोत. आम्हाला त्वरित फायदा हवा. पण त्यासाठी त्याग करायला नको ! ज्या भूमीच्या पोटी आपण जन्मलो, तिच्याच पोटी सारी लेकरे झाली. त्यांनी अन्नान्न करीत मरावे. त्यापेक्षा देशभर बंड करून देशाच्या चारी कोपऱ्यांत वणवा भडकवण्याचा माझा बेत होता. त्याप्रमाणे इंग्रजांना हाकलल्यावर त्यांना वाचवण्यासाठी आकाशातल्या बापालाच खाली उतरावे लागले असते."

इतके परखड आणि सडेतोड निवेदन केल्यावर अखेर जे अपेक्षित होते तेच झाले. वासुदेव बळवंतांच्या साथीदारांना १०-१२ वर्षाच्या कारावासाची शिक्षा झाल्या तर वासुदेव बळवंतांना थेट काळ्यापाण्याची शिक्षा आणि तीही एडनच्या काळ्यापाण्याची जन्मठेप. ही शिक्षा ऐकल्यानंतर देखील वासुदेव बळवंत फडके अगदी स्थिर उभे होते.

त्यानंतर लगोलग ३ जानेवारी १८८० ला त्यांना ‘तेहरान’ या बोटीवरून मध्य आशियातील येमेन देशातील एडन याठिकाणी शिक्षा भोगण्यासाठी पाठवण्यात आले. हे एडन म्हणजे पृथ्वीवरील नरकच होता. वाळवंटातील ते रखरखत ऊन आणि समुद्रकाठची दमट आणि कोंदट हवा. अशातच वासुदेव बळवंतांना रोज 25 पौंड धान्य दळावे लागे आणि घाण्याला जुंपून तेल काढावे लागत. परंतु अशातही त्यांची जिद्द, देशासाठी लढण्याची हिंमत तसूभरही कमी झालेली नव्हती. म्हणूनच त्यांनी या तुरुंगातून पळून जाण्याचा एक धाडसी बेत आखला. पण तुरुंगाच्या भिंती १२ फूट उंच, हातात जाड बेड्या आणि तुरुंगाचे मोठे लोखंडाचे दार, त्याच्यावर असलेले मोठे कुलूप आणि बाहेर पडल्यावर पाय रुतणारी वाळू. हे सगळे अडथळे पार करणे महत्वाचे होते.

तो दिवस होता १२ ऑक्टोबर १८८०. त्यादिवशी योग्य वेळ पाहून वासुदेव बळवंत ही कामगिरी फतेह करायच्या कमी लागले. हातातील बेड्या त्यांनी तुरुंगाच्या गजाला घासून-घासून तोडल्या. त्यानंतर आजपर्यंत कमावलेल्या शरीरसंपदेच्या बळावर त्यांनी कोठडीची लोखंडी दारच उपटून काढले आणि तुरुंगाची १२ फूट उंच भिंत चढून त्यांनी पलीकडील वाळूत उडी मारली. अर्थात हे सर्व काही त्यांना अतिशय वेगाने आणि सावधगिरीने करावे लागले.

वासुदेवराव आता तुरुंगाच्या बाहेर तर आले. पण आता जायचे कुठे? शेवटी ते वाट फुटेल तिकडे पाय रुतणाऱ्या वाळूतून कसेबसे पळत सुटले. त्यानंतर ते चार तासात १२ मैलावरच्या बिर ओबेद या ठिकाणी जाउन पोहोचले. परंतु इकडे तुरुंगामध्ये इतका मोठा कैदी पळून केल्याचे काही फार काळ लपून राहण्यासारखे नव्हते. त्यामुळे लगोलग त्यांचा उंटावरून पाठलाग सुरु झाला आणि बिर ओबेदला त्यांना घेरण्यात आले व तेथून त्यांना परत एडनच्या तुरुंगात आणण्यात आले. पण आता जाड बेड्यांबरोबरच त्यांच्या गळ्यात कायम एक २५ किलोचा मोठा दगड बांधण्यात आला. त्यामुळे त्यांना आता उभे राहून चालणे शक्य होईना, जमिनीवरून खुरडत-खुरडत चालावे लगे.

मागोमाग तब्येत देखील खालावत चालली आणि आता मात्र जगणे असह्य झाले. अखेर १७ फेब्रुवारी १८८३ रोजी दुपारी चार वाजून वीस मिनिटांनी वयाच्या अवघ्या ३७ व्या वर्षी वासुदेव बळवंत फडके अनंतात विलीन झाले. तेथेच समुद्रकिनाऱ्यावर एडनच्या तुरुंगात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणारे डॉ. मनोहरपंत बर्वे यांनी त्यांचे दहन केले.

अवघे १३,६१९ दिवसांचे आयुष्य. पण किती दैदिप्यमान कारकीर्द, किती ते उतुंग देशप्रेम, केवढे ते झपाटलेपण.अशातूनच बंकिमचंद्र चटर्जी यांसारख्याना 'आनंदमठ' या आपल्या कादंबरीचा नायक वासुदेव बळवंत यांच्या रूपाने सापडला. आज ते शहीद होउन इतकी वर्षे लोटली तरी त्यांच्या नावामागील आद्यक्रांतिवीर हे बिरुद टिकून आहे. कारण कोणा एकाने इतक्या मोठ्या प्रमाणावर उभारलेला हा स्वातंत्र्ययुद्धातील प्रथमच लढा. यावरूनच आपल्याला हे नक्कीच कळू शकते की, दैदिप्यमान आयुष्यासाठी अशी झंझावाती फक्त ३७ वर्षे देखील त्यासाठी योग्य ठरू शकतात.


- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी

'वासुदेव बळवंत फडके' या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे click करा.

 

संदर्भ:

  • सत्तावन्न ते सत्तेचाळीस - वि.स.वाळिंबे

  • भारतीय क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके - सचिदानंद शेवडे

  • दुर्दम्य - गंगाधर गाडगीळ

  • लोकमान्य टिळक खंड २ - नरसिंह चिंतामण केळकर

  • Indian Revolutionaries(Vol. 2) - Shrikrishan Saral

bottom of page