top of page
Search

अंदमान : एक तीर्थ क्षेत्र

वीर सावरकरांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त 'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक

आणि The Leading Phase' सादर करीत आहे,


अंदमानला भेट देऊन आता दोन वर्षे झाली, पण त्या भेटीच्या सगळ्या खाणाखुणा मनात अगदी ताज्या आहेत. वीर सावरकर हे नाव उच्चारताच अभिमानाने उर भरून येतो, तसेच एका विलक्षण प्रतिभाशाली, देशप्रेमी व्यक्तीला किती खडतर आयुष्य वाट्याला आले, म्हणून मनाला वेदनाही होतात. सेल्युलर जेल मध्ये सावरकरांना सर्वाधिक काळ जेथे ठेवण्यात आलेले होते, ती काळकोठडी, खाली बरोबर तिच्या पुढ्यात असलेला तो वधस्तंभ. म्हणजे त्यांना वधस्तंभावरील व्यक्तींचे आक्रोश अगदी स्पष्टपणे ऐकू यावेत म्हणून मुद्दाम दिलेली ती काळकोठडी, कोलूला जुंपण्यात येई ती जागा हे सगळे बघून जणू तो काळ डोळ्यांपुढे येतो. तिथे दाखवण्यात येणारा "लेझर शो" बघताना, ऐकताना अंगावर सरसरून काटा येतो. हे सगळे अनुभवत असताना मनात आलेल्या भावना कवितारूपाने उमटल्या.

कारागृह पाषाणाचे, विरघळले, कळवळले, पाहून हाल वीराचे, त्या नयनि आसु ओघळले

द्रवले न हृदय आंग्लांचे, छळूनी त्या विनायकाला, पक्षिणी कुठुनशी येई, घावांना फुंकरण्याला....

​त्या जेलमध्ये सावरकरांना कैदी म्हणून देण्यात येणारी वागणूक एखाद्या दरोडेखोराला देण्यात ​येणाऱ्या शिक्षेहूनही भयंकर होती. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारांनी त्यांचा छळवाद करण्यात इंग्रज सरकार आणि जेलर बारी यांनी कुठलीच कमतरता ठेवली नाही. पण अशावेळी त्यांच्या उदास झालेल्या मनावर आणि जखमांनी भरलेल्या शरीरावर फुंकर घालण्याचे काम एक छोटीशी "बुलबुल" पक्षिणी करीत असे. जेलची रचना अशी होती, कि एक कैदी दुसऱ्याला पाहू शकत नसे आणि एकमेकांशी बोलण्याची सुद्धा त्यांना बंदी होती. म्हणून ते त्या पक्षिणीलाच आपल्या मनातील व्यथा सांगत असत असे म्हणतात.

बंदिवान केली काया, मन कसे बंधनी येई, प्रतिभा अलौकिक त्याची, उत्तुंग भरारी घेई

भिंतीचा कागद झाला, लिहीण्यास न होती शाई, शब्दांवरी शब्द उमटले, अमरकाव्य निर्मिती होई

​शरीराने ते बंदिस्त होते, पण त्यांच्या उत्तुंग प्रतिभेला कोण आणि कसे बांधणार? कारागृहात बऱ्याच कैद्यांनी साहित्यलेखन केलेले आहे, जसे कि टिळकांचे "गीतारहस्य", नेहरूंचे "भारताचा शोध", पण या कैद्यांना संदर्भग्रंथ मिळत, लिहायला लेखणी, कागद मिळत. हवा असलेला एकांत सुद्धा मिळत असे. पण विनायकाला लेखणी, कागद तर सोडाच, एखादा वृत्तपत्राचा कपटा सुद्धा जवळ ठेवण्यास सक्त मनाई होती.

त्यांनी जे "कमला" नावाचे महाकाव्य काळकोठडीत बसून कुठलीही साधनसामुग्री नसताना लिहिले, तशी निर्मिती करण्यासाठी एखाद्या कवीला, किमान २५-३० वर्षे, अनेक संदर्भग्रंथ, हजारो कागद, शाई हे सगळे नक्कीच लागेल, असे कुण्या इंग्रज कवीने म्हटले आहे. ​

विनायकाच्या मनातील घालमेल, त्याची असहायता जणु त्या पाषाणाच्या कारागृहाने जाणली. दगडाची पार्थिव भिंत पुढे आली, "पाषाणा पाझर सुटती रे" असेच काहीसे झाले असावे. या भिंतीवर त्यांनी कंटकांच्या साहाय्याने काव्याच्या ओळी चितारल्या. पूर्वी संत ज्ञानेश्वरांनी भिंत चालवल्याचे आपल्याला माहिती आहे, तसाच अनुभव या अलौकिक प्रतिभावान विनायकाला आला. कारागृहात वाङ्मय निर्मिती करणारे ते जगातले एकमेव कवी आहेत.

वेचिले यौवन अवघे, देशाच्या स्वातंत्र्यास्तव..राहून कोठडीतुनही, स्वप्ने देशाची भव्य..

जाणतो आजही आम्ही, त्यागाची तुमच्या महती, नतमस्तक होतो नकळत तुमच्या प्रतिमेपुढती

​आयुष्यातील उमेदीची १० वर्षे ​सावरकरांनी अंदमानच्या त्या काळकोठडीत काढली. पण त्यांनी देशाच्या सावतंत्र्याचा जो ध्यास घेतला होता, तो आंधळ्या प्रेमाने नाही तर डोळस भक्तीने घेतला होता, म्हणूनच ते म्हणतात, "देशभक्ताला प्रसाद बंदिशाळा, शृंखलांच्या गुंफिल्या पुष्पमाळा, चिता सिंहासन शूल राजदंड, मृत्यु दैवत दे अमरता उदंड|"

भारत देशाला जे स्वातंत्र्य मिळाले त्यात त्यांनी सुरु केलेल्या क्रांतीचा सिंहाचा वाटा होता, यात मुळीच संशय नाही. आणि म्हणूनच त्यांच्या प्रतिमेपुढे आपण नकळत झुकतो.

​कवितेच्या शेवटच्या ओळी आहेत, ​

कारा न राहिली कारा, मंदिर तिचे जाहले, स्पर्शाने विनायकाच्या, देवत्व कोठीला आले

काळे न राहिले पाणी, जणु अमृत त्याचे झाले, पुण्याचा प्रभाव कैसा, तीर्थक्षेत्र जन्मा आले..

असे मानतात, कि संत ज्ञानेश्वर हे कृष्णाचे रूप होते. महाभारतात कर्ण अतिशय चारित्र्यवान, गुणी, ज्ञानी असूनही त्याच्या वाट्याला जी अवहेलना आली, तिचे प्रायश्चित्त भगवानांनी ज्ञानेश्वर रूपात येऊन केले. म्हणूनच अतिशय लहान वयात "ज्ञानेश्वरी" सारखा ग्रंथ त्यांनी लिहिला. हेच दैवी गुण सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वात आपल्याला आढळतात. म्हणून अशा व्यक्तीच्या सानिध्यात राहून त्या कारागृहातील कोठडीला "देवत्व" प्राप्त झाले असे म्हणणे क्रमप्राप्तच आहे. आज आपण ते कारागृह बघण्यासाठी अगदी एखाद्या मंदिरात जावे, त्या भक्तिभावाने जातो. अंदमान हे आम्हा हिंदबांधवांसाठी एखाद्या तीर्थक्षेत्राहून नक्कीच कमी नाही.

त्यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.

- डॉ. अंजली देशपांडे






bottom of page