top of page
Search

अंबाघाटचा थक्क करणारा निसर्ग


निसर्ग हा माणसाचा सर्वात मोठा गुरु आहे, असे आपण म्हणतो. निसर्गातील प्रत्येक घटक, जसे वनस्पती, पक्षी, प्राणी, नद्या , समुद्र , अगदी लहानलहान कीटक देखील माणसाला खूप काही शिकवतात. फक्त त्याचे निरीक्षण करण्याची, आकलन करून घेण्याची इच्छा तेव्हढी हवी. लहानपणी हा निसर्ग बरेचदा अगदी घराच्या आजूबाजूला अनुभवायला मिळायचा. घराच्या मागे परसबाग असायची. त्यात फळांची झाडे, भाज्या आवर्जून लावली जायची. त्यावर कुठलीही कृत्रिम कीटकनाशक फवारणी होत नसे, कुठलेही कृत्रिम खत देखील वापरले जात नसे. फुलपाखरे, पक्षी अगदी मनसोक्त अंगणात बागडत असत. त्यांचे निरीक्षण करणे, हा नुसताच आनंदाचा भाग नाही तर नकळत घडणारा शिक्षणाचा देखील भाग असायचा. हे सगळे लहानपणी अनुभवल्यामुळे निसर्गाची आवड निर्माण झाली, आणि योगायोगाने समविचारी लोक भेटत गेले. निसर्गप्रेमी माणसे एकत्र भेटली की निसर्गाचा आस्वाद घेता येतो, हे आम्ही अनुभवयाला लागलो, जेव्हा विशाल, समीर, सुरेखा अर्चना, संदीप, हरजीत असे निसर्गावर मनापासून प्रेम करणारे, किंबहुना निसर्गाशी एकरूप झालेले मित्र भेटले. नुकतेच आम्ही कोल्हापूर जवळ असलेल्या "अंबाघाट" येथे जायचे ठरवले. ही जागा सभोवतालचा निसर्ग आणि सुखद वातावरण यामुळे देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण केंद्र ठरते आहे. मुख्य म्हणजे सर्व ऋतुंमध्ये येथला निसर्ग मनाला भूल पाडणारा आहे. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वसलेले हे निसर्गरम्य खेडे आहे. समुद्रसपाटीपासून २००० फूट आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच असे हे ठिकाण आहे. यापुढे खाली उतरले की कोंकण सुरु होते. तर अशा या 'अंबा' गावी समीरच्या मित्राचे "हिल व्ह्यू रिसॉर्ट" नावाचे रिसॉर्ट आहे, तेथेच राहायचे असे ठरले. त्याने पाठवलेले फोटो बघून तर कधी एकदा तिथे पोहोचतो असे झाले होते. आपले वाहन घेऊन गेले, तर पेठ नाका मार्गे किंवा कराड मार्गे, पुण्याहून साधारणतः ५ तासात अंबा गावात आपण पोहोचतो. पेठ चा रस्ता जरा चांगला आहे, त्यामुळे आम्ही तिकडून जाण्याचे ठरवले. सकाळी आठ वाजता निघून दुपारच्या जेवणाच्या वेळेस "हिल व्ह्यू रिसॉर्ट" ला पोचलो. अतिशय सुंदर चारी बाजूने जंगलाने वेढलेली ही जागा आहे. तेथील जेवण अतिशय रुचकर होते. पण आम्हाला घाई होती, जंगलात भटकायला जायची. सामान रूम्सवर ठेवले आणि आमच्या तेथील लोकल गाईडची वाट बघू लागलो. ठरल्याप्रमाणे साडेतीन वाजता तो आला. विजय असे त्याचे नाव, अगदी तरतरीत असा तिशीपस्तिशी चा तरुण आहे हा. निसर्गदर्शन करवणे हा जरी व्यवसाय असला तरी फक्त उपजीविकेचे साधन नाही तर तो निसर्गाची नस अन् नस जाणतो हे त्याला भेटल्याबरोबर कळले. सर्वप्रथम तो आम्हाला जवळच असलेल्या "अंबेश्वर" देवराई मध्ये घेऊन गेला. देवराईची संकल्पना त्याने एवढी सुंदर रीतीने समजावली की, एखादा उत्तम शिक्षकच. आणि आम्ही जणु त्याच्या समोरील अबोध बालके. देवराई म्हणजे एक समृद्ध असा जंगलाचा तुकडा. फार फार वर्षांपूर्वी लोक आजच्या नियमानुसार किंवा आजच्या मापदंडांनुसार शिकलेले नव्हते, पण आजच्या शिकलेल्या लोकांना पुढे जाऊन कशाची उणीव भासणार आहे, हे त्यांनी ताडले होते. जंगल तोडीला जेव्हा सुरुवात झाली, त्यावेळेस या लोकांनी देवाच्या नावाने हे जंगल राखून ठेवले, म्हणजे या जंगलाचा मालक, रक्षणकर्ता म्हणजे प्रत्यक्ष देवच. याचा सात-बारा देखील देवाच्या नावाने केलेला असतो. अशी रंजक माहिती त्याने दिली. एखादी व्यक्ती जेव्हा कुठल्या साथीच्या रोगाने आजारी होत असे, त्यावेळी ह्या देवराया "विलग्नवास" (Qurantine सेन्टर्स) म्हणून वापरल्या जात. अनेक प्रकारच्या दुर्मिळ औषधी वनस्पती येथे असायच्या, त्यामुळे रोग्याची देखरेख आणि वैद्यकीय उपचार येथे होत असत. महाराष्ट्रात २५०० हून अधिक देवराया आहेत. त्यातीलच एक ही. तर अशा या अंबेश्वर देवराईत अनेक दुर्मिळ वृक्ष वेली पुरातन काळापासून जतन करून ठेवल्या आहेत. जंगलात शिरताच दोन्ही बाजूंनी आपल्याला मोठमोठी वारुळे दिसतात. ती मुंग्यांची नाहीत तर वाळवीची वारुळे असतात. अगदी टीचभर असा हा प्राणी, पण बुद्धी अचाट. कान नाहीत, की डोळे पण नाहीत. पण ज्याला "स्थापत्यशास्त्राचा अप्रतिम नमुना" म्हणता येईल असा त्यांचा महाल असतो. महालाचा सर्वात उंच मनोरा म्हणजे राणीचे घर. तिथे मध्यभागी राणीचा गोलाकार पलंग असतो. हे वारूळ जमिनीखाली पाच फूट खोल असते आणि या वारुळात काय काय असते? तर एकत्रित होण्यासाठी गुरुत्वाकर्षणविरहित अशा नळ्या आणि विलग्नवास देखील. बरं, या टीचभर प्राण्यांना सतत वातानुकूलित जागी राहण्याची सवय असते. त्यामुळे त्यांच्या महालात, ऋतू कुठलाही असो, तापमान हे २५ अंश सेल्शिअस पेक्षा कमीच असते. तर अशा बऱ्याच गमतीजमती विजयने आम्हाला सांगितल्या. राणी जेव्हा या महालात पदार्पण करते, तेव्हा तिला सगळी प्रजा खाण्यासाठी विविध प्रकारची खाद्ये आणून देते. खाऊन खाऊन राणीसाहेब मोठ्या वीतभर लांबीच्या अळीचे रूप धारण करतात, अर्थात त्यांच्या पोटात अंडी असतात. या राणीचे वय देखील इतर प्रजेच्या तुलनेत खूप जास्ती असते. हिचे काम एकच, खायचे आणि अंडी घालण्याचे. बरेच गैरसमज असलेला हा पिटुकला जीव स्थापत्यशास्त्रज्ञांना आणि शाश्वत जीवनाचा ध्यास असणाऱ्यांना खूप काही शिकवून जातो हे कळले. वन परिसंस्थेतील ते सर्वात महत्वाचे घटक मानल्या जातात, कारण कुजणाऱ्या लाकडाचे ४० ते १०० टक्के रूपांतर त्या समृद्ध अशा मातीमध्ये करत असतात. म्हणजे अगदी साधे आहे, वाळवी राहिली नाही, तर जंगले टिकणार नाहीत आणि पर्यायाने मानवजात देखील नष्ट होईल. आम्ही हळूहळू पुढे जात होतो, इथे बकुळ, सोनचाफा, वाकेरी, वड इत्यादी अनेक वृक्ष बघायला मिळतात. सोनचाफ्याकडे तर मी बघताच राहिले. जवळपास २५ मीटर उंची होती त्याची. आपल्याला सोनचाफा बागबागांमधून दिसतो, पण एवढा उंच नाही. या सोनचाफ्याची देखील एक गंमत आम्हाला विजयने सांगितली. शिवाजी महाराजांचे राज कवी कविभूषण याना औरंगज़ेबाने स्वत:च्या स्तुतीपर काही बोलायला सांगितले. कविभूषण म्हणाले, सगळे राजे महाराजे म्हणजे या पृथ्वीतलावरील फुले आहेत. त्यांनी एकेका राजाला एकेका फुलाची उपमा दिली, कुणी गुलाब, कुणी केतकी तर कुणी जुई . औरंगजेब म्हणाला, "मग मी कोण?" यावर कविभूषण उत्तरले, "आपण महाभृंगराज आहात". औरंगजेब खूप खूष झाला. कारण सर्व फुलांवर तो सत्ता गाजवत होता असे प्रतीत होत होते. त्याने विचारले, "मग तुझा शिवाजी कोण आहे?", यावर ते उत्तरले, "ते तर सोनचाफा आहेत" "अलि नवरंगजेब चंपा सिवराज है" अशा त्या ओळी आहेत. सोनचाफ्यावर कधी भुंगा बसत नाही हे वेगळे सांगायला नको. कवी भूषण यांची संभाषण कुशलता आणि महाराजांवरचे प्रेम आणि विश्वास यातून दिसून येतो.

पक्षीनिरीक्षण करायचे तर अंधाराच्या आत योग्य त्या ठिकाणी पोचायला हवे. त्यामुळे आम्ही गडबडीने निघालो. प्रमोद त्याच्या बाईक वर होता आणि आम्ही आमच्या गाडीतून निघालो. थोड्याच वेळात मानोली धरण परिसरात पोचलो. हे विशाळगडाच्या वाटेवर स्थित कडवी नदीवरील धरण आहे. इथे पोचताच आमचा वर्ग पुन्हा सुरु झाला. प्रमोदने आम्हाला "नरक्या" हे एक झुडूपवजा झाड दाखवले. ही वनस्पती "कँसर" वर औषधी म्हणून वापरतात असे सांगितले. असाच नरक्या तुमच्या रिसॉर्ट जवळ आहे, तो देखील बघा असे आवर्जून सांगितले. जवळच एक पांढरट पिवळसर फुले लागलेले झुडूप होते. त्याचे नाव म्हणे, "दात पाडी". या झाडाचे पान जरी खाल्ले तर हिरड्या सुजून येतात आणि दात हलून पडू लागतात अशी माहिती मिळाली. त्याने आणखी एक वृक्ष दाखवला, त्याचे नाव हुरा, ज्याच्या पानांना हात लावला व तोच हात डोळ्यांना लावला तर माणूस दृष्टीहीन होऊ शकतो म्हणे. आम्ही आता भराभर खाली उतरू लागलो. तेथील पाण्याचा डोह बघून खूप प्रसन्न वाटले. येथे पाण्यात बोटिंगची सोय आहे, पण आम्हाला पक्षीनिरीक्षण करायचे होते. म्हणून तेथे थांबलोच नाही. नंतर आम्ही थोडे पुढे गेलो, वाटेत "Ficus Nervosa" हे झाड त्याने दाखवले. त्याला त्याने नातू म्हणून नाव ठेवले होते, थोडे पुढे गेल्यावर आम्हाला बाबा आणि आजोबा देखील भेटले, हे सांगायला नको. वेगवेगळ्या वयोगटातील झाडे येथे आहेत, हे आमच्या मनावर बिंबवले, किती साध्या संकल्पनेतून. ही जागा अतिशय सुंदर आहे आणि विविध प्रकारच्या पक्षांनी समृद्ध आहे. येथे आम्हाला मलबार व्हिसलिंग थ्रश(मलबार शीळ कस्तूर), येल्लो ब्रोड बुलबुल (पिवळ्या भुवईचा बुलबुल), व्हाईट बेल्लीड ब्लू फ्लायकॅचर ( पांढरी निळी माशीमार), ग्रेट पाईड हॉर्नबिल (महाधनेश), ग्रे हेडेड कॅनरी फ्लायकॅचर(राखी डोक्याची पिवळी माशीमार) इत्यादी अनेक पक्षी दिसले. त्यासाठी शांतपणे एका जागेवर आम्ही बसून राहिलो होतो. हा एक अतिशय सुंदर अनुभव होता. संध्याकाळची वेळ, रमणीय परिसर आणि त्यात फक्त पक्षांचा चिवचिवाट अतिशय सुखद वाटत होता. दिवसभर दमून ते जणू आजचा दिवस कसा गेला हे एकमेकांना सांगत होते. आता अंधारून येऊ लागले, त्यामुळे परतीचा मार्ग धरला. रिसॉर्ट वर येऊन पोचलो, तो सर्वत्र एक्झोरा (ixora) चा सुगंध भरून राहिला होता. आकाश जणू नक्षत्रांनी फुलून आलेले होते. गरमागरम चविष्ट जेवणाचा आस्वाद घेऊन तृप्त झालो. पण निसर्ग बघण्याची भूक कमी झाली नाही. त्यामुळे रात्री ११.३० वाजेपर्यंत जागेच होतो. सगळीकडे घनदाट जंगल होते. कुठून काही आवाज येईल म्हणून डोळ्यात तेल घालून आणि कानाशी प्राण आणून बसलो, पण एक सेंटीपीड आणि दोन रंगी बेडूक सोडून बाकी काही दिसले नाही. रात्री झोपूच नये असे वाटत होते. कुठूनतरी जंगली कोह्यांचा आवाज येईल असे वाटत होते. पण तसे कांही झाले नाही.

दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी ८ वाजता पुन्हा भटकंतीला निघालो. डोंगरमाथ्यावरून अंबाघाट बघण्यासाठी. आमचे वाटाडे होते, आमच्या रिसॉर्टचे मालक श्री. विवेक. सकाळची वेळ, सुखद गारवा, आणि जंगलातील वाट सगळेच मनाला मोहून टाकत होते. रस्त्यात असंख्य अंजनी, किंजळ ही झाडे होती. एक्झोरा (ixora) चा सुगंध तर सगळ्या वनात भरून राहिला होता. आम्ही डोंगराच्या माथ्यावर येऊन पोचलो, तेथे समोरच्या अनेक उंच झाडावर स्वागताला बसलेला "ओरिएंटल हनी बझार्ड" दिसला. कितीतरी वेळ तो बसून होता, पण अचानक एका कावळ्याने येऊन त्याला उडवून लावले. माथ्यावरचे पाठार सोनेरी पिवळसर रंगाच्या गवताने सजलेले होते. मधूनमधून काळेशार दगड वर डोके काढत होते. ही रंगसंगती बघून एखाद्या चित्रकाराला भूल पडली नाही तरच नवल. संध्याकाळी या परिसरात विंचवाचे साम्राज्य असते अशी माहिती आम्हाला मिळाली. अधूनमधून गव्यांचे पाउल ठसे, विष्ठा अशा खाणाखुणा बघायला मिळाल्या. आणि तेव्हढ्यावरच समाधान मानावे लागले. येथे फोटोग्राफी करून आम्ही परत निघालो. वेगवेगळी फुलपाखरे बागडताना दिसत होती. "डे फ्लायिंग मॉथ" भरपूर दिसले. पण विशेष मनमोहक होती वेगवेगळी गवतफुले. इंदिरा संतांची "रंग रंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुलाअसा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा" कविता आठवली. आम्ही सारेच तहानभूक विसरून फुलांचे फोटो टिपू लागलो. अचानक गुलाबी रंगाची फुले आम्हाला दिसली. पण जरा जवळ जाऊन बघतो तो काय, चक्क एका छोट्याशा फुलपाखराला एका फुलासारख्या दिसणाऱ्या "कीटकभक्षी " वनस्पतीने (type ऑफ drosera ) आपल्या विळख्यात घेतले होते. हा निसर्ग मनात साठवत साठवत आम्ही रिसॉर्ट वर परत आलो. वऱ्हांड्यात बसून निसर्गाकडे बघत बघत कांदेपोहे आणि चहाचा आस्वाद घेतला. आमचे अंबाघाटचे वास्तव्य आता संपत आले होते. श्री. विवेक यांनी आम्हाला तेथे अनुभवलेल्या घटना सांगितल्या. त्यांनी एकदा एक कुत्रा तेथे ठेवला होता, पण तो बिबट्याने पळवून नेला. जवळच्याच पाणवठ्यावर उन्हाळ्यात गवे आणि जंगली कोल्हे बघावयास मिळतात असे सांगितले. त्यामुळे आता पुढची ट्रिप उन्हाळ्यात करायचीच असे ठरवून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. परतताना मनात हेच विचार येत होते की, एवढ्या संपन्न निसर्गाचे वरदान आपल्याला लाभलेले आहे, ते आपण जपून ठेवले पाहिजे, प्रगतीचा हव्यास जर वाढतच राहिला तर आपण या निर्भेळ आनंदाला तर मुकणारच आहोत, पण आपले आरोग्य देखील धोक्यात येईल. अशा ठिकाणी पर्यटन विकास तर व्हायला हवा आहे, पण त्याबरोबरच निसर्गाचा ह्रास होणार नाही काळजी घेणेही तितकेच जरूरी आहे. हे बांधकाम करताना लक्षात घेतले पाहिजे. पर्यटकांनी सुद्धा तेथील शांततेचा, स्वच्छतेचा मान राखायला हवा. मी असे म्हणेन की ये परबत, ये नदिया, ये पेंडोंके साये नसिबो से हमने विरासत में पाये, हैं रखना हमें अब इनको संभाले बचाना हैं ताकी कहीं खो न जाये....

- Dr. Anjali Deshpande

bottom of page