आई पणाचे ओझे : अपर्णा तामसकर

“आई, तू मला बास्केट बॉल मध्ये जाऊ दिले नाही म्हणून माझी हाईट वाढली नाही” माझ्या लेकीने माझ्यावर बॉम्बगोळा टाकला. बास्केटबॉल टीम मध्ये जाऊ दिले नाही कारण शाळा सुटल्यानंतर एकटी घरी कशी येणार? स्कूल बस निघून गेली असती. माझे ऑफिस असल्यामुळे घ्यायला कोण जाणार? त्यावेळी सुरक्षितता हा जास्त महत्त्वाचा मुद्दा होता. “आई, तु मला इंजीनियरिंगला टाकलं नसतं तर मी माझं लाइफ अजून एन्जॉय केलं असतं. अकरावी बारावीला सायन्स देऊन मला टॉर्चर केलं. मला आर्ट्स घ्यायचं होतं.” “माझा त्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय चुकला. तू मागे लागली नसती तर मी दुसरा विचार केला असता.” असे मुलांचे अनेक सुसंवाद आईला सतत ऐकावे लागतात. बरेचदा आपण एखाद्या गोष्टीला प्राधान्य देऊन निर्णय घेतो. कधी ते निर्णय बरोबर निघतात कधी चुकतात. भविष्यात काय वाढून ठेवलंय याची कल्पना कुठे असते ? पण आपल्या प्रत्येक न्यूनतेचे खापर फोडायला आई मात्र हवी असते.
खरं म्हणजे आपल्या संस्कृतीत सांगितल्याप्रमाणे आठव्या वर्षी आई आणि वडिलांची गरज संपते. आणि मुलगा गुरुकुल मध्ये जातो. स्वतःच्या आयुष्याची वाटचाल करायला. पण आजकाल तीस-पस्तीस वर्षांचे झालेले मुलं स्वतंत्र होत नाहीत व आपल्या प्रत्येक निर्णयाला आई-वडिलांना जबाबदार धरतात. अर्थात नेम नियमां बद्दल जर आईवडिलांनी बंधने घातली तर त्यांना त्यांचं वय आठवते. आज-काल मुलांना कुठलीही आलोचना सहन होत नाही. अनिर्बंध वागायचं आणि आई-वडिलांना गृहीत धरायचे. अठराव्या वर्षी कुठल्या शिक्षण क्षेत्रात प्रवेश घ्यायचा हे ठरवण्या इतपत सुद्धा मुलाची वाढ झालेली नसते. आई वडिलांनी घेतलेला निर्णयही मनापासून स्वीकारायचा नाही आणि स्वत:च्या अपयशाचा दोष पालकां वर टाकायचा. वडिलांपेक्षा आईला सतत गृहीत धरण्यात येते. आई म्हणजे एक पंचिंग बॅग असते. स्वत:च्या मनावरचा ताण कमी करण्याची एकमेव जागा.
अर्थात याला काही चांगले अपवादही असतील. परंतु अधिक तर आज-काल घरोघरी हेच चित्र दिसते.
आईच्या हातच्या जेवणाची न विसरणारी चव, तिचा मायेचा स्पर्श, या सगळ्या गोष्टी मागे पडतात पण तरीही आई हवी असते, आपल्या आयुष्यातील कमतरतेसाठी जबाबदार धरायला. आई नव्वद वर्षांची झाली तरी साठ वर्षांची मुलगी आईला ऐकवते, “आई तुझ्या मुळे माझ्या आयुष्याचं नुकसान झाले.” कंप सुटलेले शरीर, धूसर झालेली दृष्टी असूनही सगळा जीवनपट काल घडल्याप्रमाणे डोळ्यासमोर तरळतो. अनेक आठवणींचे मोहोळ उठते. आईजवळ उत्तरे असतात पण ती थकून जाते कारणे देऊन. कारण समोरच्या व्यक्तीची चुका स्वीकारायची आणि जबाबदारी घ्यायची तयारीच नसते. आई शेवटी सगळे आरोप स्वीकारत शांत राहते. बहुतेक म्हातारपणी होणाऱ्या स्मृतिभ्रंशाचे हेच तर कारण नसावे? कधीकधी विस्मरण हेच उत्तम औषध असते थकलेल्या मेंदू साठी. मग फक्त निवडक, स्वत:च्या लहानपणच्या, मुलांच्या लहानपणीच्या, आनंद देणाऱ्या आठवणीच मन घट्ट धरून राहत असेल.
मुलांनी केलेल्या आरोपांनी विचलित न होता, त्यांच्यावरती तेवढच प्रेम करत राहायचं, त्यांच्या प्रत्येक आनंदाने नाहून निघायचं. आई पणाचं हे ओझं वागवायचे पण अलिप्त राहायचं, म्हणजे तपस्याच आहे. मला वाटतं आईला माणूस म्हणून आपण स्वीकारतच नाही आणि आपण कधी मोठे होतच नाही. माणूस म्हणून आईकडून काही चुका होऊ शकतात हे जर मुलांनी स्वीकारले आणि मुलांनी स्वत:च्या आयुष्यातल्या निर्णयाची जबाबदारी स्वीकारली तर आयुष्य अजून सोपी होईल. अर्थात यासाठी आईकडून पण प्रयत्न व्हायला हवेत. मुलांना स्वतंत्र निर्णय घेऊ देणे आणि निर्णय चुकला तर परिणामांची जबाबदारी पण घेण्यासाठी प्रशिक्षण देणे गरजेचे आहे.
आईला देवत्वाच्या मखरात बसवायचं आणि सतत अपेक्षांचं ओझं तिच्यावर लादायचं. आईसुद्धा हे ओझं फार प्रेमाने बाळगते. हे कदाचित सामाजिक बंधनांमुळे असेल.
पण हा आईपणाचा भार कधीकधी सहन होत नाही आणि आई शरीरासोबत मनाने पण थकत जाते.
आई पणाचे हे ओझे सोसण्याची ताकद संपते. कदाचित हा भार थोडा हलका झाला तर म्हातारपण अजून सुखकर होईल.
म्हणून आई पणाला पण मर्यादा असायला हवी. सगळे विकल्प मागे सोडून, नि:संग होऊन आनंदाची वाटचाल करायला हवी. कदाचित तिथेच मोक्ष गवसेल.
- अपर्णा तामसकर

Listen Our Podcast on Your Favorite Platform:
Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor
Follow Us on Social Media Platforms: