top of page
Search

आठवणीतील गणेश उत्सव

हिंदू संस्कृतीत आपण अनेक देव देवतांची पूजा करतो. पण गणपती या देवतेला आपल्या जीवनात एक वेगळेच स्थान आहे. कुठल्याही शुभकार्याच्या आरंभी याची पूजा होते. बरेच भाविक महिन्यातून एकदा संकष्टी चतुर्थी चा उपवास मनोभावे करतात आणि गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा, भाद्रपद महिन्यातील शुक्लपक्षाचा काळ हा तर बाप्पाच्या भक्तांसाठी पर्वणीचा काळ असतो.

माझ्या लहानपणी घरी १० दिवस बाप्पाची गोंडस अशी मूर्ती देवघरात विराजमान असायची. त्याच्या स्वागताची जय्यत तयारी असायची. देवघरात नवीन रंग दिला जायचा. देवघरात खूप सुंदर लाकडी कोरीव काम केलेले मखर होते. त्याला चंदेरी रंग दिला जायचा. दिव्यांची आरास केली जायची. सकाळ-संध्याकाळ पूजा, आरती, प्रसाद असा त्रिवेणी संगम असायचा आणि एकत्र कुटुंब पद्धत असल्यामुळे सारे घर टाळ्या आणि टाळाच्या गजरात निनादून जायचे.

आता असे वाटते की तेव्हा किती वेळ असायचा आमच्याकडे. आम्ही शेजारपाजारची लहान मुले मिळून घराच्या आवारात एक आमचा असा बाप्पा आणत असू. मोठा सार्वजनिक गणेशोत्सव होता तो आणखी वेगळा.

आमच्या या बाप्पासाठी आम्ही आपल्या खाऊच्या पैशातून पैसे वेगळे काढत असू. घरातील मोठी मंडळी देखील आम्हाला मदत करीत. बाजारात जाऊन बाप्पाची मूर्ती आणायची, त्याच्या स्थापनेसाठी ८-१० दिवस आधीपासून साफसफाई, सजावट हे सगळे काम सुरू व्हायचे. कुठले काम कोणी करायचे, कुठल्या गोष्टींसाठी किती पैसे खर्च करायचे, कुठल्या कामाला किती वेळ द्यायचा, हे सगळे आम्ही नकळत शिकलो. वेळेचे व साधनांचे व्यवस्थापन आणि कुशल हाताळणी, संघटन कौशल्य हे शब्द देखील तेव्हा माहित नव्हते.

याशिवाय सजावट कशी करायची, कुठले कार्यक्रम आयोजित करायचे, हा कलेचा भाग देखील त्यात आला.

मला त्यावेळेचा एक गमतीदार प्रसंग आठवतो.

'अती तिथे माती' नावाची एक द.मा. मिरासदार यांची नाटुकली आमच्या चौथीच्या पाठ्यपुस्तकात होती.

त्यात राजाच्या दरबारात आलेल्या एका गायकाच्या गाण्यावर खूष होऊन राजा त्याला विचारतो की, ‘आम्ही तुमच्यासाठी काय करावे?’ गायक म्हणतो, "सध्या गाण्याला वाईट दिवस आलेले आहेत, त्यामुळे त्यासाठी काहीतरी करा." राजा लगेच दवंडी पिटवतो की, "आजपासूनी सर्व बोलणे, व्हावे केवळ गाणे"

आणि त्यानंतर जी काही धमाल येते, ती अफलातूनच.

हे नाटक करताना एकाच व्यक्तीला, दोन दोन पात्रांचे काम वठवावे लागले. त्यात एक नाटकात एवढी रंगून गेली की वेळेवर कपडे बदलणे विसरून गेली व शेवटी स्त्रीवेषात पुरुषाचे संवाद तिला बोलावे लागले. त्यामुळे तर आणखीनच धमाल आली.

अशाच छोट्या छोट्या प्रसंगातून आम्ही स्वप्रेरणेने शिकत गेलो. आणि हा बाप्पा खऱ्या अर्थाने आमच्यासाठी बुद्धीची देवता ठरला.

आजच्या अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने, त्याच्या चरणी माझी वंदना...


गजवदना गौरीनंदना, विद्याधीशा गजानना..

आशिर्वच दे कार्य सिद्धीला, तव चरणी रे ही प्रार्थना॥धृ॥


वक्रतुंड तव रूप मनोहर, सिंदूरचर्चित विलसे काया,

कंठी शोभे हार साजिरा, पीतांबर कटी, झळके तुझिया

तेजोमय तव मंगलदर्शन, प्रसन्न करिते माझ्या मना॥१॥

सुखकर्ता रे तू, दुखहर्ता,

संकटी तारसी भक्तगणा,

बुद्धीला दे स्थिरता अमुच्या, सिद्धिविनायक दयाघना,

चिंतनी तुझिया सदा रमो मन मन, पूर्ण होऊ दे, मनोकामना॥२॥


तुझ्या कृपेने सदैव मन हे राहो सात्विक आणि निर्मळ,

तव प्रेमाचा झरा वाहू दे, अमुच्यासाठी अखंड खळखळ,

सदा राहू दे विनम्र वाणी, अहंकार ना स्पर्शू दे मना॥३॥


- डॉ.अंजली देशपांडे

दिनांक : १ सप्टेंबर २०२०


bottom of page