शस्त्रक्रिया-भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान -भाग 1
या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी खालील links वर click करा.
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 1
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 2
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 3
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 4

आयुर्वेद म्हणजे भारतीय संस्कृतीतील व समाज जीवनातील एक अविभाज्य भाग. वेद, शास्त्रे आणि पुराणे यांच्या इतकाच जुना हा शास्त्र प्रकार. परंतु आज आपल्याकडील आपली संस्कृती आणि इतिहास म्हणजे मागासलेले आणि पाश्चात्य जगाकडून आलेले सर्व काही चांगले हा पूर्वग्रह दूषित चष्मा न लावता, परंतु जे आहे ते आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवरच तोलून या साऱ्याचा रंजक परिचय करून घेऊयात.
२१ व्या शतकात Medical Science एवढं अद्ययावत झालं आहे की, ज्यात लेझर सारख्या यंत्रांनी विविध शस्त्रक्रिया सुलभ आणि सोप्या झाल्या आहेत. Appendectomy, Cataract Surgery, Plastic Surgery अशा अनेकविध शस्त्रक्रिया काही मिनिटात किंवा तासात करणे आज शक्य आहे. पण मी जर तुम्हाला सांगितले की, अश्या कित्येक शस्त्रक्रिया ५००० पेक्षा अधिक वर्षांपूर्वीपासून आपल्या या भारत देशामध्ये केल्या जात आहेत,तर….....
अर्थात तुम्हाला ही अतिशयोक्ती वाटेल, काही जणांना तर हा आपल्या संस्कृतीचा आणि फक्त दंतकथा असणारा इतिहास आहे असे देखील वाटेल. पण हा अभ्यास आहे तो म्हणजे, वैद्यकाच्या इतिहासातील शाश्वत अशा आयुर्वेद वैद्यकशास्त्राचा. अत्यंत प्रेरणादायी रंजक आणि तितकाच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त शास्त्रशुद्ध आहे.
अथर्ववेदाचा उपवेद असलेल्या आयुर्वेदात आचार्य सुश्रुत व त्या काळातील शल्यतंत्र म्हणजेच आजच्या भाषेतील सर्जरीचे वर्णन आढळते. पण त्याही पूर्वी वेदांमधील वर्णनात अश्विनीकुमार हे देवतांचे वैद्य म्हणून प्रचलित होते. याच अश्विनीकुमार या वैद्य जोडीचे किमान ४०० वेळा तरी ऋग्वेदामध्ये वर्णन आलेले आहे.
Prosthetic implant of artificial limb surgery म्हणजेच कृत्रिम पाय बसवण्यासारख्या आधुनिक शस्त्रक्रिया केल्याची काही उदाहरणे देखील आपल्याला आयुर्वेदामध्ये पाहायला मिळतात. अशीच शस्त्रक्रिया प्रथम अश्विनीकुमार(देवतांचे वैद्य) यांनी विषपाला राणीवर केली होती. विषपाला राणीला युद्धामध्ये आपला पाय गमवावा लागला. तेव्हा त्या जागी अश्विनी कुमारांनी तिला लोखंडाचा पाय बसवून दिला. त्या नंतर ती राणी युद्ध लढल्याचेही वर्णन ऋग्वेदात आहे. त्याचबरोबर त्यांनी दधिची ऋषिंकडून विद्या शिकण्यासाठी त्यांचे शिर काढून अश्व शिर म्हणजे घोड्याचे डोकं बसवले आणि विद्याप्रप्ती नंतर पुनः पाहिले शिर लावले असे वर्णन देखील आहे. अंध ऋजाश्वास दृष्टी दिली,प्रसव अयोग्य गायीस(जिला गर्भधारणा होत नव्हती) प्रसव योग्य बनवले असे एक ना अनेक संदर्भ सापडतात.
जेव्हा सिंधू नदीच्या खोऱ्यातील उत्खननात मोहेंजोदारो हे शहर सापडले तेव्हा त्याचा अभ्यास केला असता असे लक्षात आले की, इसवी सन पूर्व आठवे शतक किंवा(त्या आधीपासूनच काही शतके) हा भारतीय शल्य विद्येचा सुवर्णकाळ होता असं म्हटलं तर त्यात काही वावगे ठरणार नाही. याचं कारण म्हणजे आचार्य सुश्रुत. ज्यांना फादर ऑफ सर्जरी म्हणतात यांचा हा काळ आहे. शल्यतंत्र आणि त्याच्या विविध पैलूंचे विस्तृत वर्णन सुश्रुत संहितेत आढळते. यामध्ये सुमारे 100 हून अधिक शस्त्रे म्हणजेच हत्यारे ज्याला Surgical Instruments असं आपण म्हणतो ती आजही आधुनिक सर्जरीमध्ये जशीच्या तशी वापरतात. सुमारे तीनशे च्या आसपास शस्त्रक्रियांचे वर्णन, तसेच मेंदूवरील शस्त्रक्रिया, कान नाक यांच्यावरील शस्त्रक्रिया, ज्याला आज प्लास्टिक सर्जरी असं आपण म्हणतो, त्याचबरोबर डोळ्याच्या ही कठीण असणाऱ्या शस्त्रक्रिया, शालाक्य म्हणजे खांद्याच्या वरच्या भागातील शस्त्रक्रिया या मुख्य शस्त्रक्रियांचे वर्णन. तसेच शस्त्रक्रियेनंतर ती जागा शिवण्याचे, निर्जंतुक करण्याचे उपाय, कातडे शिवणे, पोट उघडणे, मुतखडा काढणे, मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया आणि जन्मताच असणारे ओष्ठभंग(फाटलेले ओठांची शस्त्रक्रिया) या व यासारख्या अनेक शस्त्रक्रियांचे वर्णन सुश्रुतांनी पाच हजार वर्षापूर्वी लिहून ठेवले आहे.
आज आपल्या पुराणांचा, वेदांचा, आयुर्वेदिक संहिता ग्रंथांचा अभ्यास भारतापेक्षाही पाश्चिमात्य जगात अधिक वेगाने चालू आहे. जर्मनी मधल्या टॉप १४ विद्यापीठांमधे संस्कृत या विषयाचे कोर्सेस आणि संस्कृत ग्रंथ साहित्यांचे भाषांतरं, रिसर्च सुरू आहेत याची आपल्याला कल्पनाही नसेल.पातंजल ऋषींचा ‘योग’ जगाच्या प्रत्येक कोपऱ्यापर्यंत पोचला, परंतु आपल्या देशात किती लोक योग अभ्यास करतात? आपल्या ग्रंथांचे इतर देशांकडून भाषांतर होऊन हाच योग आपल्यासमोर ‘Yoga’ म्हणून आला की तो आपल्याला समजतो आणि एक status symbol होतो.
आपण जेव्हा Father of Surgery असं जेव्हा Google वर शोधू (सर्च करू) तेव्हा आचार्य सुश्रुत यांचे वर्णन दिसते. तेव्हा कोण होते हे आचार्य सुश्रुत?
आयुर्वेदामधे खरंच पूर्वीच्याकाळी सर्जरी होत होत्या का? आज उपलब्ध असणारी कोणतीही अद्ययावत तंत्रज्ञानाची (उदाहरणार्थ एक्स-रे, सोनोग्राफी, MRI) साधने नसतानाही शरीरातील अवयवांचा कोणत्या प्रकारे अभ्यास केला जात असे? मेंदू, ह्रदय, पोट, डोळे अश्या अत्यंत अवघड व नाजूक शस्त्रक्रिया कशा केल्या जात असतील? टाके घालणे,जखमेच निर्जंतुकीकरण करणे हे तेव्हा नक्की कसं होत असावं बरं?
अशा या अनादी अनंत आयुर्वेद शास्त्रातील शल्य विषयक अनेक प्रश्नांची उत्तरे आणि त्यातील रंजक कथा आपण या लेख मालिकेत पाहू.