शस्त्रक्रिया:भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान- भाग 3
या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी खालील links वर click करा.
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 1
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 2
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 3
भारतीय इतिहासातील एक सोनेरी पान भाग 4
मागच्या लेखामध्ये आपण सुश्रुत आचार्य कोण होते इथे पासून त्यांच्या संहितेत काय काय विषय आणि पैलू समाविष्ट आहेत यांचे वर्णन संक्षेप रुपात पाहिले. आता आपण सुश्रुत संहितेत असणाऱ्या काही ‘न भूतो न भविष्यती’ अशा काही महत्त्वाच्या आणि आजही ज्यांच्यासाठी जगभरात आयुर्वेद ओळखला जातो त्या अग्नी कर्म,रक्त मोक्षण आणि प्लास्टिक सर्जरी अर्थात संधान कर्म यांच्या वर प्रकाश टाकू.
तत्काळ वेदनाशामक क्रियेसाठी आणि व्याधींचा पूनरुद्भव टाळण्यासाठी काय उपाय सुश्रुत आचार्यांनी सांगितला असेल?
अग्नी कर्म आणि रक्तमोक्षण यांचं वर्णन केलं आहे.
1.अग्नीकर्म – अग्नीच्या साहाय्याने जे कर्म करतात त्याला अग्नि कर्म म्हणतात म्हणजेच विविध उपकरणांचां वापर करून जिथे व्याधी किंवा वेदना आहेत तिथं चटका दिला जातो यालाच काही अंशी cautery शी तुलनात्मक वर्णन करता येईल. यात अर्श(मूळव्याध), संधीवात, व्रण, गाठी, ओठाचे रोग,त्वचा, मांस याचे रोग यांची चिकित्सा केली जात असे.पूर्वी वेदना शमनासाठी हे कर्म केले जायचे.मुख्यतः स्थानिक व्याधींवर अग्निकर्म चिकित्सा केली जाते. एखाद्या अवयवात असणारे दोष (जे विकार निर्माण करतात) सम अवस्थेत आणले जाते.याने व्याधींचा समूळ नायनट होतो.

2.रक्तमोक्षण – चिकित्सा स्वरूपात शरीरातून रक्त बाहेर काढण्याच्या क्रियेला रक्तमोक्षण किंवा रक्त विस्त्रावण असे म्हणतात.रक्त मोक्षण हा संपूर्ण शल्याचिकी अर्धा भाग आहे अस म्हणतात.सर्व व्याधिंमधे रक्त हेच मुख्य दुष्य(आश्रयस्थान) आहे म्हणून रक्त मोक्ष क्रिया व्याधींचा तत्काळ नाश करतात.पूर्वीचे वैद्य यासाठी विविध शस्त्र वापरत होते त्यात, शृंग (प्राण्याचे शिंग) आलाबु(भोपळा),जलौका(जळू नावाचा प्राण्याने रक्त काढणे),सिरावेध(रक्तवाहिनी ला छेद घेऊन दूषित रक्त काढणे),प्रच्छान(त्वचेवर छोटे काप घेऊन रक्त काढणे) या पद्धती होत्या.वेगवेगळे त्वचा रोग,कुष्ठ, व्रणातील वेदना शमन करण्यासाठी रक्त मोक्षण क्रिया केली जात असे.आता यातली शृंग पद्धती(पोकळ शिंगातून रक्त शोषून घेण्याची पद्धत) तेवढी वापरली जात नाही बाकी सर्व पद्धती आजही आपल्या देशात अनेक वैद्य सर्रास पणे वापरताना दिसतात.ज्याप्रमाणे शेताचा बांध तोडल्यावर शेतातील पाणी वाहून गेल्याने शाली तांदूळ नष्ट होतात त्याच प्रमाणे रक्त मोक्षणाने सर्व रोगांचा समूळ नाश होतो.

भारतीय वैद्यकशास्त्राच्या शिरपेचातील तुरा म्हणजे प्लास्टिक सर्जरी होय.तुटलेला कान किंवा नाक पुन्हा जोडता येऊ शकेल का?सुश्रुत आचार्यांनी अशा कोणत्या शस्त्रक्रिया सांगितल्या आहेत?
1. पूर्वीच्या काळी कानाची पाळी वाढवण्यासाठी अनेक वेळा कान टोचले जात असत,परिणामी यातून च कधीकधी कानाची पाळी फाटायची आणि तिचे 2 तुकडे लोंबायचे.सुश्रुत आचार्यांनी गालाच्या त्वचेचा वापर करून पाळी कशी जोडून द्यावी याचे विस्तृत वर्णन केले आहे.यालाच आज pedicle flap surgery म्हणतात.

2. नासा संधान अर्थात नाकाची प्लास्टिक सर्जरी – युद्ध किंवा तत्सम चकमकी झाल्या की हमखास नाक कापलेल्या अनेक लोकांचे संधान शस्त्रकर्म अर्थात प्लास्टिक सर्जरी सुश्रुत संहिता मधे आली आहे.नाकाच्या तुटलेल्या प्रमाणात वृक्ष पत्र घेऊन त्याच अकर प्रकारचे मांस गालावर किंवा कपाळावर या प्रकारे छेदन करावा की तो एक बाजूस जोडलेला रहावा आणि दुसऱ्या बाजूला भग्न नाकाच्या भागात जोडला जाईल, नंतर सावकाश त्यांचे सीवन करावे(शिवून घ्यावे) अशा प्रकारे या शस्त्रक्रिया केल्या जात..याचं सोबत ओश्ठ संधान(फाटलेले ओठ जोडण्याची शस्त्रक्रिया) याही शस्त्रक्रिया अशाच प्रकारे केल्या जात असत.

शस्त्रक्रियेनंतर किंवा कोणत्याही छोट्या शस्त्र कर्मंच्या नंतर त्या अवयवाचे किंवा जखमेच निर्जंतुकीकरण पूर्वी कसे केले जात असावे?
सुश्रुत संहिता मधे आलेले व्रणाचे 60 उपक्रमात शेवटचा उपक्रम म्हणजे रक्षाकर्म होय, यामुळेच व्रण निर्जंतुक राहतो.गुग्गुळ,राल,वेखंड,मोहरी,निंबपत्र,यांचे चूर्ण गोघृतात म्हणजे तुपात मिसळून धूप करावा,त्या धुपन क्रियेने रुग्णाची खोली, त्याचे अंथरूण, पांघरूण, यांचेही धुपण करावे.हृदय व इतर महत्त्वाच्या ठिकाणी (मर्म) लेप लावले जात.त्याच बरोबर रुग्णाच्या खोलीमध्ये असणाऱ्या प्रत्येकाने मुखावर आवरण ठेवल्याशिवाय(रुमाल) शिंकु नये हसू नये किंवा जांभई देऊ नये याचेही वर्णन ग्रंथात केले आहे.धुपानासोबत विशिष्ट मंत्रोच्चार केले जात असत.मंत्रामुळे रोगी प्रसन्न राहतो त्याला वेदनांचा विसर पडतो व व्रण लवकर भरून येतात असेही वर्णन सुश्रुत संहितेत आहे.
अशा पद्धतीने शस्त्रक्रियेचे अनेक पैलू सुश्रुत यांनी वर्णन केले आहेत.याचं सोबत खांद्याच्या वरील शस्त्रक्रिया व उपचार पद्धती यांचे वर्णन शालाक्यतंत्र या विषयामध्ये केले आहे ज्यात डोळ्यातल्या मोतीबिंदू काढण्याची शस्त्रक्रिया,कानाच्या नाकाच्या आणि डोळ्याच्या अनेक व्याधी आणि त्यांच्या सोप्या पद्धतीने मांडलेल्या शस्त्रक्रिया यांचे वर्णन आपण पुढील लेखात पाहू.
-पुष्कर नाचणे