top of page
Search

केल्याने देशाटन-१

आमची भूतानची सफर ​

भाग १

 

"केल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार, मनुजा चातुर्य येतसे" असे म्हणतात.  पण मला देशाटन आवडते ते त्या देशातील सामान्य लोकांचे जीवन, निसर्गसौंदर्य, कला या गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी.. अमेरिका झाली, युरोप वारी झाली. पण त्यावर लिहिण्याचा योग आला नाही. अहो, एखादा लेख लिहिणे म्हणजे केवढा खटाटोप. थोडा निवांत वेळ काढून बसावेच लागते कॉम्प्युटर समोर. तसे मी अधून मधून काहीतरी लिहिते, पण पूर्वी वहीत लिहिलेले वाचून दाखवायला आणि ते ऐकायला कुणीतरी हमखास भेटत असे, आणि आई तर नेहमीच तयार असायची. असो.. यावर पुन्हा कधी.  भूतान बद्दल खूप वाचले होते. जगातला एक अद्भुत देश, जेथे फक्त शांतताप्रिय,स्वच्छताप्रिय आणिआनंदी लोक राहतात, हे ऐकून होते, त्यामुळेच एकदा तरी या देशाला भेट द्यायचीच हे निश्चित ठरवले होते. गेल्या महिन्यात अचानक माझ्या नवऱ्याने, प्रशांतने भूतान ला जाण्याचा बेत सांगितला  आणि मी खूप खूष झाले.  त्यात आमच्या सोबतीला आमचे जिवलग मित्र अविनाश आणि माधुरी देखील येणार होते, त्यामुळे आणखीनच उत्सुकता वाढली. जाण्याचा दिवस ठरवणे हे केवळ  विमानाच्या तिकिटांच्या उपलब्धतेवर अवलंबून होते, कारण तेथे फक्त दोनच मार्गाने विमान जाते, म्हणजे, कोलकाता-पारो किंवा दिल्ली-काठमांडू-पारो. यात कोलकाता-पारो  हा मार्गक्रम आम्हाला मुंबई आणि नागपूर दोन्हीकडून सोयीचा होता, त्यामुळे हि तिकिटे कधी मिळताहेत ते बघितले.  त्यानंतर लगेच केसरी या पर्यटन संस्थेकडे चौकशी केली.  तिथून कुठे जायचे, काय बघायचे हे सर्व ठरले आणि पटापट सगळी हालचाल सुरु झाली. तिकिटे काढली. केसरीतर्फे हॉटेल्स आणि गाडीची सोय झाली. आम्ही उत्साहाने तयारीला लागलो.  तिथे वातावरण कसे आहे? खाण्यासाठी काय मिळते? विकत काय घ्यायचे  अशा  चौकश्या सुरु झाल्या. नेट वर बरीच माहिती असते, पण प्रत्यक्ष जाऊन आलेल्या लोकांकडून मिळालेली माहिती हि मला जास्त मोलाची वाटते.  त्याला एक "पर्सनल टच" येतो. आम्ही जाणार आहोत हे ऐकून सगळ्यांनाच किती आनंद होत होता. जणू काही ते पुनःप्रत्ययाचा आनंद घेत होते. त्यात "तुम्ही या जागा मिस करू नका हं ", असा प्रेमळ सल्लादेखील मिळत होताच. पण आमच्याकडे असलेला वेळ बघून आम्ही ४ दिवस जायचे ठरवले. त्यात २ दिवस पारो, एक दिवस पुनाखा आणि एकदिवस राजधानीचे शहर थिम्पू असा बेत ठरला.  आम्ही मुंबईहून सोमवारी ११ डिसेम्बरला संध्याकाळी निघालो. रात्री कोलकत्याला मुक्काम करून, मंगळवारी सकाळी भूतान एअरलाइन्स चे ८ वाजताचे  विमान होते. सकाळी ६ ला कोलकत्याच्या "नेताजी सुभाष चंद्र  बोस " विमानतळावर  पोचलो.  चेक-इन केले, इमिग्रेशन ची फॉर्मॅलिटी कम्प्लिट केली आणि भूतान ला जाण्यास सज्ज झालो. पुढचे चार दिवस आम्ही वेगळ्या विश्वात असणार  होतो. आम्ही जसे  पारोच्या जवळ आलो, तसे लक्षात आले कि येथे सगळ्या टेकड्यांच्या मध्ये विमान उतरवणे किती कठीण काम आहे. पारो छू नदीच्या किनारी, जवळजवळ ५५५० फूट उंच अशा डोंगरांनी वेढलेले हे विमानतळ आहे. जगातील सर्वात कठीण विमानतळांमध्ये याची गणना होते. पण निसर्गाने आव्हान समोर ठेवायचे आणि मानवाने ते पेलायचे, हेही ठरलेलेच.


पारो विमानतळ

येथे विमान चालवण्यासाठी वैमानिकांना विशेष परवाना घ्यावा लागतो हे विशेष.. तर बरोबर १० वाजता आम्ही भूतान च्या जमिनीला स्पर्श केला.  विमानातून खाली उतरताच सारे प्रवासी पर्यटक अगदी लहान मुलांप्रमाणे सगळीकडे कुतूहलाने बघू लागले, साऱ्यांचे कॅमेरे सरसावले आणि भराभर फोटो काढायला सुरुवात झाली. अतिशय नयनरम्य अशा जागी, तेवढेच सुंदर विमानतळ अगदी शोभून दिसत होते. विमानतळाची वास्तू तेथील इतर इमारतींच्या प्रमाणेच रंगीबेरंगी दिसत होती. राजा आणि राणीचे मोठे छायाचित्र तेथे होते. आता आम्हाला उत्सुकता होती ती भूतान फिरण्याची.  आमचे सामान उतरवून आम्ही बाहेर आलो. तेथे आमच्या स्वागताला "नेपच्यून " या केसरीच्या संलग्न असलेल्या पर्यटक संस्थेचा प्रतिनिधी आणि अर्थातच आमचा वाटाड्या प्रशांतच्या नावाचा  फलक घेऊन उभा होता. त्याने आमचे सामान घेऊन गाडीत चढवले. आम्ही स्थानापन्न झालो आणि आमची गाडी निघाली. आमच्या गाईडचे नाव होते सोनम. अतिशय बडबड्या असा हा सोनम आम्हाला सर्वप्रथम आमचे राहण्याचे हॉटेल "ताशी नामगे रेसॉर्ट " इथे घेऊन आला. ताशी म्हणजे "चांगले" किंवा इंग्लिश मध्ये "गुड". नामगे हे व्यक्तीचे नाव.  हे रिसॉर्ट नावाप्रमाणेच छान होते. भरपूर फुलझाडे, अतिशय सुंदर आणि प्रशस्त अशा रूम्स, समोरून खळाळत वाहणारी "पारो" नदी, सारेच अगदी स्वप्नवत. येथे सर्व कामे मुली अगदी लीलया पार पाडतात. स्वागताला मुली, सामान रूमवर पोचवायला मुली, हॉटेल मध्ये वेटर्स म्हणून मुली, ऑफिसेस मध्ये देखील मुली. याचा अर्थ मुले काहीच करीत नाहीत असा नाहीये तर मुले ड्राइवर, मेकॅनिक, प्लम्बर अशी कामे करताना जास्त दिसली. मुख्य म्हणजे मुले काय आणि मुली काय सारेच तेथील परंपरागत वेशात अगदी सहजपणे वावरत होते.  सामान ठेवून आम्ही लगेच "साईट सीइंग" ला निघालो. भूतान चे विशेष म्हणजे येथे प्रत्येक शहरात एक नदी आणि नदीचे नाव लक्षात ठेवायला अगदी सोप्पे. पारो ला पारो नदी.  सर्वप्रथम आम्ही पोचलो येथील ता-झोन्ग या राष्ट्रीय संग्रहालयात. येथे भूतानी कला, वन्यजीवन, तेथील धार्मिक संकल्पना, रूढी इत्यादी दर्शविणारे "मुखवटे" विशेष लक्ष वेधून घेणारे. तेथील प्रसिद्ध "छाम " नृत्य हे मुखवटे धारण करून शरीराच्या लयबद्ध हालचाली द्वारे लक्ष वेधून घेत होते. हे सारे मनात साठवत आम्ही बाहेर पडलो आणि निघालो आमच्या पुढील प्रेक्षणीय स्थळाकडे. "रिनपुंग झॊन्ग" म्हणजे "हिपऑफ जुवेल्स" हे आता पारो शहराचे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि ज्युडिशिअल सेन्टर. या छोटेखानी किल्ल्यात सगळी सरकारी कार्यालये आहेत. सरकारी कार्यालय म्हटले कि आपल्याला, जुनाट, अनेक फायली रचलेली अशी जागा डोळ्यासमोर येते. पण अतिशय नीटनेटकी अगदी कलाभवन वाटावे अशी हि वास्तू . इथे कोर्टाचे काम सुरु होते पण अजिबात गडबड नाही कि गोंधळ नाही. या न्यायालयात काही जमिनीबद्दलचे वाद सोडवण्यात येत होते. मुळातच लोक शांतताप्रिय, त्यामुळे न्यायालयात विशेष गर्दी अशी नव्हतीच. प्रशांतने तेथील स्थानिक लोकांना, त्यांच्या वेगवेगळ्या भावविभ्रमांना  कॅमेराने टिपणे सुरु केले होते.  आमचा गाईड आम्हाला त्याच्या विशिष्ट लकबीने, थोडे इंग्रजी थोडे हिंदी असे करून जमेल तेव्हढी माहिती पुरवीत होता. त्याने आम्हाला तेथेच सांगितले कि मी शेवटच्या दिवशी विचारेन , तेव्हा तुम्ही कुठला किल्ला तुम्हाला आवडला ते सांगायचे.  यानंतरचा वेळ होता, तेथील बाजारात फिरण्याचा. बाजारात विविध हस्तकला नमुने, भुतानचे स्थानीय कपडे, लोकरी कपडे, शाली, कृत्रिम दागिने इत्यादी चित्ताकर्षक वस्तू खरेदीला होत्या. आम्ही बरीच दुकाने फिरलो. परंतु, खरेदीचा मोह टाळला, कारण येथे साऱ्याच वस्तू भारतापेक्षा महाग मिळतात. संध्याकाळी आम्ही रिसॉर्ट ला परत आलो.  भूतानला आपल्या खाण्याजोगे विशेष मिळणार नाही असा विचार करून आम्ही खाण्याचे बरेच जिन्नस बरोबर घेऊन निघालो होतो, खरेतर तशी आवश्यकता नव्हती हे आम्हाला दुपारच्या जेवणाच्या वेळीच कळले कारण आम्हाला अतिशय सुंदर फुलके, वरण , बटाट्याची भाजी आणि भूतानचा विशेष पदार्थ "इमा दाशी" म्हणजे चीज मध्ये हिरवी मिरची घालून  बनवलेला  पदार्थ, असे सुंदर जेवण मिळाले. पण आता करता काय कारण बरोबर आणलेले तर संपवायला हवे, म्हणून संध्याकाळी घराच्या पदार्थांनीच भूक भागवली. गप्पा-टप्पा, गाणी म्हणत म्हणतच झोपायच्या तयारीला लागलो, कारण उद्या आम्हाला बराच मोठा ट्रेक करायचा होता.  दुसऱ्या दिवशी सकाळी मोठ्या उत्साहाने तयार झालो. आजचा दिवस म्हणजे  "ताक्त्संग मोनेस्टरी" या बौद्धांच्या जगप्रसिद्ध तीर्थस्थळाला भेट देण्याचा होता.


ताक्त्संग मॉनेस्ट्री

हि मॉनेस्ट्री पारो पासून उत्तरेला १० किमी अंतरावर असून पर्वतकड्यावर १०२४२ फूट उंचीवर आहे. पारो व्हॅलीच्या ३००० फुटांवर आणि "पारो छू" या नदीच्या उजव्या बाजूला आहे.  भूतानची  ट्रिप  जर  "ताक्त्संग मॉनेस्ट्री " ला भेट दिली नाही तर व्यर्थ असे या जागेचे महत्त्व आहे. तेथे थंडी खूप असणार असे आम्हाला आमच्या गाईड ने सांगितले होते, त्यामुळे स्वेटर, कोट, स्कार्फ, माकडटोपी  असा सगळा जामानिमा करून निघालो. थोड्या वेळातच "बेस कँप" ला पोचलो. तेथे पर्यटकांची गर्दी होतीच. काही लोकांसाठी घोडेदेखील तयार होते. आम्ही चालतच जाणार होतो. जाण्यासाठी २ तास आणि येण्यासाठी २ तास असा हिशेब आम्हाला सोनमने सांगितला होता. आम्ही चालायला सुरुवात केली. अगदी सुरुवातीलाच छोटेखानी बाजार होता. त्यात वेगवेगळ्या वस्तू सजवल्या होत्या. कपडे, स्वेटर्स, दागिने, भूतानच्या भेटवस्तू असे सारे काही होते. पण त्या सर्व गोष्टींकडे लक्ष ना देता आम्ही सर्वप्रथम एकेक काठी विकत घेतली. एक अतिशय वृद्ध अशी आजीबाई काठ्या विकत बसलेली होती. चढताना आम्हाला या काठीचा उपयोग  होणार होता.  वातावरण अतिशय प्रसन्न होते आणि आमची मने देखील एका अनामिक ओढीने भारलेली होती. आजूबाजूला सर्वत्र पाईन वृक्षांच्या रांगा होत्या. आम्ही सारे हसत, गुणगुणत निघालो. मधेच येणाऱ्या घोड्यांना वाट करून द्यावी लागत होती.  चालता  चालता भूतानच्या संस्कृतीबद्दल माहिती आम्हाला सोनम पुरवीत होता. रस्ता अतिशय नागमोडी वळणाचा होता आणि भरपूर चढउतार देखील होते. आमच्या प्रवासाच्या सुरुवातीलाच एक अतिशय भव्य असे "प्रार्थना चक्र" अर्थात प्रेयर व्हील आम्हाला दिसले. याचे वैशिष्ट्य म्हणजे हे चक्र पाण्याच्या जोरावर अखंड  फिरत असते.  हे चक्र बुद्धांच्या सर्व मॉनेस्ट्रीज मध्ये दिसते. लाकूड, धातू, चामडे, जाडसर कापड अशा वस्तू मिळून बनवलेले हे चक्र मधोमध असलेल्या दांडाभोवती फिरवता  येते. याच्या बाह्यभागावर "ओम मणी पद्मे हुम" असा जप संस्कृतमध्ये लिहिलेला असतो. आपल्या मंदिरात आपण जसे भक्तिभावाने घंटा वाजवतो, तसे मॉनेस्ट्रीज मध्ये येणारे भक्त हाताने हे चाक फिरवतात. अशी समजूत आहे कि वाणीने  मंत्र उच्चारण्यासारखेच पुण्य हे चक्र फिरविल्याने मिळते. आम्ही क्षणभर थांबून देवाचे स्मरण केले आणि पुढे निघालो. 


आमचा वाटाड्या आणि आम्ही

आम्हाला नेहमी जंगलांमध्ये फिरण्याची  सवय असल्यामुळे ट्रेक कठीण वाटत नव्हता.   पण तरी आम्ही मध्ये मध्ये थांबून पाच मिनिटे  विश्रांती  घेत होतो. असेच  एका ठिकाणी थांबले असता आम्हाला "येलो बिल्ड ब्लू मॅगपाय" हा पक्षी दिसला. अतिशय देखण्या आणि डौलदार हालचालींनी त्याने आमचे लक्ष वेधून घेतले. तेवढ्यात आणखी काही मॅगपाय तेथे आले..  आम्ही लगेच कॅमेरा सरसावून भराभर फोटोज घेतले.  असेच निसर्गाच्या सौन्दर्याला  सलाम करीत, कुठे कुठे त्याला चित्रबद्ध करीत आमची वाटचाल सुरु होती..  पुढे चालता चालता आम्हाला भूतान मधील सर्वात उंच असलेल्या "चेलेला पास" या खिंडीचे दुरून दर्शन झाले. आमचा चालण्याचा वेग एवढा होता कि, दोन तासात आम्ही फक्त अर्ध्या वाटेवर असलेल्या तेथील कॅफेटेरिया पर्यंतच पोचू शकलो. इथूनही पुढे बराच लांबचा पल्ला होता. थोडावेळ तेथे आराम करून, गरमागरम चहा, कॉफी घेऊन आम्ही पुढे निघालो. इथला "सुजा टी" म्हणजे बटर टी प्रसिद्ध आहे. तो घेतल्याने थंडीमध्ये जरा तरतरी आली.  अजून जवळपास आलो तेवढेच अंतर पुढे जायचे होते. पाय अजूनतरी कुरबुरत नव्हते, पण जाऊन पुन्हा परत यायचे म्हणजे पायांचे काय होणार अशी धाकधूक होती,  पण एकदा तुम्ही निर्धार केला कि मग सगळे सोपे होऊन जाते. 


वाट वळणाची

थोड्या विश्रांतीनंतर आम्ही पुनः चालायला सुरुवात केली. पर्यटकांची बरीच गर्दी होती. जगाच्या सगळ्या कानाकोपऱ्यातून मंडळी इथे पोहोचली होती. यात बरीच वृद्ध मंडळी देखील दिसत होती. त्यांच्यात मुख्यत्वे जापान आणि थायलंड येथील पर्यटक होते. त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. वयाच्या मानाने हि मंडळी बऱ्यापैकी काटक असतात. भारतीय पर्यटक देखील होते. काही ठिकाणी तर मराठीतून बोलणे ऐकून, "अरे तुम्ही कुठून आलात?", "आम्ही पुण्याचे, आम्ही मुंबईचे" असे संवाद घडत होते. एकंदरीत आमची वाटचाल मजेत चालू होती. चालताना थोडी दमछाक वगळता आम्हाला काहीच त्रास झाला नाही. या "ट्रेकच्या" शेवटच्या टप्प्यात साधारणतः चारशे पायऱ्या उतरून पुन्हा तीनशे दगडी पायऱ्या चढाव्या लागतात. खाली उतरल्यावर अतिशय भव्य असा "जलप्रपात" आपले लक्ष वेधून घेतो. जणू काही आकाशातून हा खाली येतोय असा भास होतो. इथल्या पुलावरून दिसणाऱ्या  दऱ्या, पर्वतरांगा आणि त्यामधून कोसळणारा हा धबधबा असा नयनरम्य देखावा होता. मंडळी थोडावेळ तेथे थांबून, डोळ्यात ते दृश्य साठवताच पुढे निघत होती. शेवटचा टप्पा पार करून आम्ही साधारणतः दीड  वाजता  "टायगर नेस्ट मॉनेस्टरी " ला पोचलो. भव्य अशा बुद्धाच्या मूर्ती आणि त्या मूर्तींच्या चेहऱ्यावरचे अतिशय प्रसन्न भाव बघून अतिशय शांत वाटले. थकवा पार कुठल्याकुठे पळाला. थोडावेळ शांत बसून आम्ही ध्यान लावले आणि तेथील पवित्रतेचा  अनुभव घेतला.  बाहेर आलो तर आमचा गाईड म्हणाला कि तुम्हाला एक जागा दाखवतो, जेथे फक्त पुण्यवान लोक जाऊन परत येऊ शकतात. आम्ही म्हटले चला जाऊन बघूयात. ती एक अरुंदशी घळ होती. आत खाली अतिशय खोल भाग होता आणि वरून एका लाकडी शिडीवरून माणसे आत जा ये करीत होती. शिडी एवढी डगमगत होती कि कुठल्या क्षणी आपण अनावधानाने खाली पडू अशी भीती वाटत होती. पण आम्ही खाली उतरलो आणि वर चढून सहीसलामत परत आलो.  चला तर आपल्या पुण्यत्वाची खात्री झाली.. खरोखर तो साराच परिसर एका पावित्र्याने भरलेला वाटत होता.  मन तर म्हणत होते "थांबूया इथेच", पण परतीचा मार्ग डोळ्यांपुढे दिसत  होता.  संध्याकाळच्या आत खाली उतरायलाच हवे होते.  त्यामुळे आम्ही निघालो. आमचा वाटाड्या अतिशय बडबड्या असल्याने त्याची बडबड  चालूच होती.  मधेच  असलेल्या एका अरुंद भोकातून शिरून, तो दुसऱ्या बाजूने निघाला. सोनू  निगमची सारी गाणी त्याला पाठ होती. तसेच पर्वतांच्या खडकांमध्ये हे लोक सतत "डाकिनी" चे रूप शोधत असतात.  एका ठिकाणी त्याने आम्हाला थांबवले. त्याच्याबरोबर आणखी तीन चार मुले मिळून डाकिनी चा शोध घेत होती. त्याने बरेच दाखवायचा प्रयत्न केला पण मला काही ती डाकिनी दिसली नाही. शेवटी तुमची श्रद्धा महत्वाची..  साधारणतः दीड तासाने आम्ही पुन्हा  कॅफेटेरिया ला पोचलो. तेथे जेवणखाण केले, आणि लगेच खाली  निघालो. आता आमच्याकडे वेळ अतिशय कमी होता.सारे परतीला निघालेले पर्यटक एकमेकांशी गप्पा करीत एक अलौकिक  समाधान  घेऊन तृप्त झालेले होते. त्यात एक तिबेटी मुलगी तिच्या आईला घेऊन आलेली होती. सोनमशी तिची  जरा जास्तच मैत्री झाली होती. खाली पोहोचताच आजीबाईला तिची काठी साभार परत केली. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद काय वर्णावा?  शहरात पोचल्यानंतर आम्हाला जबरदस्त भूक लागली. आम्ही एका छोट्याशा रेस्टॉरंट मध्ये गेलो. तेथील बेकरीमधले पदार्थ  बघून तोंडाला पाणी सुटले. पण थंडी अतिशय असल्याने काहीतरी गरम खायला हवे होते. तेथे काही स्थानिक मंडळी बसलेली दिसली. भारतातून आलेले आहोत म्हणताच त्यांनी खूप आपुलकीने आमची विचारपूस केली आणि काय काय खावे असा सल्ला दिला.  तेथे गरमागरम आणि स्वादिष्ट "मोमोज" आणि "बटर टी" घेतला आणि हॉटेल वर परत आलो. परत आल्यावर नदीच्या काठावर थंडीत शाल घेऊन उभे राहण्याचा अनुभव घेता आला. पौर्णिमेला अजून ६-७ दिवस होते, पण चंद्रबिंब एका अलौकिक तेजाने उजळून निघाले होते. आजूबाजूच्या पर्वतरांगा त्याच्या सौंदर्याने झळाळून उठल्या होत्या. "धरती पे स्वर्ग जो है सो यही है" असेच वाटत होते.   दुसऱ्या दिवशी सकाळी "पुनाखा" चा प्रवास सुरु होणार होता, त्यामुळे आता झोपायलाच हवे होते.   चांदण्याचा मोह आवरता घेऊन आम्ही झोपेच्या स्वाधीन झालो.  ​ - डॉ . अंजली देशपांडे

bottom of page