top of page
Search

केल्याने देशाटन -२

आमची भूतानची सफर ​

भाग २

 

१४ डिसेंबर ला सकाळी सकाळी आम्ही पारो हुन निघालो आणि पुनाखाचा प्रवास सुरु झाला.  १४० किमी प्रवास करून आम्ही पुनाखाला पोचणार होतो. सुमारे चार तास लागतील असा अंदाज होता.  इथे सारेच रस्ते वळणावळणाचे आहेत त्यामुळे गाडीत  बेल्ट लावूनच बसावे लागत होते. ड्रायवर मात्र अतिशय सफाईदारपणे गाडी चालवीत होता. पुनाखा समुद्रसपाटीपासून १३१० मी. उंचीवर आहे त्यामुळे इथे थोडी थंडी कमी असेल असा आमचा कयास होता. कार मध्ये आम्ही अंताक्षरी चालू केली, त्यामुळे घाटाचा रस्ता असून त्रास झाला नाही. पुनाखाच्या वाटेवर साधारणतः ३१५० मी उंचीवर "दोचू-ला-पास" आहे. येथे पोहोचताच एका आनंदाने मन भरून गेले. दूरवर पसरलेल्या हिमशिखरांच्या दर्शनाने मन उल्हसित झाले. हिमालय पर्वत रांगांची जी शिखरे येथून दृष्टीपथात येतात, त्यांची नावे आणि उंची दर्शविणारा फलक तिथे होता. युद्धवीरांचे एक अतिशय देखणे स्मारक देखील येथे आहे.  हे स्मारक म्हणजे "आशी दोरजी वांगमो वांगचुक" या सर्वात मोठ्या राणीने, २००३ च्या घुसखोरांविरुद्ध शहिद झालेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेले १०८ स्तूप. हे बघून थक्क झालो. येथे थंडी चांगलीच जाणवत असल्यामुळे आम्ही कॉफी घेण्यासाठी तेथील हॉटेलात गेलो. बरेच फोटोज काढले आणि पुनःश्च मार्गस्थ झालो.  पुनाखाला पोचल्यानंतर सर्वप्रथम आम्ही जेवणासाठी एका छोट्याशा हॉटेल मध्ये थांबलो. एका अरुंदशा जिन्याने वर चढून एका छोट्याशा हॉटेल मध्ये शिरलो. आत बघतो तर काय! जवळपास तीस मध्यमवयीन गृहस्थांचा एक ग्रुप तेथे जेवायला आला होता. त्यांनी तेथे एवढा कोलाहल माजवला होता, कि आम्हाला तेथे जेवण घेणे कठीण वाटले. हे सगळे भारतीय होते. आंध्रप्रदेशातून ते सारे शाळकरी मित्र सहलीला निघाले होते, आणि तो त्यांचा दरवर्षीचा नियम होता. आमची अस्वस्थता बघून हॉटेल मधील वेटर आमच्याशी बोलायला आली व म्हणाली, कि काळजी करू नका मी तुम्हाला लवकर छान जेवण देते. त्या ग्रुपमधील एक सदगृहस्थ देखील आमच्याजवळ आले आणि त्यांच्याकडील जिन्नस आम्हाला देऊ केले,  तसेच आमची माफी मागून आम्हाला म्हणाले कि "तुम्हाला त्रास होतोय, पण आम्हाला माफ करा, कारण आम्ही वर्षातून  एकदा भेटतो, आणि भेटलो कि वय विसरतो". एवढ्या सुंदर निसर्गसंपन्न ठिकाणी आल्यानंतर कमीतकमी बाहेर तरी त्या जागेची शांतता भंग करू नये असे वाटले. पण हे माझ्या मनातील विचार. हॉटेल कन्यकांच्या चेहऱ्यावरील स्मित आणि बोलण्यातील आर्जव बघून आम्हीदेखील तेथे थांबलो आणि जेवण करून, आमच्या पुढील मुक्कामाच्या रस्त्याला लागलो. "द्रुबछू रिसॉर्ट" असे आमच्या पुढील हॉटेलचे नाव होते. येथे आम्हाला एक रात्र मुक्काम करायचा होता. सामान हॉटेलवर ठेवून आम्ही निघालो.  त्यानंतर भेट दिली "पुनाखा झोन्ग" ला.  हि वास्तू १६३७ मध्ये झब्द्रुन्ग गावांग नामग्याल याने बांधली. त्यानंतर बरीच वर्षे म्हणजे भूतानच्या दुसऱ्या राजाच्या कारकिर्दीपर्यंत हि वास्तू  सरकारी कामकाजासाठी वापरण्यात येत होती.


पुनाखा झोन्ग

या झोन्गला "दृक पुंगथांग देचेन फोडरांग" म्हणजेच "पॅलेस ऑफ ग्रेट हॅप्पीनेस" असे नाव होते. पुनाखा अजूनही हिवाळ्यात जे-खेनपो आणि राजा जिग्मे दोरजी वांगचुक यांचे निवासस्थान असते. राजाने येथेच १९५२ मध्ये पहिली राष्ट्रीय सभा आयोजित केली होती. या वास्तूचे वैशिष्ट्य म्हणजे हिच्या मागील टेकडीचा आकार हा निद्रिस्त गणपती सारखा दिसतो. आमच्या गाईडने हि गोष्ट दहादा सांगून आमच्या मनावर बिंबवली. प्रवेश करण्याआधी येथे दोन नद्यांचा संगम बघायला मिळतो. येथे ते एका नदीला स्त्रीलिंगी तर दुसरीला पुल्लिंगी नदी असे मानतात. नद्यांचा सुंदरसा संगम बघून आपण झोंग बघण्यास निघतो. तेथे प्रवेशासाठी ३५० रुपये तिकीट काढावे लागते. त्यानंतर नदीवरचा लाकडी पूल पार करून आपण एका भव्य वास्तुपुढे उभे राहतो. साधारणतः २५ पायऱ्या चढून आपण वर येताच एक  एक अतिशय भव्य असे "प्रार्थना चक्र" दिसते. ते फिरवून मनातल्या मनात देवाचे स्मरण करून आम्ही आत शिरलो. त्या भव्य वास्तूची भव्यता मनात साठवून परत निघालो. यानंतरचे ठिकाण होते "छिमी लाखांग टेम्पल "  म्हणजे "टेम्पल ऑफ फर्टिलिटी" बघायला निघालो. हे मंदिर लामा द्रुकपा कुइन्ले यांनी बांधलेले आहे. असे म्हणतात कि लामा  कुइन्ले  याने त्याच्या जादुई सौदामिनीच्या साहाय्याने  दोचुला येथील दैत्याचा संहार करून त्याला जवळच एका खडकाखाली बंदिस्त केले.  कुइन्ले  याना त्यांच्या अपरंपरागत पद्धतीने, म्हणजे गाणी गाऊन किंवा गंमतीजमती सांगून बौद्ध धर्माची  शिकवण देण्यामुळे "वेडे पीर" म्हणून संबोधतात. "टेम्पल ऑफ फर्टिलिटी"  येथे  कुइन्ले  यांनी तिबेटहून आणलेले लाकडी "लिंग" पाहावयास मिळते.    लग्नानंतर मूव्हावे म्हणून जोडपी विशेषतः स्त्रिया या ठिकाणी आवर्जून जातात.  येणाऱ्या भक्तांच्या मस्तकाला लाकडी लिंगाचा स्पर्श करून आशीर्वाद दिला जातो.  आशीर्वाद घेऊन आम्ही बाहेर आलो. संध्याकाळची थंड हवा, आणि आकाशात सर्वत्र पसरलेली गुलाबी छटा मन मोहून घेत होती. कडकडून भूक लागलेली होती.  रात्रीचे जेवण आमच्या हॉटेल वरच घेतले.  चौथा दिवस "थिंपू" शहराला भेट देण्याचा होता. सकाळी लवकरच उठलो. नेहमीच्या सवयीप्रमाणे फिरायला बाहेर पडलो. हॉटेल जरा उंचावर होते, आम्ही खाली उतरायला सुरुवात केली. वातावरण अतिशय प्रसन्न होते. रस्त्यांवर काही ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु होते. वाहने तुरळक होती, आणि अधूनमधून काही लोक कामाला निघालेले दिसत होते. येथेही स्त्रियांचे प्रमाणच  अधिक दिसत होते. दोन्ही बाजूनं झाडे, वळणावळणाचा रस्ता आणि कसलाच दुसरा विचार मनात नाही, अतिशय सुखद असा हा अनुभव होता. वाटेत एक सुंदर असा खळाळत वाहणारा झरा  दिसला म्हणून आम्ही जरा खाली उतरलो. तेथे आम्हाला "व्हाईट कॅप्ड रेडस्टार्ट " पक्षी दिसला. त्याचा फोटो देखील अतिशय सुरेख आला. येथे बरेच पक्षी दिसत होते. थोडा वेळ तेथे घालवून आम्ही परत हॉटेल वर आलो. ब्रेकफस्ट करून निघालो थिम्पू च्या प्रवासाला. अंतर फक्त ७८ किमी होते. पण वेळ लागणार होता अडीच तास. थिंपू शहर समुद्रसपाटीपासून २३५० मी. उंचीवर आहे. येथे सर्वप्रथम भेट दिली येथील भव्य बुद्धाच्या पुतळ्याला. "कुएन्सल फोडरांग" येथील हि मूर्ती नॅशनल मेमोरियल म्हणून ओळखली जाते.


कुएन्सल फोडरांग येथील बुद्धाची मूर्ती

१९७४ साली तिबेटी स्टाईल मध्ये हि मूर्ती बनवलेली आहे. मूर्तीच्या सभोवताली विस्तीर्ण पटांगण आहे. या पटांगणात चहुबाजूनी अप्सरांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती अतिशय देखण्या आहेत. सर्व मूर्तीना सोन्याचा मुलामा दिलेला आहे. आजूबाजूला पर्वतरांगा, वर निरभ्र आकाश आणि भव्य असे मंदिर. जणू काही आपण स्वर्गातच आहोत असा भास होतो.  बुद्धाच्या मूर्तीच्या खालच्या भागी मोठा प्रार्थनामंडप आहे. हे थिम्पू मधील रहिवाशांच्या प्रार्थनेचे  प्रमुख ठिकाण आहे. खरोखर मनाची शांतता अनुभवायची असेल तर या ठिकाणाला जरूर भेट द्यावी.  थिंपू मध्ये आम्ही एका म्युझियमला देखील भेट दिली. येथे आमचे स्वागत तेथील प्रसिद्ध शॅम्पेन ने झाले. भूतान मधील रीतिरिवाज, पुरातन काळातील स्वयंपाकाची साधने, पोशाख सारेच बघण्यासारखे होते. येथे आम्ही पारंपरिक नृत्याचा देखील अनुभव घेतला. दोन्ही हात निकामी झालेले असताना पायांच्या बोटानी अप्रतिम चित्रे रेखाटणाऱ्या कलाकाराची भेट झाली. त्याने बनवलेले एक शिल्प आम्ही विकत घेतले, ते त्याने पायाच्या बोटाने स्वाक्षरी करून आम्हाला दिले. येथे आम्ही थोडा वेळ धनुष्यबाणाने "नेमबाजी" केलीं. यानंतर आम्ही निघालो "फोर्ट्रेस ऑफ ग्लोरियस रिलिजन" अर्थात "ताशिछो झोन्ग" बघायला. हि भूतान सरकारची सरकारी कामकाजाची जागा आहे तसेच "चीफ ऑफ अबॉट ऑफ भूतान" यांचे उष्मकाळातील रहिवासाचे स्थान आहे.  येथे आम्ही शाही कवायतीच्या आनंद घेतला.   रात्री आम्हाला "ला मेरिडियन" ला थांबायचे होते. तेथे पोचल्याबरोबर आम्ही "स्टीम बाथ" करून, दिवसभर फिरून न आलेला थकवा घालवला. त्यानंतर जवळच्या मार्केट मध्ये थोडी खरेदी करायला बाहेर पडलो. भारतात आल्यानंतर मित्रांना देण्यासाठी काही भेटवस्तू घेतल्या आणि विशेष म्हणजे भूतानच्या पारंपरिक वेषाची  खरेदी केली. महिला जो पोशाख परिधान करतात त्याला "किरा" म्हणतात. हा कमरेपासून गुढघ्याच्या खाली येणारा झगा आणि वर एक जाकीट ज्याला "तेगो" म्हंणतात, तर पुरुषांच्या पोशाखाला "घो " असे म्हणतात. गुडघ्यापर्यंत लांबी असलेला हा पोशाख बराचसा "किमोनो" सारखा दिसतो. हा पारंपरिक पट्ट्याने (केरा ) कमरेला बांधलेला असतो. याच्या समोरच्या बाजूला जो खिसा असतो, तो पूर्वी, खाण्याची भांडी व छोटी खुरपणी ठेवण्यासाठी वापरात. आता त्याचा उपयोग "मोबाईल, पर्स वगैरे ठेवण्यासाठी होतो. हॉटेल वर परत आल्यानंतर मी लगेच तो पोशाख घातला आणि रिसेप्शन ला आले कारण आमचे रात्रीचे जेवण आज येथे पंचतारांकित हॉटेल ला होणार होते. माझा पोशाख बघून तेथील एक कर्मचारी "साम्तेन" पुढे आली आणि मला म्हणाली मी तुम्हाला हा ड्रेस कसा घालवायचा ते सांगते, तुम्ही माझ्या सोबत चला. तिने मला केशभूषा देखील करून दिली. त्यानंतर आम्ही तिच्यासोबत फोटोज काढले.  रात्रीचे जेवण अतिशय रुचकर होते पण तेवढ्याच आपुलकीने ते सर्व्ह केल्या जात होते. भूतानवासीयांच्या मनात भारत देशाबद्दल फार आपुलकी आहे, आणि तेवढाच तिटकारा चिनी लोकांबद्दल. चीनला  संधी मिळाली तर ते भूतानमध्ये रस्ते बांधतील आणि येथील बाजारपेठांवर आक्रमण करतील, असे त्यांना वाटते. याउलट भारत देश मात्र त्यांना त्यांची संस्कृती जपण्यास मदतच करील असा त्यांचा ठाम विश्वास आहे. इथल्या बाजारात तुम्हाला "मेड  इन चायना" वस्तू औषधालाही सापडणार नाही. तसेच चिनी प्रवाशांना येथे येण्यासाठी काटेकोर नियम आहेत.  आमच्या चार दिवसांच्या वास्तव्यात आम्हाला सगळ्यांनीच खूप छान वागणूक दिली.  आता आमचे भूतान मधील वास्तव्य  संपत आले होते. सकाळी लवकर उठून कोलकात्याचे विमान गाठायचे होते. आम्ही साऱ्यांचे कौतुक करून आमच्या रूमवर परत आलो. सकाळी भूतान सोडले, पण पुन्हा भेट देण्याचे निश्चित करूनच. शरीराने आम्ही परत निघालो, पण मन मात्र "भूतानमय" झालेले होते. 


- डॉ. अंजली देशपांडे

bottom of page