चुका - अभाव की प्रभाव ? (भाग १)
नमस्कार, "The Leading Phase" प्रसारित संस्कृत सुभाषितांचा खजिना या सदरामध्ये आपण बघणार आहोत, "छिद्रेष्वनर्था बहुली भवन्ति" या वाक्प्रचाराचा अर्थ आणि तो कुठल्या प्रसंगी वापरण्यात येतो त्याची काही उदाहरणे.
संपूर्ण श्लोक असा आहे
एकस्य दुखस्य न यावदन्तं, गच्छाम्यहं पारमिवार्णवस्य । तावद् द्वितीयं समुपस्थितं मे, छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति।।
एखादी लहानशी चूक सुद्धा वेळेवर सुधारली नाही तर त्यातून पुढे अनर्थ निर्माण होतात. ज्याप्रमाणे वेळेवर घातलेला एक टाका पुढचे नऊ टाके वाचवतो. "A stich in time saves nine" हा वाक्प्रचार सगळ्यांना माहिती असतो. तो बरेचदा आपण वापरतो देखील. कोणत्याही बाबतीत योग्य वेळी काळजी घ्यावी हे या वाक्प्रचारातून सूचित होते. पण मूळ श्लोकाचा अर्थ एकामागून एक संकट येणे असा आहे. अगदी सखोल विचार केला तर या सुभाषितातून आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात, जसे कि झालेल्या चुकांकडे दुर्लक्ष न करणे, वेळेचे सुनियोजन करणे, आलेल्या संकटाना धैर्याने तोंड देणे इत्यादि.
आपल्या दैनंदिन जीवनात खूपदा याचा प्रत्यय आपल्याला येतो. म्हणजे बघा, आपण प्रवासाला निघतोय, प्रवासाला निघाल्यावर लक्षात येते कि, गाडीच्या चाकांमध्ये हवा कमी आहे, पण शहरात वेळ जास्त लागेल, त्यामुळे गावाबाहेर पडल्यावर आपण हवा भरुया असा विचार आपण करतो, आणि गावाबाहेर पडल्यावर चाकातली हवा पूर्ण निघून गेलेली असते. अर्थात हि काही खूप कठीण परिस्थिती नाही. पण झालेली छोटी चूक वेळेत सुधारली नाही तर कधी कधी खरोखर अनर्थ घडू शकतो. या संदर्भात आपण लहानपणी ऐकलेली एक गोष्ट आठवते कि, एका मुलाला चोरी करण्याची वाईट सवय लागते, तो रोज काहीतरी चोरी करून घरी आणू लागतो. आई त्याला काहीच बोलत नाही. असाच तो मोठा होतो, आणि राजाकडे मोठी चोरी करताना पकडल्या जातो. त्याला फाशीची शिक्षा होते. तुझी शेवटची इच्छा काय असे विचारल्यावर तो सांगतो, मला माझ्या आईच्या कानात काहीतरी सांगायचे आहे. आई त्याच्या जवळ येताच तो तिच्या कानाला कडकडून चावतो. तिला म्हणतो, "चोरी करणे हा गुन्हा आहे हे जर तू मला लहानपणीच सांगितले असतेस तर आज हा दिवस आला नसता." हे खरेच आहे, चोरीच नाही तर इतरही वाईट सवयी, किंवा नकळत घडणाऱ्या चुका यांची समज मुलांना योग्य वेळी करून द्यायलाच हवी.
साधारणतः आपली एक सवय असते. आपल्या चुकांचे खापर दुसऱ्यांच्या माथी फोडायला आपण नेहमी तयार असतो. तुझ्यामुळे हे असे झाले, तुझ्यामुळे तसे झाले, असे अगदी सहज आपण म्हणत असतो. पण स्वत:ची चूक ज्याला उमगते, तोच ती सुधारण्याचा चांगला प्रयत्न करू शकतो. आणि जेव्हा "स्वत:ची चूक सुधारण्यासाठी एखादी व्यक्ती लढते, तेव्हा तिला कुणीच हरवू शकत नाही". तसेच माझी चूक कुणीतरी दाखवून द्यावी अशी अपेक्षा ठेवणे सुद्धा बरोबर नाही. पण आपल्या सुदैवाने जर आपल्या आयुष्यात कुणीतरी आपल्याला वेळप्रसंगी कान पकडून योग्य वाट दाखवणारे मिळाले, तर अशा व्यक्तींसोबत झालेल्या चुकांचा अभ्यास करावा आणि चुकांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून प्रयत्न करावेत, दुरुस्ती होत असेल तर उत्तमच.. "दंगल" हा आमिर खानचा एक अतिशय गाजलेला सिनेमा. स्वतः च्या मुली शारीरिक क्षमतेत मुलांच्या तुलनेत कुठेही कमी नाहीत, हे लक्षात येताच तो गीता आणि बबिता या दोघीनाही कुस्तीचे डावपेच शिकवतो. गीता जेव्हा शहरात "पतियाळा इन्स्टिट्यूट" मध्ये येते, तेव्हा तिला वडिलांनी घालून दिलेले नियम जाचक वाटू लागतात. वडिलांनी शिकवलेल्या डावपेचांना डावलून ती नवीन प्रशिक्षकाने सांगितल्याप्रमाणे खेळू लागते, आणि परिणाम व्हायचा तोच होतो. तिला एका पाठोपाठ एक अपयश येऊ लागते. तिच्यातील त्रुटी, तिची बलस्थाने तिच्या वडिलांइतकी कुणालाच उमगलेली नसतात, तिला हे कळून चुकते. स्वतःच्या चुकांची जाणीव होताच ती त्या सुधारते आणि "कॉमनवेल्थ गेम्स" मध्ये सुवर्णपदक जिंकते.
आयुष्यात प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही चुका होतातच. किंबहुना जी व्यक्ती काहीतरी कामे करते, तीच चुकाही करते. आपल्या हातून चुकाच होऊ नयेत, म्हणून निष्क्रिय व्हा असे हे सुभाषित मुळीच सांगत नाही. जॉर्ज बर्नार्ड शॉ म्हणतात, "A life spent making mistakes is more honourable and useful than a life doing nothing" जर आयुष्यात काही घडवायचे असेल तर चुका होणे क्रमप्राप्तच आहे. पण त्या समजण्याची क्षमता अंगी बाणवायला हवी आणि त्या सुधारण्याची जिद्दही... जगातील श्रेष्ठ व्यक्तींच्या जीवनाचा अभ्यास केला तर हेच दिसून येते कि झालेल्या चुकांमधून त्यांनी योग्य ते धडे घेतले. अँपल चे सी.इ.ओ. स्टीव्ह जॉब्स म्हणतात, “Sometimes when you innovate, you make mistakes. It is best to admit them quickly, and get on with improving your other innovations.” अर्थात नवीन काही घडवायचे असेल तर चुका निश्चितच होणार. पण त्या कबूल करायला शिका आणि दुरुस्तीही करायला लागा. १९८५ मध्ये त्यांना त्यांनीच स्थापन केलेल्या कंपनीतून बेदखल करण्यात आले. त्यांनी स्वतःच्या चुकांचा अभ्यास केला, नवीन कामांना सुरुवात केली, आणि पुन्हा अँपल मध्ये सी. इ. ओ. म्हणून आले. अशा उदाहरणांवरून आपल्याला असेही म्हणता येईल कि यशाचा मार्ग हा अपयशाची वळणे पार करूनच गाठता येतो.
आता कोविड महामारीच्या काळात घालून दिलेले नियम न पाळता काही लोक अगदी निर्धास्तपणे जगत आहेत, पण त्यांच्या हे लक्षात येत नाही, कि आपल्या अशा वागण्याने स्वत:वरच नाही तर दुसऱ्यांवर सुद्धा संकट ओढवू शकते. आणि त्यानंतर जे काही आज रुग्णांना किंवा त्यांच्या जवळच्या व्यक्तींना भोगावे लागते आहे, त्याची आपण कल्पना देखील करू शकत नाही. आपल्या देशात सुविधा आहेत, कायदे आहेत, लोक सुशिक्षित आहेत, पण सुसंस्कारित नाहीत. शिवाय सगळ्या जगाची (चीन वगळता) लोकसंख्या एका पारड्यात आणि भारताची दुसऱ्या पारड्यात, तरी भारताचे पारडे जड आहे. त्यामुळे कितीही यंत्रणा सुसज्ज असली, तरी ती कमीच पडते. अशा परिस्थितीत आपल्या छोट्या चुकीने अनर्थ घडू शकतात. घडताना आपण बघतोय. म्हणून आपल्या वर्तनात खूप सावधगिरी बाळगायला हवी. चुका आपण करायच्या आणि खापर मात्र पंतप्रधानांच्या माथी फोडायचे हे धोरण बरोबर नाही. शेवटी हे लक्षात घ्यायला हवे कि, देश आपला आहे, त्यामुळे त्याच्या संरक्षणाची जबाबदारी आपली आहे. लहानपणी माझे बाबा आम्हाला सांगायचे,
For Want of Nail, the Horse Was lost
For Want of a Horse, The Rider was lost
For Want of a Rider the King was lost
For want of a King, the Kingdom was lost.
So, For Want of Nail, the Kingdom was lost..
म्हणूनच चूक कितीही छोटी असली तरी दुर्लक्ष करू नये.. नाहीतर काट्याचा नायटा व्हायला वेळ लागणार नाही. आपल्या आयुष्यात चुकांचा पूर्णतः अभाव असणे शक्यच नाही, पण त्यांचा आयुष्यावर काय परिणाम होणार किंवा काय प्रभाव पडणार आहे हे जाणून योग्य ती पावले उचलावीत..
Listen Our Podcast on Your Favorite Platform:
Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor
Follow Us on Social Media Platforms: