top of page
Search

चुका - अभाव की प्रभाव ? (भाग 2)

"छिद्रेष्वनर्था बहुली भवन्ति" या वाक्प्रचाराचा अर्थ आणि तो कुठल्या प्रसंगी वापरण्यात येतो त्याची काही उदाहरणे.

संपूर्ण श्लोक असा आहे

एकस्य दुखस्य न यावदन्तं, गच्छाम्यहं पारमिवार्णवस्य । तावद् द्वितीयं समुपस्थितं मे, छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति।।


सुभाषितात दडलेला दुसरा अर्थ म्हणजे "एकामागून एक संकटे येणे" आता अशी परिस्थिती का उद्भवते तर, पहिले संकट येताच माणूस घाबरतो आणि काहीतरी चूक करतो, त्यातून दुसरे संकट उभे राहते, मग तिसरे. त्यामुळे येणाऱ्या संकटांचा सामना धैर्याने करणे गरजेचे आहे. यासाठी काय करायला हवे? आपल्याकडे असलेला वेळ जर योग्य प्रमाणात योग्य कामासाठी वापरला तर पुढे येणाऱ्या प्रसंगासाठी आपण तयार होतो, आणि म्हणून ते प्रसंग आपल्याला संकटासारखे वाटत नाहीत. ठरवलेले काम मनाप्रमाणे व्हायला हवे असेल, त्यात कुठली चूक अथवा त्रुटी राहायला नको असेल तर वेळेचे सुनियोजन हे तर नेहमीच करायला हवे. आणि आजच्या काळात जेव्हा माणसे अतिशय धकाधकीचे धावपळीचे जीवन जगत आहेत तेव्हा वेळेचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. आज आपण बघतो की मुंबईसारख्या शहरात लोकांचे जीवन अगदी घड्याळाच्या काट्यावर चालते, अर्थात आता या लॉक डाऊन मुळे थोडीशी शांतता आली खरी पण तिची वेगळी व्यथा आहे. महत्त्वाचे हे आहे की आपल्याकडे असलेला वेळ योग्य प्रकारे कसा वापरायचा हा या श्लोकात घडलेला अर्थ.


"टाईम मॅनेजमेंट" म्हणजे वेळेचे सुनियोजन हा एक मोठा व्यवस्थापन कौशल्याचा विषय आहे. लहानपणापासून आपल्या मनावर हे संस्कार वेगवेगळ्या माध्यमातून बिंबवले जातात. एक खूप छान कविता आठवते,


"छोटी छोटी जल कि बूंदे सागर को भर देती है,

बालू कि रज नन्ही नन्ही सुघर भूमी रच देती है।

क्षण क्षण काल इकठ्ठा होकर लंबा युग बन जाता है,

क्षण को क्षुद्र न समझो भाई, यह जग का निर्माता है।"..


वेळेचे सुनियोजन करताना आपण आपल्या दिवसाचा वेळ कुठल्या कामांमध्ये घालवतो हे खूप महत्त्वाचे असते. स्टीफन कोवे यांनी सांगितलेल्या "वेळेच्या आव्यूहा" ( Time Matrix/Quadrant) प्रमाणे आपण जी कामे करतो ती चार प्रकारची असू शकतात सगळ्यात पहिले

1. महत्त्वाचे आणि अत्यावश्यक किंवा तातडीचे (इम्पॉर्टन्ट अँड अर्जन्ट)

ही कामे न टाळता येणारी आणि अगदी आता करायलाच हवीत अशी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ,

आपण अचानक आजारी पडलो, तर ताबडतोब डॉक्टरांकडे जायलाच हवे.

२. दुसरा प्रकार म्हणजे महत्त्वाचे पण अत्यावश्यक किंवा तातडीचे नाही

हे काम महत्वाचे आहे, म्हणजे आज ना उद्या करायचेच आहे, पण अगदी आजच करायला हवे असे नाही, नियमित वैद्यकीय तपासणी करून घेणे या प्रकारात मोडते.

३. तिसरा अत्यावश्यक(तातडीचे) पण महत्त्वाचे नाही,

या क्षणी हे काम करायलाच हवे, जरी ते खूप महत्वाचे नसले तरी, जसे कि दारावरची बेल वाजली, किंवा फोन आला, तर हातातले काम टाकून आपल्याला उठावेच लागते.

आणि

४. चौथा प्रकार म्हणजे महत्त्वाचे नाही आणि अत्यावश्यक(तातडीचे) देखील नाही म्हणजे (अनावश्यक म्हणायला हरकत नाही ) आणि मंडळी आपण आपला बहुतांशवेळा ह्या चौथ्या प्रकारच्या कामात घालवतो. म्हणजे दूरदर्शन वर काहीतरी कार्यक्रम बघणे, सोशल मीडिया वर अनावश्यक वेळ दवडणे.


आता आपल्या लक्षात आले असेलच कि, यातील दुसऱ्या प्रकारच्या कामांवर आपण नेहमी लक्ष केंद्रित करावे म्हणजे "छिद्रेष्वनर्था बहुली भवन्ति" असे होणार नाही. जर वेळेचा विनियोग योग्य प्रकारे केला, कामे ठरवून वेळेवर केलीत तर पश्चात्तापाची वेळ टाळता येऊ शकते. म्हणजे बघा, ऑफिस ला १० वाजता पोचायचे आहे. आपण राहतोय डोंबिवलीला आणि ऑफिस आहे व्ही. टी. ला. म्हणजे ८. ३० ची लोकल गाठायला हवी. त्यासाठी घरातून १० मिनिटे आधी निघायला हवे. म्हणजेच सगळी कामे आटोपून आपण ८. २० ला बाहेर पडायचे आहे. पण एखादा दिवस असा येतो, कि उठायला उशीर होतो, धावतपळत स्टेशन गाठावे तर वाटेत चप्पल तुटते. ती दुरुस्त करेपर्यंत फास्ट लोकल निघून जाते. मग स्लो लोकलची वाट बघा. पहिली गाडी येते ती खच्चून भरलेली. चढताच येत नाही. मग दुसरीत कसे बसे आपण चढतो. ऑफिस ला पोचता पोचता १० वाजून गेलेले असतात, नेमके "साहेब" वेळेवर आलेले असतात आणि तुमच्या नावाचा पुकारा झालेला असतो. मग जी काही त्रेधा उडते ती विचारायलाच नको. आता इथे एकच छोटीशी चूक झाली कि आपण झोपेतून वेळेवर उठलो नाही. कधी कधी चुकांमधून अनर्थ घडू शकतात, धावताना पाय घसरून पडताना, लोकल मध्ये गडबडीत चढताना लोक पडतात, बारीकसारीक दुखापतीवर निभावले तर नशीब नाहीतर गंभीर दुखापती होतात. हे असेच प्रसंग आयुष्यात येतात आणि आपण म्हणतो, छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति..


जे वेळेच्या बाबतीत तेच इतर साधन सामुग्री बद्दलही म्हणता येईल. प्रत्येक गोष्ट जपून, काळजीपूर्वक करावी. ईश्वराने दिलेले निसर्गाचे वरदान आपण आपल्या चुकांमुळे, निष्काळजीपणामुळे वाटेल तसे वापरीत आहोत. वेगवेगळी प्रदूषणे, प्लास्टिकचा बेसुमार वापर, बेबंद चाललेली वृक्षतोड या चुकांकडे प्रगतीच्या नावावर आपण जाणूनबुजून डोळेझाक करतोय. या चुकांमुळे होणारे परिणाम वेळोवेळी आपण भोगतोय, पण, त्यातून शिकायला मात्र तयार नाही आहोत. थोडी मूठभर माणसे या विरुद्ध आवाज उठवीत आहेत, आपल्या परीने काळजी घेत आहेत, पण तेवढे पुरेसे नाही. आज "सौंदर्यीकरणाच्या" नावाखाली आपली स्थानीय झाडे पडून, नवीन शोभेची झाडे लावत आहेत. जंगलतोड, जंगलांना आग लावणे सुरूच आहे..हि यादी न संपणारी आहे. या चुका अशाच घडत राहिल्या तर "छिद्रेष्वनर्था बहुलीभवन्ति म्हणायला सुद्धा आपण उरणार नाही.


याबाबतीत अरल समुद्राचे उदाहरण सगळ्यांनी लक्षात ठेवायला हवे. एके काळी हा उझबेकिस्तान आणि कझाकस्तान यांच्या मध्ये असलेला जलाशय हा जगातला चौथ्या क्रमांकाचा मोठा जलाशय होता. पूर्वी या जलाशयात सिर दर्या आणि अमु दर्या या नद्यांचे मुबलक पाणी मिळत होते आणि अतिशय समृद्ध जलजीवन आणि जनजीवन तेथे अस्तित्वात होते. . १९६० मध्ये सोव्हिएट युनियन ने या दोन्ही नद्यांचे पाणी धरणे आणि कालवे बांधून कापसाच्या आणि इतर पिकांच्या लागवडीसाठी वापरायला सुरुवात केली. याने अरल समुद्राचा संपूर्ण नायनाट केला. हा समुद्र पूर्णपणे गेला, त्यावर अवलंबून असलेले लोकांचे जीवन धोक्यात आले. सभोवतालचे हवामान बदलले. हे जगातील "पर्यावरणाचे" सर्वात मोठे संकट मानले जाते. आता तेथे हा जलाशय पुरुज्जीवीत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


चुका करणे हा मनुष्याचा स्थायीभाव आहे, म्हणून चुका करतच रहायच्या, त्यांच्या प्रभावाचा विचारच करायचा नाही, हे मानवजातीला घातक ठरू शकते ..

- डॉ. अंजली देशपांडे

 

Listen Our Podcast on Your Favorite Platform:

Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor

Follow Us on Social Media Platforms:

LinkedIn | Instagram | Facebook

bottom of page