कोरोना काळ ऑनलाईन अनुभवताना...

अचानक महामारीची आलेली सूचना आणि शाळा ,कॉलेज बंदची स्थिती. खरं तर परीक्षा जवळ यायचे दिवस आणि घरी बसा ,अशी परिस्थिती. मनात असलेली भीती , ताण, आनंद एक विलक्षण मिश्र भावना होती. एकीकडे स्वतः चे मनस्वास्थ्य संभाळत विद्यार्थ्यांना धीर देण्याचे काम सुरू होते. वर्ष वाया जायची भीती न बाळगता नवीन मार्ग काढण्याची तयारी चालू होती. आपण तांत्रिक शिक्षण घेत मुलांना देणे ही सुद्धा तारेवरची कसरत होती. कुटुंब, शिक्षण, समाज सर्व सांभाळत आरोग्य सांभाळणे म्हणजे दिव्यत्वाची प्रचिती होती.
कौतुक करावं तर मुलांचं.जे घरात असून नवीन गोष्टी शिकत राहिली आणि मोठ्यांना सांभाळत होती. नवीन गोष्टींचा अनुभव तर मुलंच घेत होती.या पुढचा मुलांचा काळ हा नेहमीच जैविक रोग आणि उपचार यांचा असणार आहे. कायम जीव मुठीत घेऊन जगणं म्हणजे काय आणि त्यावर मात करत आनंदाने जगणे काय ही महत्वाची शिकवण मुलांना मिळाली.
आम्ही लहानपणी काल्पनिक निबंध लिहिला 'परीक्षा झाल्या नसत्या तर' आणि मुलांनी प्रत्यक्ष अनुभवल्या. खरं तर घरी बसून अभ्यास होऊ शकतो हे पटलं. मुलांची सहनशीलता वाढीस लागली.बैठकीची वेळ वाढली. पालकांशी संवाद जास्त वेळ होऊ लागल्याने शब्दकोशात भर पडली. भले स्मार्ट फोन हातात खेळू लागला, गेम खेळण्याचा आनन्द घेता आला पण त्याचा योग्य वेळेपुरता उपयोग आणि शरीरावरील दुष्परिणाम लक्षात आले. फोनचे जे आकर्षण आधी होते ते निश्चित कमी झाले.
ऑनलाईन अभ्यास हे परिपूर्णत्व निश्चित नाही आणि शाळेत जाऊन पूर्ण वेळ शिकणे हे ही पूर्णत्व नाही.या दोन्हीचा मध्य साधला तर पाल्यांसाठी शिक्षण हे आंनदी होईल.10 वी, 12वी परीक्षा न घेता पास करण्यात आलं. याचा आनन्द अभ्यास करणाऱ्यांना नाहीच पण परिस्थितीशी सामना करायला या कोरोना महामारीने शिकवले. घरकाम, व्यवहार, आंनदी जगण्याची गुरुकिल्ली या काळाने पाल्याना दिली.
असे दिवस आणि अशी वेळ अनुभवताना जीवनातील संघर्ष, संकटं कशी झेलावीत हे शिकता आले यातच पालक म्हणून समाधान वाटते.
Listen Our Podcast on Your Favorite Platform: Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor Follow Us on Social Media Platforms: LinkedIn | Instagram | Facebook