top of page
Search

घर ऐसे मजला हवे



"घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती

तिथे मनातून प्रेम रुजावे, नकोत नुसती नाती"

किंवा "असावे घर ते अपुले छान" अशा काव्यपंक्ती म्हणजे आपल्या सर्वांच्या मनातील इच्छांचे प्रतिबिंबच असतात…..घर म्हणताच डोळ्यांपुढे येते ती आईची प्रेमळ मूर्ती, तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारी मायेची ऊब, वडिलांची करारी मुद्रा, त्यांचा प्रेमळ धाक, आजीआजोबांचे "दुधावरच्या सायीसारखे प्रेम", बहीण भावंडातील लटके रुसवेफुगवे, तरीही एकमेकांवरचे आत्यंतिक प्रेम, आणखीही खूप काही. पण जरा जपून..आईच्या अती प्रेमाने एखाद्याचे मन दुबळे होऊ नये, बाबांच्या धाकाने किंवा अपेक्षांनी ते पांगळे होऊ नये, किंवा बहीण भावंडांच्या यशाने त्याने स्वतःला कमी लेखू नये. कुठलाही प्रसंग आला, तरी सर्वांनी मिळून त्याला सामोरे जावे.

आपल्या मनातील या इच्छा पूर्ण होण्यासाठी घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रयत्न करावे लागतात. एकमेकांबद्दल निष्ठा जपाव्या लागतात. म्हणजेच आपापसात दुरावा निर्माण होऊ नये याची काळजी घ्यावी लागते.

"जपाव्या लागतात त्या निष्ठा असतात का?' या वि. द. घाट्यांच्या "कॅशिया भरारला" या धड्यातील हे वाक्य मला फार आवडायचे आणि त्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण लिहायलाही तितकेच आवडायचे. अर्थात अजूनही आवडतेच. पण घाट्यांनी जेव्हा हे वाक्य लिहिले, तो काळ वेगळा होता. आजच्या काळात मात्र मला वाटते, की या निष्ठा जपण्यासाठी देखील आपल्याला प्रयत्न करावेच लागतात. कारण नात्यांमधले प्रेम जरी बदलले नसले तरी काळाच्या ओघात, ते व्यक्त करण्याच्या पद्धती, व्यक्तिस्वातंत्र्य या सगळ्यांमुळे नाती सांभाळणे, ती टिकवून ठेवणे हे जरा जास्त कठीण झाले आहे, अर्थात मला असे वाटते.

माझ्या मते, घरात स्वावलंबन, शिस्त, एकमेकांची कुठल्याही परिस्थिती मदत करण्याची तयारी, या सर्व गोष्टींचा समन्वय असावा. "अती तिथे माती" या म्हणीप्रमाणे कुठल्याही तत्वाचा अतिरेक नसावा. या संदर्भात "खूबसूरत" हा सिनेमा उदाहरणादाखल घेता येईल. घरात आईच्या कडक शिस्तीमुळे, सारे कुटुंबिय मनातून अस्वस्थ असतात, परंतु तिच्या अपरोक्ष, म्हणजे ती घरात नसताना, त्यांची मने बंड करून उठतात आणि त्यांच्या मनाला भावणाऱ्या पण आईचा विरोध असणाऱ्या सर्व गोष्टी ते लपूनछपून करत राहतात. एक दिवस अचानक आईच्या हे लक्षात येते, तेव्हा ती मनातून व्यथित होते, परंतु नंतर सगळ्यांनाच हे पटते कि, शिस्तीचा अतिरेक नको, तसेच मनमानी अथवा चंगळवादाचा देखील अतिरेक नको. अर्थात ही गोष्टही जुनी झाली. तेव्हा दोन पिढ्यांमधील वैचारिक दरीही अधिक होती. ती आता बऱ्याच अंशी कमी झालेली आहे, आणि मुले आपल्या मनातील गोष्टी अधिक मोकळेपणाने आपल्या पालकांना सांगू लागले आहेत. हे मी माझ्या स्वत:च्या अनुभवावरून सांगते आहे. पण ‌ ही परिस्थिती देखील सगळीकडे सारखी नसते.

पूर्वी घराघरातून आजी-आजोबा, काका-काकू, मामा-मामी अशी सगळी मोठी मंडळी असायची, एकत्र कुटुंबपद्धती प्रचलित होती. कुणालाही अडचण आली तरी, घरातीलच कुणाकडे तरी त्यावर उपायही असायचा. त्यामुळे बाहेरच्या "समुपदेशकाची" गरज तेव्हा पडत नसे, परीक्षेत नापास होणे हा गुन्हा नव्हता, नोकरी मिळायला थोडाफार वेळ लागतो, हे तरुणांनी स्वीकारलेले होते, गरज पडेल तर थोडीफार तडजोड करायला लागते, हे सर्वांना मान्य होते. त्यामुळे तरुण पिढीवर आताच्या मानाने मानसिक ताणतणाव खूपच कमी प्रमाणात होते. मोठेही उगाच मुलांनी हे करावे किंवा ते करावे अशा अवास्तव अपेक्षा ठेवत नव्हते. आयुष्यावर प्रेम कसे करावे ही कला, थोडक्यात सांगायचे तर लोकांना अवगत होती.

आज तरूण पिढीला समुपदेशकांची जास्त गरज भासते आहे. याचे मुख्य कारण स्वतःकडून आणि इतरांकडून देखील आपण खूप अपेक्षा ठेवून असतो, आणि त्या पूर्ण झाल्या नाहीत तर आपल्या मनात आपण जणु काही गुन्हा केलाय अशी भावना निर्माण होते. मनाचा कोंडमारा होतो, कारण व्यक्त होण्यासाठी योग्य व्यक्ती सापडत नाही. जे आपल्या आजूबाजूला आहेत, त्यांच्यावर आपण पूर्ण विश्वास टाकू शकत नाही. यातूनच मग काहीतरी टोकाचे निर्णय घेतल्या जातात. चित्रपट सृष्टी किंवा मोठमोठे उद्योगपती यांचे विश्वच वेगळे असते, त्यामुळे त्यांच्याविषयी आपण काही बोलणे योग्य नाही. परंतु जेव्हा सामान्य लोकांच्या घरातून धक्कादायक घटना घडताना दिसतात, तेव्हा मन व्यथित होते. या गोष्टी कशा थांबवता येतील याचाच विचार सतत मनात येतो.

" माझ्या व्यावसायिक जीवनात काही प्रसंग असे आले कि पालक म्हणून आपण कुठल्या चुका करायला नकोत हे कळले. तसेच माझ्या पिढीला वाटते तेवढी हि पिढी वाया गेलेली नाहीये, हे देखील कळले. किंबहुना, आजच्या पिढीकडे जास्त सामंजस्य आणि प्रगल्भता आहे असाच माझा समज झाला आहे. एकदा माझ्याकडे एका विद्यार्थ्यांची आई आली. तिला अक्षरश: रडू आवरत नव्हते. कारण असे होते, कि तिचा मुलगा तिला काहीच सांगत नसे. काही विषयात तो नापास झालेला असून, त्याचे एक वर्ष वाया गेलेले होते. मन दु:खी असल्यामुळे तो घरातून बाहेर पडत असे, पण कॉलेजला येत नसे. आईला हे कळले तेव्हा तिला चिंता वाटणे स्वाभाविकच होते. पण आई जर रडू लागली तर मुले अजून दुःखी होतात. त्यामुळे या प्रसंगी त्या विद्यार्थ्याला हा विश्वास देणे आवश्यक होते, कि तुझ्या घरातील मंडळीच काय तर आम्ही सारे शिक्षक देखील तुझ्यासोबत आहोत. काही काळजी करू नकोस. आज गेलेले एक वर्ष, हे तुला बरेच काही शिकवून गेलेले आहे. ते वाया गेलेले नाही. विद्यार्थ्याच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला आणि पुढील काळात त्याने आम्हा कोणाचाही विश्वास बसणार नाही, एवढी प्रगती केली. एखाद्या आयुष्याचे असे सोने झालेले बघताना खरंच खूप समाधान वाटते. पण कधीकधी मनाला यातना देणारे प्रसंग देखील घडतात.

देशाची संपत्ती म्हणून ज्यांच्याकडे आपण आशेने बघतो, अशी गुणी तरुण मुले छोट्या छोट्या कारणांनी आपले सोन्यासारखे जीवन संपवून टाकतात. आयुष्य हे जीवनाचा आस्वाद घेण्यासाठी आहे, शक्य होईल तेव्हढी मदत दुसऱ्यांना करण्यासाठी आहे, आणि एक गोष्ट नाही जमली तरी आपण दुसरे काहीतरी करू शकतो ही गोष्टच त्यांना माहिती नसते. आयुष्याचा हेतू काय हा विचारच त्यांनी केलेला नसतो. त्यामुळे त्यांना या सगळ्या गोष्टी घरातील मोठ्यांच्या आचरणातून शिकता आल्या पाहिजेत. आजच्या तरुण पिढीला "एम्पथी म्हणजेच तदनुभूति " ची गरज आहे. त्यांचे मन जाणून घेणारे कुणीतरी त्यांना हवे आहे.

"मितवा" या सिनेमातल्या सारखा मित्र, तत्वज्ञ आणि वाटाड्या अर्थात, फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड जर आयुष्यात असेल, तर आयुष्याची नाव प्रवाहात भरकटत जाणार नाही. याबद्दल पुन्हा कधीतरी लिहेन, कारण हा खूप मोठा विषय आहे.

घरात "सुख, शांती आणि समाधान या त्रयींचा नेहमी वास असावा. मन समाधानी असेल तर शांती आपोआप येते. आणि शांती असेल तर सुखदेखील लाभतेच. म्हणूनच म्हटलेले आहे, अशांतःस्य कुत: सुखं? अर्थात शांती नसेल तर सुखही लाभणार नाही. इतरांच्या घरात आहेत, म्हणून माझ्याही घरात महागड्या वस्तू असाव्यात हा हव्यास नको. मनात असूयेची भावना असता कामा नये. "घटाघटांचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे" असेच या विठ्ठलाने जग निर्मिलेले आहे. त्यामुळे कुणाशीही निष्कारण तुलना करीत बसू नये. तसेच आपल्या अवास्तव, अवाजवी अपेक्षांचे ओझे इतरांवर लादू नये. घरातील प्रत्येकाने आपापले काम करावे ही गोष्ट तर स्वागतार्हच आहे, पण काही कामे जर आपण वाटून घेतलीत, किंवा एक दुसऱ्यांसाठी केली तर त्यातून परस्पर संबंध अधिक घट्ट होतात. कधी तरी घरातल्या कुणाची तरी तब्येत बरी नसते, तेव्हा आपण थोडी त्या व्यक्तीची काळजी घेतली, तर आयुष्यभर त्या आठवणी आपल्याला सोबत करतात. लिहिण्यासारखे बरेच आहे, पण आता आवरते घेते.

माझ्या मनातील सुखी समाधानी घर काहीसे असे आहे,

"जो चाँदनी नही तो क्या, ये रोशनी है प्यारकी, दिलोंके फूल खिल गये तो फिक्र क्या बहारकी, मगर ये घर अजीब है, जमीन के करिब है..........

परस्परांमधील प्रेम, आपुलकी, जिव्हाळा या गोष्टी घराला घरपण देतात. त्यामुळे या भावना योग्यरीतीने व्यक्त व्हायला हव्यात.

हे सारे लिहिता लिहिता मला सहज सुचलेली एक कविता..

मी थकुनि येता, मला मिळे आसरा,

मी दु:खी होता, चेहरा दिसे हासरा..

घर ऐसे मजला हवे, मजला हवे,

तालात माझिया ताल मिसळूनी धावे

ना जमले मजला, गणित आयुष्याचे

राहिले मनातच घर माझ्या स्वप्नांचे

तरी जाणुनी माझे मन, त्याने घ्यावे,

त्याच्याच कुशीतून स्वप्न पुन्हा जागावे

ना गवसती वाटा, जरी महंतांच्या मज,

तरी जाणून घ्यावे मनीचे त्याने गुज..

मज शांत झोप लागावी, अशी रात्र घेउनी यावे

आभाळापरी मजला पांघरूण त्याने द्यावे

- डॉ. अंजली देशपांडे

bottom of page