हरवलेले घड्याळ

आज सुमनला ऑफिसातून निघायला जरा उशीरच झाला होता. मीटिंग संपवून ती तिच्या केबिन मध्ये आली. अरे देवा, तिची पर्स ती चुकून टेबलावरच सोडून गेली होती. आत तसे पैसे जास्त नसत, पण असा वेंधळेपणा बरोबर नाही हे तिला जाणवले. घाईघाईने ती बाहेर आली आणि घराच्या वाटेने निघाली. एक दोन दिवसांनतर तिच्या लक्षात आले, कि तिने मोठ्या हौसेने घेतलेल्या अतिशय सुंदर नक्षीकामाच्या बांगड्या काही दिसत नाहीयेत. तिने घरात सगळीकडे शोध घेतला, पण बांगड्या काही मिळेनात, खूप आठवायचा प्रयत्न केला, कदाचित उशीखाली ठेवल्या असतील, पण तिथे राहिल्या तर कुठे कशा जातील? घरात वायफाय चे काम करणारी माणसे होती खरी दोन दिवसांपूर्वी, त्यांच्यातील कुणाला तर सापडल्या नसतील? कि ऑफिस मध्ये बॅग टेबलवर राहिली, चुकून त्यात बांगड्या विसरली असेल, तर कुणी काढून तर घेतल्या नसतील? कि मग घरातील नेहमीच्या काम करणाऱ्या मावशींना तर त्या मिळाल्या नसतील ? समोर एखादी मौल्यवान वस्तू दिसली तर ती घेण्याचा मोह कुणाला नाही होणार? मनात हे विचार चालू असतानाच अचानक तिला ४० वर्षांपूर्वी घडलेली घटना आठवली. अगदी स्पष्ट, जशीच्या तशी.
ती तेव्हा अगदी ७-८ वर्षांची होती. माहेरचे घर म्हणजे सरदेशपांडेंचा मोठ्ठा वाडा. घरात बहुतेक कामे, म्हणजे केरवारे, सडा रांगोळी, बाहेरचे कपडे धुणे, चहाच्या कपबशा आणि पाण्याचे पेले घासून ठेवणे हि कामे घरातील सगळी मंडळी मिळूनच करीत. भांडी घासणे, रोजची धुणी धुणे, आठवड्याला घरे सारवणे या कामांसाठी सरस्वती नावाची बाई येत असे. सरस्वतीच्या आईच्या वेळेपासून हे काम त्यांच्याकडेच होते. म्हणजे तिला या घरात काम करून खूप दिवस झालेले होते. ती अगदी घरातल्या व्यक्तीसारखीच होती म्हणा ना. सरदेशपांडेंचा वाडा ३ मजली होता, त्यात मधल्या मजल्यावर एक बाल्कनी होती. बाल्कनीला छत होते. तिथे बरेचदा रंगीत कपडे वाळत घातले जात, त्यामुळे सरस्वती कधी सारवण करण्यासाठी तर कधी कपडे वाळत घालायला वरच्या माडीवर जात असे. एकदा सुमन माडीवरच्या खोलीतल्या खिडकीत अभ्यासाला बसलेली होती. सरस्वती कपडे वाळवण्यासाठी तेथे आली. खोलीत एक टेबल होते, त्यावर मोठा रेडियो आणि त्याच्यासमोर काकांचे मनगटी घड्याळ ठेवलेले होते. सरस्वतीने सहज म्हणून ते उचलून बघितले. आणि नंतर ती निघून गेली.
त्यानंतर अचानक काका त्यांचे घड्याळ सापडत नाही म्हणून ते शोधू लागले. कुणी पहिले का, कुणी पहिले का करता करता सुमनला पण विचारले. तेव्हा तिने पाहिलेला प्रसंग जशाचा तसा सांगितला. याचा पुढे काय परिणाम होणार आहे, हे तिच्या लहान जीवाला कळले नाही. साहजिकच सरस्वतीला तिने घड्याळाला हात लावला का हा प्रश्न विचारण्यात आला. तिच्या भाबड्या मनाला त्या प्रश्नाचा रोख काय आहे ते उमगले. ती काहीच बोलली नाही. घरात हरवलेली वस्तू आपल्याकडे आहे का याची विचारणा व्हावी याचे तिला खूप दुःख झाले. आपण या घरातील लोकांचा विश्वास गमावला असेच तिला वाटले, आणि एवढेसे तोंड करून, आपली छोटीशी गुंडाळी करून ठेवलेली पिशवी उचलून ती निघून गेली. घरातील सगळ्यांनाच खूप वाईट वाटले, पण तिचा स्वाभिमान दुखावल्या गेला होता, त्यामुळे काहीच बोलण्यात अर्थ नव्हता. त्यानंतर सरस्वतीची पावले सरदेशपांड्यांच्या वाड्याकडे पुन्हा कधीच वळली नाहीत. या घटनेचे पडसाद सुमनच्या मनावर कायम कोरले गेले, कारण काकांचे हरवलेले घड्याळ दादाच्या मित्राच्या लहान भावाने गंमत म्हणून उचलून नेले होते, ते त्याने नंतर परत आणून दिले. सरस्वतीच्या प्रामाणिकपणावर आणि सुमनच्या निष्पाप मनावर उठलेला ओरखडा मात्र कायम राहिला. पुढे सरस्वतीला चांगले दिवस आले, तिचा मुलगा छान शिकला, त्याला चांगली नोकरी लागली, एवढेच काय ते समाधान सर्वांना मिळाले.
हा प्रसंग आठवला आणि सुमनच्या डोळ्यात पाणी तरळले. आज बांगड्या हरवल्यानंतर कुणालाही काहीही विचारायचे नाही, अशी चूक पुन्हा आपली हातून होऊ नये असेच सुमनने ठरवले. म्हणजे कुणाचीतरी चूक लपवायचा त्यात मुळीच उद्देश नव्हता, तर जोडलेली माणसे दुरावण्याचा धोका तिला पत्करायचा नव्हता. हीच माणसे आपल्या मागे आपले घर सांभाळतात याची पूर्ण जाणीव तिला होती. आपल्या वेंधळेपणाने, काही गोष्टी हरवतात, म्हणून त्याचा तपास घेत बसण्यापेक्षा आपण आपल्या वागण्यात शिस्त आणणे जास्त आवश्यक आहे हे तिला चांगलेच कळून चुकले होते. हा निर्णय घेतल्यावर तिचे मन एकदम हलके झाले, आता बांगड्या हरवल्याचे दुःख तिला अजिबात होत नव्हते, तर सरस्वतीवर झालेल्या अन्यायाला अंशतः का होईना न्याय मिळाला, याचे समाधान वाटत होते. हरवलेल्या घड्याळाने तिला तिच्यातील माणुसकीचा साक्षात्कार झाला होता. - डॉ. अंजली देशपांडे
Listen Our Podcast on Your Favorite Platform:
Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor
Follow Us on Social Media Platforms: