top of page
Search

गुळवेल - कडू पण अमृतासारखी गुणकारी

गेले काही दिवस लाल आणि काळी माकडे ओली गुळवेल खात आहेत ; ऋतू , हवा ,सध्याची साथ या नुसार त्यांना तशी अंतःप्रेरणा तर होत नसेल ?


जर असेल तर योग्य मात्रेत गुडूची पत्र स्वरस सर्वानी घ्यायला हरकत नसावी, ओल्याच वापरायच्या द्रव्यांत गुडूची येते. आयुर्वेदामध्ये जे पिंडी ते ब्रम्हांडी अशा न्यायाचा उल्लेख आढळतो यालाच लोक पुरुष साम्य सिद्धांत असे म्हणतात. या नुसार ज्याप्रमाणे निसर्गामध्ये सर्व घटक आहेत त्याचप्रमाणे आपल्या शरीराची ठेवण सुद्धा तशीच असते.

गुळवेलीला गुडूची,हिंदीमध्ये गीलोय,तसेच अमृता असेही म्हणतात. कारण ही अमृतासमान गुणकारी आणि शरीराची रक्षण करणारी आहे. गेल्या काही महिन्यांपासून आपण कोरोना बद्दल च्या बातम्या ऐकत आहोत, वाचत आहोत. त्यासोबत आपण हेही ऐकलं असेल की गुळवेलीचा काढा, गुळवेलीचे चूर्ण, तसेच गुळवेलीचा रस यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे.चला तर मग जाणून घेऊया की गुडूची अर्थात गुळवेल कशी हितकर आणि औषधी आहे याबद्दल…

गुडूची कटुका तिक्ता स्वदुपाका रसायनी |

संग्रही कषाय ऊष्णा लघु बल्या अग्नीदिपनी || - धन्वंतरी निघंटू ग्रंथ

कटू आणि तिक्त चवीची, पचण्यास हलकी, कषाय म्हणजे तुरट, उष्ण, अग्निदीपन करणारी आणि रसायन कार्य (सर्व शरीर धातूंना बळ देणारी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी) अशी ही वेल आहे.

भारत वर्षामध्ये सगळीकडे उगवणारी विशेषतः आंबा आणि कडुनिंबाच्या झाडावर ती आढळते. ही एक बहुवर्षीय वेल आहे. वेगवेगळ्या अवयवांच्या तसेच संस्थेच्या व्याधींमध्ये गुळवेल अत्यंत प्रभावीपणे वापरता येते. सर्वात मुख्य म्हणजे ज्वरामध्ये अर्थात ताप आल्यावर गुळवेलीचा काढा किंवा चूर्ण किंवा घनवटी म्हणजे गोळी वापरली जाते.त्याचसोबत आम्लपित्त,आमवत,संधीवात,कुष्ठ,प्रमेह, हृदयाला बल देणारी अशी ही वेल आहे.गुळवेल यकृताला बल देणारी असल्याने कावीळ बरी करायला गुळवेल खूप प्रभावशाली आहे.


लागवड – गुळवेल लावण्यासाठी तिचे ओले कांड(sticks) काप करून थेट कुंडीमध्ये लावता येतात,याला अत्यंत सोप्या,कमी कष्टात उगवणारी वेल म्हणू शकतो,कारण केवळ एका कुंडीत लावलेली गुळवेल ही काही मीटर पर्यंत वाढते आणि पसरते.याचे वैशिष्ट्य म्हणजे कुठलाही आधार न देता सुद्धा ही वेल आपोआप आपला मार्ग काढत वाढते.


गुळवेलीचा घरगुती वापर :

1. गुळवेल एकदा मोठी होऊ लागली की तिला अनेक हिरवीगार हृदयाच्या आकाराची पाने येऊ लागतात.किंचित तुरट आणि कडू असणारी ही पानं चाऊन खाता येतात याने पोटात कडू रस जातो जो शरीराला अत्यंत गरजेचा आहे.

2. ज्यांना विडा म्हणजेच पान खायची सवय आहे,त्यांना याच गुळवेलीच्या पानांचा विडा बनवून खाऊन बघावा.याला आपण covid (कोविड) विडा म्हणून खात्रीने खाऊ शकतो.


3. गुळवेल कांड जेव्हा करंगळी एवढे जाड होतात,तेव्हा एक बोटभर कांडी घेऊन ती ठेचून काढा करून त्यांना सर्दी खोकला असणाऱ्या,ताप असणाऱ्या रोगांमध्ये तसेच निरोगी व्यक्तीनी रोगप्रतिकार शक्ती वाढवायला याचा वापर निश्चितपणे करावा.

4. गुळवेल चूर्ण,जे गुळवेल कांडीला छाया शुष्क पद्धतीने म्हणजेच आयुर्वेदाच्या विशेष औषधी निर्माण प्रक्रियेने बनवले जाते,आपल्या जवळच्या वैद्यांकडून आपण हे चूर्ण आणून त्यांच्या सल्ल्याने ते तूप/मध/गरम पाणी यांच्या सोबत घेऊ शकतो.

5. चहा ऐवजी आपण जर गुलवेलीचा (पानांचा आणि कांडीचा) काढा करून पिला तर तो रोगप्रतिकारकशक्ती वाढवायला मदत करेल.किंचित हळद आणि गूळ घातल्यास लहान मुलेही चवीने हा काढा घेऊ शकतील.गुळवेल रसायन असल्याने नित्य सेवनिय आहे.आपण रोज तिचा वापर करू शकतो.

6. औषधी स्वरूप. गुडूची घनवटी, गुडूची सत्व, स्वरस यासारखे वेगवेगळ्या औषधांचा वापर आपल्या वैद्यांच्या सल्ल्याने करावा.

काही दिवसांपूर्वी काही लोकांनी एक खोटा आरोप करून गुळवेल कशी घातक आहे,त्यातही ती liver म्हणजे यकृताला कशी घातक आहे आणि तिच्यामुळे रुग्णांना नुकसान झाल्याचा बिन बुडाचा आरोप केला..आजवर भारतासह अनेक देशात जे जे औषधी वनस्पतींमध्ये संशोधन झाले,त्यात सगळ्यात जास्त संशोधन गुळवेल या वनस्पतीवर झाले.सगळ्यात जास्त रिसर्च पेपर आणि आर्टिकल गुळवेल अर्थात Tinospora cordifolia वर झाले आहेत.त्यातील काही रेसर्च पेपर ची लिंक आणि माहिती पुढीलप्रमाणे

1. गुळवेल ही anti-diabetic ,anti-microbial ,anti-HIV,anti-Arthritic,anti-Cancerous,anti-toxic आहे असे सिध्द करणारा हा रिसर्च पेपर

https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC3644751/

2. गुळवेल ही Hepato Protective अर्थात यकृताचे रक्षण करणारी असल्याचे सिध्द केलेलं आहे.

https://www.journaljpri.com/index.php/JPRI/article/download/17959/33276

रसिकांनी जरूर या लिंक ओपन करून गुळवेळीचे शोध प्रबंध वाचावेत आणि सोबत आपल्या घरी ही बबहआयामी,बहूमोलाची आणि अमृतासारखी गुणकारी, हितकर गुळवेल लावायला आणि तिचा सेवन करायला विसरू नका.काही प्रश्न टिपण्णी अथवा शंका असल्यास खालील मेल आयडी वर मला मेल करून कळवा.

ID- pushkarnachane@gmail.com

- पुष्कर नाचणे,

अंतिम वर्ष आयुर्वेदाचार्य.


 

Listen Our Podcast on Your Favorite Platform: Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor Follow Us on Social Media Platforms: LinkedIn | Instagram | Facebook

bottom of page