हिरवाई

रंग ही एक परमेश्वराने निर्मिलेली अनमोल गोष्ट आहे. अगदी नवजात बालकापासून ते वृद्धांना देखील हे रंग वेड लावतात. असाच सर्वांच्या मनाला आणि नेत्रांना सुखावणारा रंग आहे हिरवा...कवींच्या प्रतिभेला साद घालणारा हिरवा..शेतकर्याच्या हातातून जादू होऊन, जमिनीवर डुलणारा हिरवा..
पोपट, हरितपारवा, तांबट अशा अनेक पक्ष्यांच्या कांतीमधून मनाला भूल पाडणारा हिरवा..अबब..किती ह्या छटा..बघून थक्क व्हायला होतं.
हिरव्या रंगात खरोखर काय जादू आहे, निसर्गाच्या रोमारोमात हा भिनला आहे. तरूणाईचे प्रतिक असलेला असा हा रंग.
वि. द. घाटेंचे, "पांढरे केस हिरवी मने" इथे आठवते. हिरवे म्हणजे इथे तरूण असा अर्थ आहे. म्हणजे केवळ केस पांढरे झालेत, म्हणजे एखादी व्यक्ती म्हातारी होत नाही, तर त्या व्यक्तीची जीवनाबद्दल असलेली निष्ठा, उमेद ही त्या व्यक्तीचे वय ठरवते. अशाच काही व्यक्तींचे चित्रण या पुस्तकात आढळते. तसेच बालकवींची "हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे" काय किंवा "गवतात गाणे झुलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे" ही अलिकडच्या काळातील
सौमित्र यांची कविता काय, मनाला नकळत उभारी देऊन जातात.
पावसाळा सुरू झाल्यानंतर तर या हिरव्या रंगाची, निसर्गात मुक्त हस्ताने उधळण झालेली दिसते. मुंबई-पुणे प्रवास करताना, दृतगती मार्गावरून जात असताना, विशेषतः पावसाळ्यात निसर्गाचं जे काही रूप असतं ना, ते केवळ अवर्णनीय..
अशाच एका प्रवासात, मनात कल्पना आली, की ही सृष्टी जणु हिरवे परकर पोलके घालून, इंद्रधनुची ओढणी घेऊन, पावसाच्या थेंबांचे दागिने घालून नटली आहे, आणि तिला बघून सगळेच वातावरण एका अलौकिक आनंदात न्हाऊन निघाले आहे. वारा रंगात येऊन नाचू लागला आहे आणि तीही जणु पायात झऱ्याची पैंजणे घालून नाचते आहे. ही एक कविता सृष्टीसुंदरीला बघून सुचलेली..
हिरवी हिरवी लेवूनी वसने, आज सजली वसुंधरा,
पाहूनी तिजला गाणे गाई आसमंत सारा....॥धृ॥
घालुनी पायी घुंगुर वाळा, नाच नाचे वारा
धुंद होऊनी बरसून जाई गगनाचा गाभारा..
वेडेपण आभाळाचे, मिरवी रान सारे,
मोर मनाचे बेभान होती, फुलवूनिया पिसारा ॥१॥
वाटा सगळ्या गेल्या भिजुनि,
ओली त्यांची मने
हिरव्या हिरव्या तरूंच्या मनी हिरवाईचे गाणे
मन रानाचे ओसंडते
कडे कपारीतून
प्रेमातुनी त्या जन्मास येते..
हळवे हिरवेपण॥२॥
- डॉ. अंजली देशपांड