top of page
Search

तर जीवन जगतो आहेस तू...

बाल्य, तारुण्य, प्रौढत्व, वृद्धत्व या प्रत्येक सजीवाच्या आयुष्यातील अवस्था. त्या त्या अवस्थेची काही वैशिष्ट्ये असतात. बाल्यावस्था हा नवनवीन गोष्टी शिकण्याचा, आत्मसात करण्याचा काळ तर तारुण्य म्हणजे जे शिकलो ते प्रत्यक्षात आणण्याचा काळ. थोडक्यात काय तर आयुष्यातील सर्वोत्तम निर्मितीचा काळ. इथे आपण स्वयंपूर्ण झालेले असतो. स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकतो. काहीतरी योगदान करू शकतो. याचा अर्थ प्रौढत्व आणि वृद्धत्व म्हणजे रिकामपणाचा काळ असा मात्र अजिबात नाही. काही दिवसांपूर्वीच एक खूप सुंदर विचार ऐकला की, जो नेहमीच काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करतो तो तरुण. मग त्याचे वय कितीही असो.

वय ही खरंतर एक वृत्तीच आहे असे म्हणता येईल. इथे मला "साठ साल के बूढ़े, या साठ साल के जवान" ही एक जाहिरात आठवते. च्यवनप्राश खाल्ल्यामुळे तुम्ही चिरतरुण राहता असे सांगण्याचा प्रयत्न या जाहिरातीद्वारे केला आहे. हे कितपत खरे आहे ते प्रत्येकाने आपापले ठरवावे.

पण मला वाटतं की, विचारांचे च्यवनप्राश, कृतींचे च्यवनप्राश हे एखाद्या व्यक्तीला चिरतरुण ठेवू शकतात, यात मुळीच संशय नाही. म्हणजे नविन काहीतरी करून दाखवण्याचा विचार आणि त्या दिशेने उचललेले पाऊल, हे एखाद्या व्यक्तीच्या तारुण्याचे प्रतिकच आहे.

उत्तर प्रदेश मधील मुजफ्फरनगर येथील चंद्रो तोमर, प्रकाशी तोमर या "शार्प शूटर" भगिनींना तुम्ही वृद्ध म्हणणार की तरूण?

तर जीवन हे असे हवे, काहीतरी करून दाखवण्याची ईर्षा मनी असलेले..वय कितीही असो, येणाऱ्या प्रत्येक क्षणाचे, मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे सोने करण्यात व्यस्त आणि व्यग्र असलेले..

मला आठवतंय, दहावीचा निकाल लागल्यानंतर मला अभिनंदन पर खूप पत्रे आली. पण त्यात एक अतिशय आगळंवेगळं पत्र होतं.. वसंत सदाशिव नानल यांचं. तरूण भारत या दैनिकात ते लिहित असंत. तर हे पत्रं माझ्या कायमचं स्मरणात राहिलं. माझं कौतुक तर त्यात होतंच, पण एक खूप सुंदर वाक्य होतं..ते असं.."हत्ती होऊन लाकडे फोडण्यापेक्षा मुंगी होऊन साखर गोळा करण्याचा प्रयत्न कर".. वाचताक्षणीच ते वाक्य मनाला भिडलं, मनाच्या खोल कप्प्यात बिंबवल्या गेलं.

त्या वाक्यातला अर्थ आजवरच्या आयुष्यात नेहमी मार्गदर्शक ठरला आणि त्याचा प्रत्यय येत गेला.


खरोखर काहीतरी चांगलं काम हातून घडावं अशी ओढ कायम मनाला चिरतरुण, चैतन्यमय ठेवते.

म्हणूनच जावेद अख्तर यांच्या प्रसिद्ध ओळी मनाला भावतात आणि एक प्रयत्न मीही करून बघते, त्यांना मराठीत अनुवादित करण्याचा..जावेद अख्तर यांची कविता

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम

नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम


हवा के झोकों के जैसे आज़ाद रहना सीखो

तुम एक दरियाँ के जैसे लहरों में बहना सीखो

हर एक लम्हें से तुम मिलो खोले अपनी बाहें

हर एक पल एक नया समा देखे यह निगाहें


जो अपनी आँखों में हैरानियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम

दिलों में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो, तो ज़िंदा हो तुम


माझा स्वैर अनुवाद:


हृदयात तुझ्या असेल बेचैनी, तर जीवन जगतो आहेस तू,

नयनात असेल स्वप्नांची सौदामिनी तर जीवन जगतो आहेस तू


मस्त पवना सारखा जरा स्वच्छंद जगून बघ,

खळाळत्या झर्‍यासारखा बेधुंद जरा वाहून बघ..


आयुष्यात येणार्‍या प्रत्येक संधीचे सोने कर तू..

आयुष्यात येणार्‍या प्रत्येक क्षणात नाविन्य शोध तू..


नयनात जर उत्सुकता, आतुरता असेल तर जीवन जगतो आहेस तू

हृदयात तुझ्या असेल बेचैनी, तर जीवन जगतो आहेस तू...


- डॉ. अंजली देशपांडे

 

Listen Our Podcast on Your Favorite Platform: Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor Follow Us on Social Media Platforms: LinkedIn | Instagram | Facebook

bottom of page