top of page
Search

देह दुर्लभ निरूपण : ज्योती कुलकर्णी



(दासबोध दशक १८समास४)

ग्रंथराज दासबोध या ग्रंथाच्या अभ्यासाने मनुष्याच्या अंतरंगात बदल घडावा आणि त्यामुळे त्याची क्रिया पालटावी हा ग्रंथ लेखनाचा प्रमुख हेतू श्रीसमर्थ रामदासस्वामींचा होता.समाजाच्या उन्नतीसाठी समाजाचा घटक असलेल्या व्यक्तीच्या स्वभावाची घडणच बदलविणे गरजेचे असते.असे श्रीसमर्थांना त्याकाळी वाटले‌.आणि आजच्या काळातही तीच गरज प्रामुख्याने आपल्याला भासते.


दासबोधाचा अभ्यास म्हणजे आत्मविकासाचा (self development) अभ्यास होय.सर्वश्रेष्ठ अशा मनुष्य योनीत आपण जन्माला आलो आहोत.तर या जन्माचे विवेकाने वागून सार्थक करावे. हे आपल्याला देह दुर्लभ निरूपण(दशक १८समास ४) या समासात श्रीसमर्थ आपल्याला सांगतात. समाजात काही भोगवादी असतात तर काही संन्यास वादी असतात. संन्यास वादात देहाला किळसवाणे ठरवुन निंदा केलेली दिसते. तर भोग वादात देहाला अति महत्त्व दिलेले दिसते. कारण देहाच्या द्वारेच जगातील सारे भोग भोगले जातात किंवा भोगणे शक्य होते.


श्री समर्थांच्या मते हे दोन्ही वाद अतिरेकी आहेत. माणसाचा देह हा नुसता हाडा मासाचा गोळा नसून ते एक विलक्षण यंत्रच आहे. असे श्रीसमर्थ म्हणतात. आपल्या देहाचा व त्यामधील शक्तींचा नीट वापर करून घेतला तर नाना विद्या आपण आत्मसात करू शकतो. सृष्टी मध्ये अनेक देह आहेत प्राणी,पशुपक्षी ,कीटक इत्यादी. परंतु, मानवी देह हा सर्वश्रेष्ठ देह आहे. कारण, मनुष्याला *बुद्धीची* सर्वश्रेष्ठ देणगी ईश्वराकडून प्राप्त झाली आहे. विवेक बुद्धीने मनुष्य आपलं जीवन सार्थकी लावू शकतो.


देहा मुळेच आपण नवविधाभक्ति करू शकतो (श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चनभक्ती, वंदनभक्ती, दास्यभक्ती, सख्यभक्ती व आत्मनिवेदन भक्ती). आपल्याला मानवी देह लाभल्याने आपण लेखन वाचन श्रवण करू शकतो अनेक विद्यांचा अभ्यास करू शकतो जसे की साहित्य, काव्य, नृत्य, संगीत इत्यादी.

कर्मयोग ,उपासना मार्ग, ज्ञान मार्गाचे आचरण देहामुळेच करू शकतो. प्रत्यंतर ,अनुभूती घेण्यासाठी देहच गरजेचा आहे. विज्ञानाचे संशोधन करणे हे देहामुळे शक्य होते. देहा मुळे साधू, महाज्ञानी ,सिद्ध ऋषी-मुनी ,गुरु ,सज्जन, योगी विरक्त, श्रोते होतात.

देहा मुळेच आपण श्रवण करून सज्जनांचे सद्गुरूंचे विचार ऐकू शकतो वाचू शकतो. त्यावर मनन चिंतन करून परमात्म्याची प्राप्ती करू शकतो. देहा मुळे वेगवेगळ्या प्रकारची तपं, अनुष्ठाने, पुरश्चरणे करू शकतो. दानधर्म करू शकतो.


देहा मुळेच आत्तापर्यंत पर्यंत अनेक अवतारी पुरुष होऊन गेले. विस्कटलेल्या समाजाला त्यांनी योग्य मार्ग दाखवून दिला व समाजाची विस्कटलेली घडी नीट बसवून दिली. देहा मुळे विषय भोग भोगता येतात तसेच, सगळ्यांचा त्यागही करता येतो. विविध व्याधी होतात व त्या बर्याही होतात. विविध युक्त्या, मते देहा मुळेच होतात. रहस्य उलगडता येतात ती ही देहा मुळेच. अनेक गोष्टी मिळवू शकतो , स्वार्थ साधू शकतो तो ही देहा मुळेच. चांगले काम वाईट काम (पाप - पुण्य) म्हणजेच पुण्यशील किंवा पापी आपण देहा मुळेच होतो. तीर्थाटन देशाटन देहामुळेच करू शकतो. देहा मुळेच विविध कला आत्मसात करू शकतो. विविध प्रकारची कीर्ती-अपकीर्ती, सन्मार्ग-वाईट मार्ग ,भ्रम- संभ्रम, यश-अपयश देहामुळेच प्राप्त होते. एकूणच काय चांगल्या वाईटाचा अनुभव आपल्याला देहा मुळेच मिळतो. म्हणजेच देहा मुळे माणूस वाया जातो किंवा धन्य होतो. सर्व देहां मध्ये मानवी देह उत्तम आहे. कारण त्यामध्ये आत्माराम आहे. विवेकबुद्धी आहे. देह नसेल तर आत्मा असून नसल्यासारखा आहे म्हणूनच देहाला

देह परलोकी चा तारू| नाना गुणांचा गुणागरु|

नाना रत्नांचा विचारू| देह्याचेनी ||१८.४.२२

म्हणजेच मानवी देह हा जीवाला भवसागरातून पैल तीराला नेणारे जहाज आहे. अनेक गुणांची खाणच आहे हा देह. विविध रत्नांची पारख देहामुळेच होते.


देहा मुळेच चांगले-वाईट कर्म होतात व्यवहार चालतो. अशा कर्मामुळे पाप पुण्य मिळते उणेपणा किंवा अधिक पणा मिळतो. भक्तीमार्गाची गोडी देहामुळेच लागते. सन मार्गाची अनेक साधने देहामुळेच साध्य होतात. देहामुळेच मोक्ष मिळतो. मानवी देहात मूळचा भगवत संकल्पच आहे. एखाद्या वेलीच्या मुळात बीज असते कालांतराने वेलीची वाढ होते व फलधारणा होते. त्या फळात बीजाचाच अंश असतो. म्हणजेच जसे बीज असते तसेच फळ असते. त्याचप्रमाणे ब्रम्हांडरुपी वृक्षाला आलेले फळ म्हणजेच मानवी देह आहे. असा हा मानवी देह दुर्लभ आहे सहजगत्या प्राप्त होत नाही.चौर्‍यांशी लक्ष योनी तून मानवी देह मिळण्यासाठी पाप-पुण्या ची समता व्हावी लागते. असा हा दुर्लभ देह पारमार्थिक साधनेला लावून मोक्ष मिळवावा. म्हणून सत्कर्म, परमार्थ करून देह सार्थकी लावावा असे श्रीसमर्थ आपल्याला सांगतात.


जगामध्ये जन्माला येणारा प्रत्येक जीव आपापली कर्मे करत असतो .काही कर्म लहान असतात तर काही मोठी असतात. काही जीव भगवंत भजनाने पावन होतात. मानवी देह पंचमहाभूतांनी व त्रिगुणांनी बनलेला असतो. म्हणजेच मानवी देहाचा मूळ संकल्पच हा आहे. हे जे मुळचे स्फुरण आहे तेच जगातील अनेक देहांत आढळून येते. वृक्षाच्या मुळाशी बीज असते.कालांतराने वाढ झाल्यावर त्याला जे फळ लागते त्यात त्या मुळ बीजाचाच अंश असतो. म्हणजेच काय तर मूळात बीज असते तर बीजात मूळ असते. याच प्रमाणे सृष्टीत सर्व घटना घडत असतात.


मानवी देहा शिवाय जगामध्ये काही करता येत नाही. देह आणि आत्मा यांच्या परस्पर संयोगाने सर्व व्यवहार चालतात. आत्मा धारण करण्यासाठी देह लागतो व देहा मुळेच अंतरात्मा टिकून राहतो. जसे पेन आणि शाई पेनात शाई असेल तरच आपण लिहू शकतो ना!

नुसता पेन किंवा शाई असून चालत नाही.

देहाने म्हणजे आपण काहीही केले तरी ते अंतरात्म्याला कळते. आजूबाजूला कोणी नाही पाहून बारीकशी जरी कृती केली (गुपचूपपणे) तरी ती आत्म्याला कळते. कारण आत्मा आपल्या देहातच असतो. त्याच्यापासून काहीच लपून राहू शकत नाही. Inbuilt CCTV कॅमेराच आहे तो आपल्या शरीरातील. आत्मा देहातच असल्याने आत्म्याला संतुष्ट करण्यासाठी देहाचे पूजन केले पाहिजे.देहाला सुखी ठेवले पाहिजे. देहाला दुःख पोहोचवले तर आत्मा ही दुखावतो. याचा आपण सगळ्यांनीच अनुभव घेतलेला आहे. म्हणून कधीच कुणाला दुःख होईल असे वागू नये. जना मध्येच जनार्दन आहे. सगळ्यांच्यात देवाचा अंश आहे. सर्वच देहांत आत्माराम असतो. म्हणून सगळ्यांना संतुष्ट करावे. आनंद सर्वत्र लुटावा आनंद द्यावा घ्यावा.


ज्या देहा मधून थोर विचार पुष्कळ प्रमाणात प्रगट होतात व त्याच्याकडून आत्मज्ञानाचा प्रसार केला जातो तो देह पूजनीय असतो. पुण्यवान असतो. अशाच देहाला पूजा करून घेण्याचा अधिकार आहे. सरसकट सगळ्यांची पूजा करणे योग्य ठरणार नाही. परंतु त्यांना मान देऊन संतुष्ट ठेवावे. कुणाचे मन कधीही दुखवू नये. सगळीकडे अंतरात्मा भरलेला आहे. याची नेहमीच जाणीव ठेवावी. त्याला दुखावले तर आपल्याला राहायला जागाच राहणार नाही. माणूस हा समाजशील प्राणी आहे. माणसांशिवाय तो राहू शकणार नाही.


परमेश्वराचे गुण अनंत आहेत. त्यांच्या या गुणांचे वर्णन शब्दात करता येणार नाही.भगवद्गीतेत याला *गुणातीत* असे संबोधले आहे. त्याच्या खाणाखुणा ही आपल्या लक्षात येत नाही. परंतु, अध्यात्म ग्रंथांचे श्रवण, वाचन, मनन केल्यास परमेश्वरी गुण थोडेफार समजू शकतात असे श्रीसमर्थ आपल्याला सांगतात. काहीही करायचे झाले तरी देह हा साधन म्हणून आवश्यकच आहे. चौदा विद्या ६४ कला मनुष्य देहा मुळेच आत्मसात करता येतात. असा हा दुर्लभ असलेला मानवी देह आपल्याला मिळालेला आहे. त्याची किंमत जाणून आपण विवेकाने वागावे. त्याला भोगी बनवू नये तसेच संन्यासी पण बनवू नये. परमार्थासाठी त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्यावा व सार्थकी लावावा. ||जय जय रघुवीर समर्थ||

- ज्योती कुलकर्णी

 
 

Listen Our Podcast on Your Favorite Platform:

Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor

Follow Us on Social Media Platforms:

LinkedIn | Instagram | Facebook



bottom of page