top of page
Search

कोकणातील करंबवणे

देशाटन करायचे म्हणजे देशाच्या बाहेरच जायला हवे असेच काही नाही. आपला भारत देश देखील अतिशय संस्कृती संपन्न आणि आणि भौगोलिक विविधतेने नटलेला आहे. अशाच काही हटके आणि फारशा ज्ञात नसलेल्या ठिकाणांविषयी देखील अधूनमधून जाणून घेऊयात.


३१ डिसेंबर म्हटले की सगळ्यांचीच नववर्ष स्वागताची जोरदार तयारी सुरू होते. नुसतेच मित्रमंडळींना भेटायचे, हॉटेलात जेवायला जायचे किंवा टीव्ही वरील कार्यक्रम बघायचे, नववर्षाची सुरुवात साधारणतः अशी होते. मला वाटते ते २०१६ वर्ष असावे. यावेळेस मात्र काहीतरी वेगळ्या पद्धतीने नववर्षाची सुरुवात करायची असे आम्ही ठरवले. काय करावे, कुठे जावे असा विचार सुरु झाला. आमची जयू आत्या आणि काका "करंबवणे" येथे एक अनाथ मुलांसाठी असलेल्या वसतिगृहात त्यावेळेस सेवेसाठी राहत होते. विश्व हिंदू परिषदेचा हा उपक्रम. या वसतिगृहाबद्दल खूप ऐकून होतो. त्यामुळे बरेच वर्षांपासून आम्ही जाण्याचे ठरवत होतोच. अनायसे योग जुळून आला. करंबवणे हे एक चिपळूण तालुक्यातील छोटेसे खेडेगांव. चिपळूणहून साधारणतः २१ किलोमिटर तर रत्नागिरीहून १०८ किलोमीटर अंतरावर वसलेले हे एक निसर्गरम्य खेडे आहे. आणि मला चांगलं आठवतंय की, त्यावेळेस तेथे जाण्यासाठी दिवसातून फक्त एकच एस. टी. बससेवा होती. तर या करंबवणेला भेट द्यायची, निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घ्यायचा व आपल्या परीने त्या मुलांसाठी काहीतरी करता येते का ते बघायचे असे ठरवून आम्ही निघालो. तेथे काय आणि कसे असेल? राहण्याची व्यवस्था कशी असेल? आपल्याला मुलांसाठी काय करता येईल? काय काय देता येईल असा विचार करीतच निघालो. मुंबईहून ३१ तारखेला निघालो. रात्री पुण्यात थांबून १ तारखेला चिपळूणच्या वाटेला लागलो. आम्ही प्रथमच तेथे जाणार असल्यामुळे काका आम्हाला घ्यायला चिपळूणला आले होते. हे वसतिगृह कसे असेल, मुले तेथे कशी राहत असतील, मावशी आणि काका कसे राहत असतील अशी उत्सुकता मनात होतीच आणि नकळत मनात चित्र देखील तयार झाले होते. रस्ता वळणावळणाचा आणि अरुंद होता. जेमतेम एक गाडी जाऊ शकेल एवढाच. दोन्ही बाजूनं गर्द आमराई, मधेच माडाची अन पोफळीची झाडे, अतिशय निसर्गरम्य परंतु दुर्गम अशी ती जागा होती. केशवसुतांचे कोकणातील "रम्य सुपीक खोरे"आठवले. मनावरचा सगळा ताण त्या वातावरणाने कुठल्याकुठे पळाला.

वशिष्ठ नदी

साधारणतः दुपारी १ वाजता आम्ही तेथे पोहोचलो. वसतीगृह अतिशय विस्तीर्ण आवारात बांधलेले आहे.

एक मोठी खोली मुलांसाठी व एक तेथे येणाऱ्या पाहुण्यांसाठी. सभोवताली असंख्य फळांची आणि फुलांची झाडे, मागच्या बाजूला स्वयंपाकघर आणि जेवणाची खोली. त्यामागे विस्तीर्ण शेते आणि पलीकडे दिमाखात उभा सह्याद्री. मनात सारे साठवत असतानाच आमची आत्या बाहेर आली. ती आमची वाटच बघत होती. अजून मुले मात्र आम्हाला दिसली नव्हती. ती सारी आपापला अभ्यास करण्यात मग्न होती, असे आम्हाला कळले.


थोड्याच वेळात जेवणाची तयारी झाली आणि मुलांना वर्दी गेली. समोरच्या खोलीतून पटापट साधारणतः ५-१२ वयाची १०-१२ मुले बाहेर आलीत आणि हातपाय धुवून, पाने मांडून, गोलाकार जेवायला बसली. त्यांची शिस्त अगदी बघण्यासारखी होती, त्यांच्या वागण्यात कुठेही कृत्रिम देखावा नव्हता. "वदनी कवळ" म्हणूनच जेवणाला सुरुवात झाली. आतल्या खोलीत आम्ही देखील जेवायला बसलो. अतिशय रुचकर असे जेवण आणि तेथील वातावरण यामुळे दोन घास जास्तच खाल्ले. जेवणानंतर प्रत्येकाने आपापले ताट वाटी घासून पुसून ठेवले. सारे आवरून, जागा सावरून मुले आमच्याशी बोलायला आली.

आम्ही त्यांच्याशी बऱ्याच विषयांवर बोललो. त्यांची स्वप्ने अचाट होती. कुणाला ​कंप्युटर इंजिनियर व्हायचे होते तर कुणाला शिक्षक. आमच्या गप्पा रंगात आल्या असतानाच जवळपासच्या काही बायका तेथे शिवणकामाचे धडे घेण्यासाठी आल्या. मग आम्ही बाहेर निघालो, बागेतून भटकून झाले. तेथील आमराया आणि अननसाची लागवड बघून आम्ही खूप खूष झालो.


बोलण्याच्या ओघात आम्हाला कळले की तेथील एक धनिक गृहस्थांनीं ही जागा विश्व हिंदू परिषदेला दान दिलेली आहे. तेथे एक गाव म्हणजे एक टेकडी आणि त्यावर पाच दहा घरे. असाच एक पुरातन वाडा बघायला आम्ही निघालो. वाडा अतिशय जुना म्हणजे साधारणतः १००-१५० वर्षांपूर्वीचा असावा. परंतु त्याचे वास्तुकाम बघून थक्क व्हायला झाले. तेथे अगदी सहज ५० माणसे सहलीला गेलीत तरी सोय होऊ शकते. वाड्याच्या बाजूला आमराई, पोहण्याचा छोटा तलाव, अतिशय सुरेख रचना होती. नुकतेच कुठल्याशा मराठी सिनेमा साठी त्या वाड्याची निवड झाली आहे असे कळले. हे सगळे डोळ्यात साठवतच आम्ही बाहेर पडलो. निसर्ग आम्हाला साद घालीत होताच. वशिष्ठ नदीच्या काठी तर अगदी एखाद्या चित्रातल्या जागेत आपण गेलो आहोत असे वाटले. हि प्रसन्नता मी प्रथमच अनुभवत होते. नदीचे पात्र अतिशय विशाल संथ आहे. तेथील सूर्यास्ताचा देखावा केवळ अवर्णनीयच! सूर्यास्ताचा देखावा बघून आम्ही वसतिगृहात परत आलो.


मुलांचे मैदानी खेळ आता आटोपले होते आणि संध्याकाळच्या शाखेची वेळ झाली होती. शाखा भरली त्यानंतर अनेक प्रकारचे शरीराला तसेच बुद्धीला चालना देणारे खेळ झालेत आणि लगेच हातपाय धुवून मुले शुभंकरोती म्हणायला तयार. खरोखरच मनाला अतिशय प्रसन्नता देणाऱ्या एक एक गोष्टी आम्ही अनुभवत होतो. रात्रीच्या जेवणाची तयारी करायला मी आत्या बरोबर स्वयंपाकघरात गेले आणि तिने एकेकाची कथा मला सांगितली. मनाचा विश्वास बसणार नाही अशा एकेकाच्या कथा होत्या. प्रमोदला आईने सोडून दिलेले, तर विनोदच्या वडिलांचे छत्र हरवलेले. परंतु त्या मुलांचे वागणे बोलणे बघून तर ते खरेच वाटले नसते. प्रतिकूल परिस्थिती असूनही शिकण्याची तळमळ त्यांच्या अंगी दिसून आली. शहरातील अनेक घरातून पालक मुलांवर चांगले संस्कार व्हावे म्हणून धडपडताहेत, परंतु आजूबाजूचे वातावरण त्याला साथ देत नाहीये, अशा परिस्थितीत येथील वातावरण मनाला सुखावून गेले.


जेवण झाल्यावर रात्री सगळे मिळून "रामरक्षा", "गणपती अथर्वशीर्ष" "भीमरूपी" यांचे खड्या आवाजात पठण झाले. मुलांचे संस्कृत उच्चार अतिशय शुद्ध होते. ते ऐकून आश्चर्य वाटले आणि आनंदही झाला. त्यानंतर मुले थोडा वेळ अभ्यास करून झोपी गेली आणि थोडावेळ गप्पा करून आम्ही ही झोपलो. अतिशय शांत झोप लागली. सकाळी पाच वाजताच जाग आली, ती दूरवर होणाऱ्या मंजुळ आवाजातील प्रार्थनेने. येथे दिवसाची सुरुवात देखील प्रार्थनेनेच होते आणि शेवटदेखील. सगळी मुलेदेखील लगबगीने शाळेसाठी तयार होताना दिसली.


सकाळचा चहा घेऊन आम्ही परत निघालो. पण मन मात्र भरले नाही. परत येताना आम्ही तेथील आयुष्याचा विचार करीतच आलो. अतिशय दुर्गम जागा, रस्त्यांवर विजेचे दिवे नाहीत, आजूबाजूला दुकाने नाहीत, अशा जागेत किती आनंदाने आणि समाधानाने ही मंडळी राहतआहेत. ना कशाची कुरबुर ना कशासाठी कुरकुर. काका आणि आत्या अतिशय व्रतस्थपणे, निःस्वार्थीपणे तेथे मुलांवर संस्कार घडवण्याचे अनमोल कार्यकरीत होते. मुलांवर मात्यापित्याप्रमाणे मायाकरीत , त्यांचे दुखलेखुपले बघत होते. मुलेदेखील त्यांना तेवढेच मानत होती. त्यांनी सांगितलेली सगळे मन लावून करीत होती. चांगला अभ्यास करत होती. काका त्यांना सगळ्या महत्वाच्या बातम्या सांगून, जगाचे ज्ञानकरून देत होते. हे सगळे बघून, कुठेतरी वाचलेले आठवले, "People may forget what you've done for them, but they will never forget how you made them feel". खरंच असा आपलेपणा कुणाला कसा विसरता येईल?


"तिथे ना दुरावा दिसे औषधाला, न हेवा नि दावा स्पर्शी मनाला माणूसकीचा झरा वाहताना, सिंचित जातो भवितव्याला " या निःस्वार्थ कार्याला शतशः प्रणाम. आम्ही मुलांना काहीतरी द्यावे, त्यांच्यासाठी काहीतरी करावे या इच्छेने गेलो होतो, पण त्यांच्याकडूनच आम्हाला खूप काही मिळाले. येताना आमची झोळी समाधानाने भरलेली होती. नवीन वर्षाची एक आगळीवेगळी सुरुवात झाली होती. खूप छोट्या छोट्या गोष्टी काहीही पैसा खर्च न करता जीवनात आनंद देऊन जातात. याचा पुनःप्रत्यय आला होता. तसेच तुम्ही कुणासाठी काय करता यापेक्षा त्यांना वागणूक कशी देता, हेच अखेरीस जास्त महत्वाचे असते, याचादेखील अनुभव आला.

- डॉ. अंजली देशपांडे

bottom of page