वसुधैव कुटुंबकम्- सामाजिक आरोग्याची गुरुकिल्ली
"वसुधैव कुटुंबकम्"

संपूर्ण श्लोक -
"अयं निज: परो वेति, गणना लघु चेतसां, उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्"।।
हे माझे, हे तुझे अशी भावना माणसाची संकुचित वृत्ती दाखवते, याउलट उदार प्रवृत्तीचे लोक सर्व जग म्हणजेच ही वसुधा हे एक छोटेसे कुटुंब आहे, अशी भावना ठेऊन सर्व लोकांशी आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणे वागतात असा याचा अर्थ आहे. मनात आपपरभाव न ठेवता सर्वांशी प्रेमाने वागण्याची वृत्ती हा श्लोक दर्शवितो.
आता या कोरोना मुळे ओढविलेल्या संकटकाळात, आपण नरेंद्रजी मोदींना बरेचदा भाषणातून सांगताना ऐकले कि "वसुधैव कुटुंबकम्" हीच आमच्या देशाची रीत आहे. संपूर्ण जगावर संकट ओढवलेले असताना, भारत देश सगळ्यांना मदत करण्यात अग्रेसर राहील हेच त्यांनी सांगितले आणि त्याप्रमाणे वागूनही दाखवले. २६ जानेवारीला भारताचे संयुक्त राष्ट्राचे (युनायटेड नेशन) कायम उपप्रतिनिधी (डेप्युटी पर्मनंट रिप्रेझेंटीटीव्ह) के. नागराज नायडू यांनी जाहीर केले की आम्ही आमचे व्हॅक्सिन (प्रतिबंधक लस) बनवण्याचे आणि सर्व मानवजातीसाठी त्याचा पुरवठा करण्याचे काम पूर्ण करीत आहोत. ठरल्याप्रमाणे किंवा आश्वासन दिल्याप्रमाणे भारताने, शेजारी देशांना कुठलीही अपेक्षा न ठेवता, स्वत:ची गरज पूर्ण झालेली नसूनही सढळ हाताने व्हॅक्सिनचा पुरवठा सुरु केला. त्यासाठी भूतान, म्यानमार, बांगलादेश इत्यादी देशांनी मोदीजींचे मन:पूर्वक आभार मानले. या सगळ्या परिस्थितीत भारत हा एक जगाला संरक्षक कवच देणारा अग्रणी देश म्हणून पुढे आला आहे, हे अमेरिका, युनायटेड किंग्डम यासारख्या पुढारलेल्या देशांनी देखील मान्य केले आहे. हीच ती भारताची "वसुधैव कुटुंबकम्" वृत्ती.
जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी या सगळ्यांनीच भारताचा जागतिक दृष्टीकोन उद्धृत करण्यासाठी "वसुधैव कुटुंबकम्" या उपनिषदातील उक्तीचा उद्घोष केला. याचा कोणी काहीही अर्थ घेवोत, पण आपल्या नेत्यांना ठळकपणे हेच दाखवून द्यायचे होते, कि भारत देशाचा जागतिक नियम, जागतिकीकरणाच्या वेगवेगळ्या योजना, जागतिक संकटाना तोंड देण्यात भारताचा सहभाग, याबाबत अतिशय विशाल दृष्टीकोन आहे. काही तत्त्ववेत्त्यांनी हि संकल्पना फोल ठरवली. त्यांनी अशीही शंका व्यक्त केली कि,"अशा एका कुटुंबाचा कुटुंबप्रमुख कोण असेल?" परंतु आपण असले विचार करत बसण्यापेक्षा आत्ताच्या काळात या वाक्प्रचाराचा शब्दश: अर्थ ना घेता मतितार्थ लक्षात घ्यावा. हेच सगळ्यांच्या कल्याणाच्या दृष्टीने जास्त योग्य, जास्त समर्पक ठरते. वीर सावरकर, लोकमान्य टिळक, भगतसिंग आदि अनेक देशभक्तांनी अवघ्या भारत देशालाच आपले सर्वस्व मानले होते, आपले कुटुंब मानले होते. सावरकर टिळकांसारखे जाऊ द्या पण, आपल्या सभोवतालच्या लोकांच्या गरज जाणून, आपल्याला जमेल तेवढे तर आपण करू शकतोच ना? शेवटी व्यक्तीगत पातळीवर केलेले प्रयत्न जगाच्या कल्याणाच्या कार्यात हातभार लावतीलाच ना? स्वामी चिन्मयानंदांनी म्हटल्याप्रमाणे, "Be Universal in your Love. You will see the Universe as a picture of your own Being ."
जीवनाची वाट चालत असताना कधी कधी माणसाला पैशांची गरज पडते तर कधी सोबतीची. कधी कधी तर नुसते बोलून, आपल्या बोलण्यातून इतरांना धीर देऊन, सुद्धा आपण खूप काही साध्य करू शकतो. खालील काही प्रसंगांतून, उदाहरणांतून आपण जरा बघूयात कि, आपल्या सभोवताली असे "वसुधैव कुटुंबकम्" वृत्तीचे लोक असतील तर आपल्या आयुष्यात कसा फरक पडतो.
काळाप्रमाणे कुटुंबे छोटी झाली, घराघरात मोजकी माणसे राहू लागली. अर्थात तडजोड करण्याची आपली सवय हळूहळू लोप पावत चालली आहे. छोट्या कुटुंबांचा सर्वात जास्त परिणाम आमच्या ज्येष्ठ नागरिकांवर होताना दिसून येतो. एखादी अडचण अचानक उद्भवली तर मदतीला हाताशी घरात कुणी सापडत नाही. परवाचे एक उदाहरण अतिशय बोलके आहे. मुंबईतील एका गृहसंकुलात एका घरात एका वयोवृद्ध गृहस्थांचा देहांत झाला. घरात त्यांचा मुलगा आणि सून, श्री. व सौ. भिडे असे दोघेच. तेही वडिलांसोबत रुग्णालयात. मदतीला कोणी नाही. कोरोनामुळे आता लोक एकमेकांच्या घरीं जाणे टाळीत आहेत. अशात हि घटना. काय करावे दोघानांही सुचेना. त्यामुळे त्यांनी श्रीयुत भटांना फोन केला. क्षणाचाही विलंब ना लावता भट देखील मदतीला निघाले. गुरुजी, दहनविधीची तयारी हे सगळे बघायलाच हवे ना? या सगळयात भटांची एवढी मदत झाली कि भिडे दाम्पत्याला अगदी भरून आले. त्यांचा रुद्ध स्वर आणि डोळ्यात तरळलेले पाणी हीच भटांच्या मदतीची पोचपावती होती. खऱ्या हितचिंतकांची ओळख अशाच क्षणी पटते. तर तात्पर्य काय कि आपले कुटुंब मानून दुसऱ्याला योग्यवेळी मदतीला धावून जाणे हीच ती "वसुधैव कुटुंबकम्" वृत्ती.
अशी खूप उदाहरणे देता येतील, कोरोनामुळे बऱ्याच लोकांची कामे बंद झाली, तेव्हा त्यांना चांगल्या कामात गुंतवून ठेवणे गरजेचे होते. असेच बोलता बोलता एका मैत्रिणीने सांगितले, कि या संकटकाळात त्यांच्या शेतावरची फळे काढून त्यांनी शहरातील सकाळी वृत्तपत्र टाकणाऱ्या मुलांना काम दिले. अमाप झालेल्या फळांची नासाडी झाली नाही आणि मुलांना रोजगार देखील उपलब्ध झाला. आज कितीतरी लोकांच्या नोकरी किंवा व्यवसायावर गदा आली, पण बरेचदा संकोचापोटी आपली परिस्थिती दुसऱ्यासमोर सांगता येत नाही. कुणापुढे हात कसा पसरावा याची लाज वाटत असते, त्यामुळे बरेच जण आतल्या आत कुढत राहतात. अशावेळी कुणीतरी पुढाकार घ्यावा लागतो. आमचे गोविंद काका आजन्म अविवाहित राहिले, पण त्यांनी त्यांच्या भाचे-मंडळीच नव्हे तर संपर्कात येणाऱ्या सर्वाना एवढे आपलेसे केले होते कि, कुणाचीही कुठलीही अडचण असो, आम्ही सगळे त्यांना नि:संकोच सांगत असू. तेही नेहमीच सढळ हाताने सर्वाना, प्रत्येकाची नड स्वत: ओळखून मदत करीत राहिले. मला आठवतंय, आमचे मुंबईतले पहिले घर घेताना आमच्याकडे रक्कम थोडी कमी होती, पण त्यांनी वेळेवर मदत केल्यामुळे आमचे स्वत:चे घर वेळेत झाले. त्यामुळे भाड्याचे पैसे तर वाचलेच, शिवाय स्वत:चे घर झाल्याचे समाधान मिळाले ते वेगळेच. कालान्तराने आम्ही त्यांचे पैसे साभार परत केले, हे सांगायला नको. काका या जगात आता नाहीत, पण सर्वांच्या मनात कायम वास्तव्य करून आहेत. त्यांच्यासारखे एक टक्का जरी होता आले तरी खूप.
आपण आजूबाजूला डोळे उघडे ठेवून बघितले, तर असे अनेक प्रसंग घडताना दिसतात कि कुणीतरी देवासारखे येतात, आणि छोटीशी वेळेवर मिळालेली मदत कितीतरी मोठे काम करून जाते. मी जेव्हा माझ्या विद्यार्थ्यांशी बोलते, तेव्हा असे लक्षात येते की बरेचदा परिस्थितीमुळे मुलांवर शिक्षण करता करता नोकरी करण्याची वेळ येते. मदतीला मोठे कुणीच नसते. मुले शिकायला बाहेर पडतात, कधी कधी ध्येयाने झपाटलेली, तर कधी कधी दिशा हरवलेली देखील असतात. आईवडील गावी असतात. घरात अठराविश्वे दारिद्र्य असते. तरीही कशीबशी सोय करून ते "पेइंग गेस्ट" म्हणून राहतात. पूर्वी शिक्षणाच्या निमित्ताने मुले नातेवाइकांकडे जाऊन राहत. आते मामे भावंडांबरोबर हसत खेळत शिक्षण घेत. तेव्हा नात्यांमध्ये कृत्रिमता नव्हती. हा सख्खा, तो चुलत असा भेदभाव नव्हता. इतरांसाठी काहीतरी करण्याची वृत्ती देखील होती. किंबहुना त्यात आपण काही वेगळे करतोय असे कुणालाही वाटत नसे. आज घरात आई किंवा वडील आजारी झाले, तर सगळा ताण मुलांच्या मनावर येतो. एकटेपणाची भावना मनात येते. अशावेळी मला गरज पडेल, तेव्हा कुणीतरी सोबत असेल, ही भावनाच केवढा आधार देऊन जाते. एकटेपणाचा ताण खूप प्रमाणात कमी होऊ शकतो. पक्षीदेखील थव्याने उडताना एखादा पक्षी जखमी असेल, तर त्याच्या सभोवती कोंडाळे करून त्याला सुरक्षित जागी नेऊन पोहोचवतात. मग मानवाने तर ही वृत्ती अंगी बाणवायलाच हवी.
मला आठवतंय, तो शनिवारचा दिवस होता. मी त्यावेळेस इंजिनियरिंगच्या दुसऱ्या वर्षाला होते. आमचे कॉलेज शनिवारी सकाळी ८ ते ११ असायचे. त्यादिवशी कॉलेज संपताच मी माझ्या लुनावरून घराकडे निघाले होते. रस्ता माझा नेहमीचाच होता. मी नागपुरातील शेतकी महाविद्यालयाजवळ पोचली असेन. एवढेच मला आठवते. त्यानंतर जी जाग आली ती थेट वैद्यकीय महाविद्यालयात. आजूबाजूला सगळ्या डॉक्टर्सचे कोंडाळे आणि मधोमध मी. एखाद्या हिंदी सिनेमातला प्रसंग वाटत होता. त्यातले कुणीतरी "अरे होश आया हैं " असे म्हणाले आणि काय झाले असावे ते मला कळले. मी त्यांना विचारले,"मैं कहाँ हूँ?", त्यावर त्यांनी काय घडले ते मला थोडक्यात सांगितले. मला लुनावरून जात असताना एका ऑटोरिक्षाने धडक दिली आणि मी पडले व माझी शुद्धच हरपली. तो रिक्षेवाला तर पळून गेला पण दुसऱ्या एका रिक्षेवाल्याने मला उचलून त्याच्या रिक्षात घातले, त्याच्या मित्राने माझी लुना घेतली आणि मला मेडिकल कॉलेजला पोहोचवले. मला तर हे सारे काहीही आठवत नव्हते. मी माझ्या मावशीचा नुंबर देऊन घरच्यांना कळवायला सांगितले. मला जखमा फार नव्हत्या झाल्या, आणि फ्रॅक्चर सुद्धा नव्हते. थोड्याच वेळात आई आणि काकू मला घ्यायला आल्या आणि मी रडू लागले. आम्ही त्या सहृदय रिक्षा चालकाला घेऊनच घरी गेलो. त्यांचा योग्य सन्मान केला. त्यांचे आमच्यावर डोंगराएवढे उपकार होते. नंतर ८-१० दिवसातच मी बरी झाले आणि पुन्हा कॉलेजला जाऊ लागले. त्या काकांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे, त्यांच्या अंगी असलेल्या "वसुधैव कुटुंबकम्" वृत्तीमुळे मी आलेल्या कठीण प्रसंगातून सुखरूप बाहेर पडले होते.
बरीच वर्षे होऊन गेलीत पण, एक प्रसंग अजूनही मला आठवतोय, आमचा एक अतिशय हुशार विद्यार्थी सुबोध,अचानक कॉलेजला येईनासा झाला. त्याचे इंजिनियरिंगचे शेवटचे वर्ष होते. आम्ही ऑफिसमधून कितीतरी वेळेला त्याला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो आमचा कुणाचाही फोन उचलत नव्हता. नेहमी काहीतरी शंका विचारणारा, सदैव वर्गात उपस्थित असणारा, माझ्याबरोबर संशोधनात्मक काम करून कॉन्फरन्स मध्ये पेपर पब्लिश केलेला, आणि अतिशय मेहेनती असा हा विद्यार्थी होता. काय करावे काहीच कळत नव्हते. त्याने त्याच्या सर्व मित्रांशी देखील संपर्क तोडला होता. मी त्याला बऱ्याच इमेल्स देखील पाठवल्या. पण त्याचे काही उत्तर येईना. अचानक एका ई-मेलला त्याचा रिप्लाय आला कि मी भेटायला येतो. ठरल्याप्रमाणे तो भेटायला आला, पण २-३ महिन्यात त्याचा चेहरा खूप बदलला होता. तो प्रचंड दडपणाखाली असावा असे वाटत होते. त्याला बोलते करण्याचा खूप प्रयत्न केल्यानंतर कळले की त्याच्या वडिलांना कँसर झालेला होता, व आता अगदी थोडे दिवसच ते जगणार असे डॉक्टरांनी सांगितले होते. त्यामुळे तो अतिशय अस्वस्थ झाला होता. पण तो माझ्यासमोर अगदी शांतपणे बसून होता. वडीलांच्या आजारपणाच्या गडबडीत त्याचा परीक्षेचा फॉर्म भरण्याचे राहून गेले होते. अर्थात परीक्षा देऊ शकेल अशी त्याची मनःस्थितीही नव्हती. त्याला आधाराची गरज होती. कुणी नातेवाईक आहेत का म्हणून विचारले , त्यावर त्याने सांगितले कि, माझी फक्त एक मोठी मानलेली बहीण आहे आणि तिचे लग्न झालेले आहे. पण दुसरे कुणीच मदत करण्यासारखे नाही. मी माझ्या परीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परीक्षा काय नंतर पण देता येईल. पण यावेळी तुझ्या आईला तुझी जास्त गरज आहे. तेव्हा तू असा दुःखी राहू नकोस, तू आता तिला धीर दे असे समजावले. त्याने माझे बोलणे किती ऐकले कुणास ठाऊक? कारण त्याची नजर शून्यातच होती. तो निघून गेला पण मला काही चैन पडेना. झाडावर नुकतेच उमललेले फूल, अचानक कोमेजावे असे काहीसे वाटून गेले. आणि मी माझ्या एका शिक्षक सहकाऱ्याच्या मदतीने त्याच्या बहिणीचा पत्ता काढला. ती देखील जेमतेम पंचविशीतील नुकतीच लग्न झालेली युवती होती. त्यात तिला सातवा महिना लागलेला होता. तिला वडिलांच्या आजाराची कल्पना होती, पण भावाच्या मनावर त्याचा एवढा परिणाम झालाय हे लक्षात आले नव्हते. तिने आणि तिच्या नवऱ्याने मात्र आम्हाला दिलासा दिला कि ते दोघेही सुबोधला बोलते करण्याचा प्रयत्न करतील.
त्यानंतर महिन्याभरातच सुबोधचा मेसेज आला कि त्याचे वडील गेले. आम्ही लगेच त्याला भेटायला गेलो. विशेष काही बोलणे झाले नाही, पण आम्ही भेटायला आलोय हे बघून कुठेतरी मनात दिलासा वाटला असावा असे वाटले. त्यानंतर काही दिवसांनी आम्ही त्याला फोन करून बोलावले, व तुझे राहिलेले सेमिस्टर आणि प्रोजेक्ट पूर्ण कर म्हणून सांगितले. पण आता त्याची शिकण्याची इच्छाच राहिली नाही. वडिलांच्या जागेवर त्याला नोकरी मिळणार होती. त्याचे इंजिनियरिंग चे शिक्षण व्यर्थ जाऊ नये असेच मनापासून वाटत होते. पण त्याच्या घरची परिस्थिती बघता नोकरीची त्याला जास्त गरज होती. यावेळी त्याच्या बहिणीच्या नवर्याने खंबीरपणे सुबोधची जबाबदारी घेतली. मी त्याचे प्रोजेक्ट लवकरात लवकर पूर्ण कसे होईल याची जबाबदारी घेतली. आम्ही त्याला समजावले की, तू फक्त ही शेवटची परीक्षा दे. नंतर काय करायचे ते ठरव. तो तयार झाला. त्याने त्याचे राहिलेले काम पूर्ण केले. मी स्वतः काॅन्फरंस ची नोंदणी फी भरून त्याला त्याचा पेपर सादर करण्यास पाठवले. तो परीक्षा उत्तम रीतीने उत्तीर्ण झाला. आणि अतिशय आनंदाची गोष्ट म्हणजे त्याला खूप चांगली नोकरी देखील मिळाली. या काळात रक्ताचे काहीही नाते नसूनही, स्वत:ची परिस्थिती खूप चांगली नसतानाही त्याच्या बहिणीच्या सासरच्या मंडळींनी त्याची व त्याच्या आईची काळजी घेतली आणि सुबोधला त्याचा आत्मविश्वास परत मिळाला.
आणखी एक प्रसंग आठवतो, मी त्यावेळेस माझ्या मुलाकडे कॅलिफोर्निया ला गेले होते. तिथे आमचा सगळ्या आयांचा एक छान मैत्रिणींचा परिवार जमला होता. आम्ही रोज सकाळी फिरायला जाणे, योगसाधना, एकत्र व्यायाम, खरेदी, एकत्र जेवण, एकमेकींना पदार्थ बनवायला शिकवणे अशा बऱ्याच गोष्टी एकत्र करीत असू. आमच्या गटात एक मैत्रीण होती संध्या. संध्याची सून प्रिया त्यावेळेस गरोदर होती. मला आठवतंय कि, स्मिता, राधा, राजू अशा काही मैत्रिणी सुगरणी होत्या, त्या आवर्जून काही नवीन पदार्थ केले कि, प्रिया साठी पण आणून देत. सगळे काही सुरळीत सुरु होते. प्रियाचे बाळंतपण झाले आणि तिला मुलगा झाला. बाळ येऊन जेमतेम एकाच आठवडा झाला होता, की अचानक संध्याच्या वडिलांची तब्येत, इकडे भारतात बिघडली, आणि काहीही अवधी न देता त्यांचा देहांत झाला. आता संध्याला भारतात तातडीने येणे गरजेचे होते. तेव्हा आमच्यातल्या दोघी सुधा आणि शीला यांनी अगदी स्वत:च्या मुलीची आणि नातवाची काळजी घ्यावी अशाप्रकारे बाळाचे मालीश, घरचा स्वयंपाक सांभाळले. पंधरा दिवसांनी संध्या परत आली, तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर मैत्रीचे समाधान विलसत होते. संध्या किती निर्धास्तपणे वडिलांच्या अंत्यदर्शनासाठी जाऊ शकली, आणि मैत्रिणींनी तिचा विश्वास सार्थ करून दाखविला.
आयुष्यात आपल्याला अशा अनेक व्यक्ती वेळोवेळी मदत करीत असतात. त्या सगळ्यांच्याच कृतज्ञ स्मृती मनात जपून ठेवल्या पाहिजेत. एक प्रसंग मात्र आजही आठवला तरी डोळे पाणावतात. माझा मुलगा त्यावेळेस ५ ते ६ वर्षांचा होता. आम्ही दोघे नागपूरहून रात्रीच्या सेवाग्राम एक्सप्रेसने मुंबईला यायला निघालो. आम्हाला मधला आणि वरचा असे दोन बर्थ मिळाले होते. साधारणतः सोबत कुणी लहान किंवा वृद्ध असतील तर आपण एकमेकांसाठी थोडी तडजोड करतो, पण यावेळेस कुणी आम्हाला बर्थ बदलून देईल ही शक्यताच नव्हती. त्यामुळे मी सगळ्यात वर झोपायला गेले. रात्री साधारण १२ ते १२.३० च्या दरम्यान गाडी बडनेरा स्टेशन सोडून पुढे आली होती. अचानक माझा मुलगा झोपेतून मधल्या बर्थ वरून पडला आणि त्याला उलट्या होऊ लागल्या. त्याचे डोके देखील दुखत होते. मी घाबरले. आता कुठे मध्ये उतरताही येणार नव्हते. गाडीत कुणी डॉक्टर आहे का हे बघण्यासाठी माझ्या बाजूच्या प्रवाश्याने तिकिट कलेक्टरला गाठले. त्याने लगेच धडपड करून, डॉक्टरचा शोध घेतला. पण त्यावेळेस कुणी डॉक्टरही सापडला नाही. हा तिकीट कलेक्टर मात्र आमच्या बरोबर रात्रभर थांबला आणि काळजी करू नका, गरज पडल्यास आपण शेगावला उतरू असा त्याने दिलासा दिला, तशी गरज सुदैवाने पडली नाही, कारण माझ्या मुलाला मधून मधून झोप येत होती. पण उठला की डोकं दुखतंय असाच तो सांगत होता. शिवाय उलट्याही पूर्ण थांबल्या नव्हत्या. मला तर झोप येणे शक्यच नव्हते, पण तो तिकीट कलेक्टर मात्र अगदी धाकट्या भावासारखा आमच्याबरोबर बसून होता. सकाळी सकाळी माझ्या मुलाला जरा शांत झोप लागली. तेव्हा कुठे तो उठून निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी ११.३० ला मुंबईला पोचल्यावर मी तडक घराजवळचे हॉस्पिटल गाठले. डॉक्टर नेमके ऑपरेशन थियेटर मध्ये होते, पण मला धीर नव्हता. मी त्यांना जरा अर्जंट आहे असा निरोप पाठवला. तेव्हा तेही बाहेर आले. योग्य ती तपासणी करून त्यांनी काळजीचे काहीही कारण नाही असे सांगितले, तेव्हा जीव भांड्यात पडला. तो तिकीट कलेक्टर मात्र मला जणू देवदूतासारखा भासला. त्या प्रवासात माझ्या सोबत तो आहे या विचारानेच मला केवढा आधार वाटला होता.
असेच एकदा आम्ही लोणावळ्याला फिरायला गेलो, आणि तेथून पुण्याला माझ्या मैत्रिणीकडे गेलो. पुण्यात पोचता पोचताच माझ्या नवऱ्याला उलट्या सुरु झाल्या, त्या काही केल्या थांबेनात. जवळच्या डॉक्टरला दाखवले, तर त्याने मला सांगितले कि तुम्ही माझ्या बहिणीसारख्या आहात, तुमच्या यजमानांचा ECG "ईसिगी" काही बरोबर दिसत नाहिये. उद्याची सकाळ त्यांना बघायची असेल तर ताबडतोब इस्पितळात भरती करावे लागेल. माझ्या पायाखालची जमीन सरकली कि काय असे वाटून गेले. रात्री रिक्षा मिळायला देखील वेळ लागत होता. घड्याळाचा काटा पुढे जलदगतीने सरकत होता. पण सुदैवाने रिक्षा मिळाली आणि आम्ही तडक निघालो. "रूबी हाॅल" नावाच्या मोठ्या इस्पितळात पोचलो. तेथे त्यांनी रुग्णाला भरती करण्यासाठी आधी ठेव रक्कम जमा करावी लागेल असे सांगितले. तिथे आधी डिपाॅझिट रक्कम जमा करायला लागते, हे देखील तेव्हा मला माहीत नव्हते. आणि रक्कमही थोडीथोडकी नाही तर, २५००० रुपये. माझ्याकडे तर फारच थोडे पैसे होते, कारण असा काही प्रसंग येईल असे स्वप्नात देखील आले नसते. रात्री ११ चा सुमार होता. पैसे कुठूनही मिळण्याची सोय नव्हती. अर्थात आमच्याकडे होते तेवढे पैसे जमा केले आणि सकाळी बँक उघडल्या बरोबर आम्ही पैसे जमा करू अशी हमी दिली. माझ्या मैत्रिणीकडे देखील एवढी रक्कम नव्हती. पण यावेळी माझ्या एका मैत्रिणीच्या आते बहिणीने दुसऱ्या दिवशी सकाळी कसेतरी जमवून पैसे आणून दिले, आणि आमची गरज भागवली. माझ्या नवऱ्याला अतिदक्षता विभागात ठेवल्यामुळे, आम्हाला भेटायला जाण्याची अनुमती नव्हती. पण शेवटी तिसऱ्या दिवशी त्याला तेथून सुट्टी मिळाली. दोन दिवस आम्ही, म्हणजे माझ्या मैत्रिणीचे यजमान आणि मी नुसते बाहेर बसून त्याच्याकडे बघत होतो. दुसरे काहीच हाती नव्हते. इकडे मैत्रीण माझ्या ३ वर्षाच्या मुलाला तिच्या २ वर्षांच्या मुलीबरोबर सांभाळत होती. सुदैवाने, माझ्या नवऱ्याला फक्त त्याने खाल्लेल्या जिलबीतून विषबाधा झालेली होती, आणि फारसे काही घाबरण्याचे कारण नव्हते. पण तिथून डिस्चार्ज होईपर्यंत माझा जीव थाऱ्यावर नव्हता. या प्रसंगी मैत्रिणीच्या आते बहिणीने "वसुधैव कुटुंबकम्" वृत्ती दाखवली, तिचे ऋण कधीच फिटणार नाही.
असे अनेक प्रसंग जगात नेहेमीच घडत असतात, आणि "माणुसकीचे नाते" माणसाला माणसाशी जोडून ठेवते. त्यामुळेच "वसुधैव कुटुंबकम्" वृत्ती टिकून राहते. तर थोडक्यात काय, अंशत: का होईना मला कुणासाठी तरी काहीतरी करता आले, किंवा "मी आहे" हा विश्वास जर मी कुणाच्या मनात निर्माण करू शकले तर यापरते दुसरे ते काय समाधान? अगदी साधे, मी बाजारात जातेय, तुमच्यासाठी काही आणून देऊ का? असे सुद्धा आपल्या वयोवृद्ध शेजाऱ्यांना विचारा, त्यांना केवढा आधार वाटतो. हेच नाही का एखाद्या कुटुंबातील माणसे एक दुसऱ्यासाठी करीत? आणि अशी "वसुधैव कुटुंबकम्" वृत्तीची माणसे समाजात निर्माण झाली, किंवा त्यांची संख्या वाढली तर आपोआप समाजाचे मानसिक आरोग्य सुधारेल आणि सर्व मानवजात प्रगतीपथाला लागेल, यात काही शंकाच नाही. हे गाणे बघा किती यथार्थ आहे..
"मधुबन खुशबू देता है, सागर सावन देता है, जीना उसका जीना है, जो औरों को जीवन देता है" ...
मला सुचलेल्या काही ओळी....
वेगवेगळे मार्ग जरीही, दिशा वेगळ्या आयुष्याच्या
वाटेवरती अशा भेटती मूर्ती अवचित चैतन्याच्या
कुणी कुणाचा कल्पतरू, तर कुणी होतसे वृक्ष वटाचा
कुणी मनाला देत उभारी, घेउनी दरवळ बकुळफुलांचा
असे भेटता कुणी, लाभतो अर्थ वेगळा जगण्याला अन
नकळत होते जगणे आपुले, जसा गारवा हो कौमुदीचा
वाळवंटही न्हाऊन निघते चांदण्यात त्या पुनवेच्या अन
निवडुंगही मग उमलून येतो, उत्सव होतो रंगफुलांचा