top of page
Search

हो! मला LSD आवडते


हो मला LSD आवडते. परंतु.थांबा नक्कीच तुम्हाला काही तरी गैरसमज होतो आहे. तुम्ही विचार करत आहात ते हे LSD नव्हे. तर, जेष्ठ लेखक देवदत्त पटनायक यांच्या दुर्ष्टीने LSD म्हणजे ‘लक्ष्मी (Laxmi), सरस्वती (Saraswati) आणि दुर्गा (Durga)’ असा अर्थ आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये LSD चा हा असा अर्थ आपल्या पैकी बहुतेक जणांना जरा विचित्रच वाटला असेल. परंतु देवदत्त पटनायक यांसारख्या असामान्य लेखकाला या शब्दामध्ये हा दडलेला अर्थ देखील दिसू शकतो.

अर्थात भारतीय संस्कृतीमध्ये या तिन्ही देवींना/शक्तींना एक आदराचे स्थान आहे. आपण कायमच विविध सणांना यांच्या पूजा-अर्चा देखील करत असतो. परंतु लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा म्हणजे काय? ही काही फक्त पुराणातील पात्रे व त्यांच्या गोष्टी आहेत की, त्यामागे काही कारण, एक तत्वज्ञान आहे? पण आज ह्या अर्थाचा LSD कोणालाच नको असतो. कारण, काही लोकांसाठी पुराण किंवा त्यातील गोष्टी म्हणजे जुनाट विचार, तर काहींसाठी तुम्ही अगदी धर्मांध देखील होता. किंबहुना त्तुमचा हा विचार कसा जुनाट आणि बुरसटलेला आहे हेच दाखवून देणे हीच आजकालची फॅशन आणि स्टेटस आहे.

पण आपण काही काळ यामधील पुरणाचा धार्मिक भाग बाजूला ठेवू व याकडे फक्त एक विचार म्हणून पाहू. कारण, या LSD मध्ये वाटतो त्यापेक्षा खूप जास्त गूढ अर्थ लपलेला आहे. आपल्या संस्कृतीमध्ये लक्ष्मी ही अर्थाचे म्हणजेच धनाचे प्रतीक आहे. सरस्वती ही विद्येचे प्रतीक आहे, तर दुर्गा ही शक्तीचे प्रतीक आहे. या तिन्ही शक्ती या परस्पर संबंधित (Inter-Correlated) आहेत. यामधील प्रत्येक शक्ती ही एकमेकाला पूरक आहे आणि कायमच त्यांचा समतोल साधने हे गरजेचे असते.

खूप धन-संपदा (लक्ष्मी) मिळवण्यासाठी माणसाला ज्ञान व बुद्धी लागते (सरस्वती), त्याच बरोबरीने असलेली धन-संपदा योग्य रीतीने, चांगल्या कार्यासाठी वापरण्यासाठी नेहेमीच आपल्याला ज्ञानाची आवश्यकता पडते आणि अर्थात असलेल्या ज्ञानाचा व संपत्तीचा वाईट प्रवृत्तींनपासून स्व:रक्षण करण्यासाठी आपल्याला शक्ती (दुर्गा) लागते. यामधील एका शक्तीचा देखील अभाव हा माणसाच्या संपूर्ण विकासासाठी घातक ठरू शकतो. परंतु, याच तिन्ही शक्तींचा सुरेख संगम आणि योग्य वापर माणसाला प्रगतीच्या उच्च शिखरावर नेऊन बसवू शकतो. जसे आपण समाजात पाहतो की, अनेक गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडे धन-संपत्ती आणि ताकद या दोन्ही गोष्टी असतात. परंतु, सरस्वती म्हणजेच ज्ञानाच्या अभावाने ते समाजात प्रतिष्ठा मिळवू शकत नाहीत. कित्येक जणांकडे संपत्ती आणि ज्ञान असते परंतु त्याला जोपासण्याची किंवा त्याचे संरक्षण करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नसते आणि लक्ष्मी सरस्वती आणि दुर्गा यांच्या त्रिवेणी संगमाचे आपल्याला एक उत्तम उदाहरण पाहायचे असेल तर ते म्हणजे भारतीय उद्योजक क्षेत्रातील एक असामान्य तारा म्हणजे ‘टाटा’ मग ते अगदी जमशेटजी टाटांपासून ते जे.आर.डी. टाटा आणि रतन टाटांपर्यंत सर्वांकडे धनसंपत्ती ही भरपूर आहे. परंतु, तितक्याच प्रमाणात ज्ञान देखील आहे आणि स्व:रक्षण करण्यासाठीची एक शक्ती देखील आहे. ‘टाटा’ हे या त्रिवेणी संगमाचे उत्तम आणि मूर्तिमंत उदाहरण आहेत आणि म्हणूनच आज इतके वर्ष ‘टाटा’ हा भारतातच नाही तर अगदी जागतिक स्तरावरील एक विश्वसनीय brand आहे.

परंतु जी तरुणाई ही या भारत देशाची शक्ती आहे.ज्या तरुणाईच्या भरवशावर डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम यांनी भारत एक जागतिक महासत्ता आणि एक सक्षम देश म्हणून उभा राहण्याचे स्वप्न पाहिले. तिच तरुणाई दुर्दैवाने आज अनेक Clubs मध्ये, सिंहगडाच्या पायथ्याच्या गैरकानूनी पार्ट्यांमध्ये आणि किंबहुना प्रत्येक गावातील एका secret spot वर ४ ते ५ हजार किंमत असलेल्या LSD (Lysergic Acid Diethylamide) ज्याला आजकाल ‘स्वर्गाचे तिकीट’ असे काही फॅन्सी नाव देखील आहे, त्याचे डोस घेताना आणि दुसरे LSD म्हणजे Lxxe Sxx or Dokxx या तथाकथित cool आणि daring बाझ गोष्टी करताना सापडतात अश्या कित्येक बातम्या आपण वाचतो, पाहतो, ऐकतो.

तेव्हा या समाजाला आता LSD चा एक नवीन परंतु आपल्या पुराणांमध्ये असलेले तत्वज्ञान समजून सांगण्याची गरज आहे. कारण, लक्ष्मी, सरस्वती आणि दुर्गा या तिन्ही शक्तींचा त्रिवेणी संगम या समाजामध्ये एक आमूलाग्र बदल घडवून आणू शकतो आणि समाजमध्ये एक equilibrium निर्माण करू शकते. तेव्हा आपण LSD चा नवीन अर्थ व त्याची शक्ती समजून घेऊन त्यासाठी प्रयत्न करूयात.

- अपूर्व कुलकर्णी

 

Listen Our Podcast on Your Favorite Platform:

Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor

Follow Us on Social Media Platforms:

LinkedIn | Instagram | Facebook

bottom of page