संत श्री समर्थ रामदासस्वामी : माधवी मसुरकर

झाले बहु, होतील बहु..परी यासम हा...
यामध्ये "यासम हा " याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा कधी कधी आपला गोंधळ उडून जातो की हे कसं ठरवायचं...मग आपल्या डोळ्यासमोर प्रत्येक क्षेत्र येते..संगीत , साहित्य , क्रिडा, समाजकारण, राजकारण आणि धर्मकारण.
मी इथे धर्मकारण हे क्षेत्र घेते...धर्मकारण म्हटले की अध्यात्म हे आलेच. अध्यात्माचा तेव्हढा माझा अभ्यास नाही.
पण शालेय अभ्यासक्रमात किंवा इतरत्र आलेल्या वाचनातून ज्ञानेश्वर माऊली, नामदेव महाराज,एकनाथ महाराज,तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी हे महाराष्ट्राचे पंचप्राण आहेत आणि या लोकांनी भारतीय संस्कृती धन्य केली एवढे ज्ञान मिळाले. या पांच संताचे कार्य जेव्हा पाहतो तेव्हा समर्थ रामदास स्वामी हे सर्वांपेक्षा खूप वेगळे आहेत हे जाणवते. त्यांचे शिष्य अनेक थोर लोक आहेत..
त्यांनी महंत निर्माण केले ते समाजाचे भले व्हावे यासाठीच.
सदासर्वकाळ समाजाची चिंता वाहणारा महान हिंदू संत.
रामनवमी दिवशीच समर्थांचा जन्म झाला..त्यांचे मूळ नाव नारायण...ते सात वर्षांचे असतानाच त्यांचे वडील स्वर्गवासी झाले..आणि समर्थ अंतर्मुख झाले...स्वतःच्या मनाचा शोध घेऊ लागले..माझ्या जन्माचे नक्की प्रयोजन काय असेल याचेच विचारचक्र सुरू झाले.. खूप हुशार ,बुद्धिमान माणूस..पण त्यांची हुशारी " मी विश्वाची काळजी करतो" असे वयाच्या अवघ्या सातव्या वर्षी म्हणण्यापर्यंत गेली तेव्हा त्यांच्या आईने वयाच्या १२ व्या वर्षीच त्यांच्या लग्नाचा विचार केला....पण "सावधान" या शब्दाचा उच्चार पंडिताने केला आणि ते सावध झाले...आणि पळाले विवाह मंडपातून ..
आणि मग पुढे जे महान कार्य त्यांच्याकडून घडले त्याची अनुभूती आपण सर्वजण घेतच आहोत.
समर्थ रामदास रोज १२०० सूर्यनमस्कार घालत असे म्हणतात. श्रीराम हे त्यांचे दैवत होते...पण व्यायामाचे महत्व लोकांना पटवून देण्यासाठी त्यांनी हनुमानाची मंदिरे बांधली असावी असे वाटते...कारण ते व्यक्तीकारण मानत होते...माणसाचे शरीर सुदृढ तर त्याचे मन सुदृढ आणि सशक्त ..शरीर निरोगी असेल तर माणसाचे आचार विचार पण सशक्त होतात ही त्यांची धारणा होती.
कदाचित व्यायाम करा असे लोकांना सांगितले तर ते व्यायाम करणार नाहीत..त्याचे महत्त्व त्यांना पटणार नाही..पण त्याला धर्माची जोड दिली तर लोक नक्कीच ऐकतील असा विश्वास त्यांना वाटला असावा आणि तो काळ तसा होताही ईश्वरावरील श्रद्धेचा..आणि म्हणूनच त्या काळात त्यांनी हनुमानाची ११ देवळे बांधली असावी.
समर्थ स्वतः लग्न मंडपातून पळाले किंवा ते हनुमान उपासक होते म्हणून ब्रह्मचर्याचा त्यांनी पुरस्कार केला असे मात्र झाले नाही....प्रपंच करावा आणि मग परमार्थ हीच त्यांची शिकवण होती. प्रपंच शिस्तीने करावा...आपले जीवन चांगल्या कामासाठी उपयोगात आणावे म्हणजे त्याची सुंदरता वाढेल हा त्यांचा आग्रह होता.
रामदास स्वामी पांच घरी जाऊन भिक्षा मागायचे..आता ते फक्त पांच घरीच जाऊन भिक्षा का मागत असावे...कारण जेवढे अन्न आपल्याला आवश्यक आहे तेवढेच आपण घेतले पाहिजे हा त्यांचा आग्रह होता...जी काही माधुकरी त्यांना मिळायची त्यातला एक भाग देवाला ते नैवैद्य म्हणून दाखवायचे..एक भाग पशुपक्षी , प्राण्यांना दाखवायचे आणि उरलेले अन्न ते स्वतः ग्रहण करायचे..भिक्षा म्हणजे भीक नाही तर तो धर्म आहे..भिक्षा मागण्यासाठी मनुष्य स्वतःच्या घरातून बाहेर पडतो त्यामुळे आजूबाजूचे लोक कसे आहेत याची जाणीव त्याला होते.. माणसांची पारख त्याला करता येते. ..मी भीक मागितली तर कोण काही म्हणेल याची पर्वा त्याला वाटत नाही..आणि तो निर्भय होतो.. हे त्यांचे विचार आजच्या स्वार्थी, लंपट समाजाला धडा शिकवणारे आहेत..आज माणूस स्वतःला जगण्यासाठी आवश्यक आहे त्यापेक्षाही अधिक कमावण्याच्या शर्यतीत येतो...आणि पात्रतेपेक्षाही अधिक जेव्हा त्याला मिळते तेव्हा तो उर्मट होतो... दुसऱ्यावर अन्याय करू लागतो... समाजाचे आपण काही देणे लागतो हे तो विसरून जातो..आणि म्हणूनच पांच घरीच भिक्षा का , या रामदास स्वामींच्या आग्रहाचा प्रत्यय येऊन जातो.
व्यक्तिकारण, समाजकारण, राजकारण आणि शेवटी धर्मकारण यांचा त्यांनी पुरस्कार केला...प्रथम व्यक्तीचा उद्धार झाला पाहिजे..त्यासाठी त्याचे शरीर आणि मन हे सुदृढ असले पाहिजे..शरीर हे व्यायामाने आणि मन हे सदाचारांच्या अंगीकाराणे सुदृढ बनविता येते..व्यक्तीचा उद्धार झाला की आपोआपच समाजाचा उद्धार होतो..त्यासाठी व्यक्तीने स्वतःला जे मिळाले आहे ते समाजाने दिलेले आहे याची जाणीव ठेवावी..समाज विकसित झाला की देशाचा विकास होतो आणि राजकारण होते..आणि राजकारण यशस्वी झाले की मग शेवटी धर्मकारण करावे आणि जगाचा उद्धार करावा नीती आणि सदाचाराणे, अशी स्वामींची शिकवण आहे.
आज आपल्याला अवतीभवती काय दिसते... "माझे चांगले झाले..मी कशाला दुसऱ्याची चिंता करू?"...मी समाजाचे काही देणं लागतो हे पूर्णपणे विसरलेला समाज..दुर्गुण शिगेलापोचलेले ,व्यसनाधीनतेने कळस गाठलेला अशी सर्व भयानक परिस्थिती.
अशी परिस्थिती रामदास स्वामींच्या काळात पण होती.. परकियांचे आक्रमण होते.. दुराचार वाढलेले होते..आणि ते सर्व विदारक चित्र पाहिल्यानंतर च स्वामी म्हणाले की माणसाचे आत्मभान हे तो स्वतंत्र असला तरच होते..त्याची विचार करण्याची कुवत वाढते..त्याची उन्नती झाली की समाजाची उन्नती होते..मग देशाची उन्नती होते .आणि राजकारण होऊन देश प्रगती पथावर येतो...राजकारण करायचे असेल तर व्यक्तीला जगवले पाहिजे.
एवढे सखोल चिंतन करणारे रामदास स्वामी हे एकमेव संत आहेत.
दुसऱ्याशी मृदू वर्तन हे समर्थांनी सांगितले पण ते दुर्जनांशी नाही तर फक्त सज्जनांशी." जनी जनार्दन वसे, परी तो सज्जनी असे".. दुसरा वाईट वागत असेल तर त्याला शासन हे झालेच पाहिजे..श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी समर्थांच्या याच शिकवणुकीचा अंगीकार करून न्यायी सुराज्य निर्माण तर केले नसेल... पुण्यश्लोक राजा निर्माण झाला आणि सगळ्या देशाचे चित्र पालटले.
समर्थांनी रचलेल्या सुखकर्ता दुःखहर्ता, सत्राने उड्डाणे या आरत्या म्हणताना आजही एक वेगळीच ऊर्जा शरीरात निर्माण होते..खूप स्पूर्ती येऊन या आरत्या आपण म्हणतो..एक वेगळाच तेजोमय माहोल आणि सकाराकत्मता निर्माण होते.
दासबोध आणि मनाचे श्लोक हे त्यांचे अजरामर साहित्य.. माणसाचे जगणे कसे असावे...आदर्श समाज कसा निर्माण होईल..आणि पर्यायाने उत्तम राजकारण कसे करता येईल हे सर्व विषद करणारी सूत्रे म्हणजेच दासबोध.
" लेकुरे उदंड झालीI तो ते लक्ष्मी निघोन गेली l
बापुडी भिकेसी लागली l काही खाया मिळेना ll"
असे समर्थ म्हणत.
म्हणजे बघा , १६ व्या शतकात समर्थांनी केलेलं भाकीत आजही खरं ठरतेय..अजूनही सरकारला कुटुंब नियोजनाचे धडे द्यावेच लागताहेत....त्यांचे विचार आजच्या काळातही खूप मार्गदर्शक ठरतात...माणूस त्याचा अंगीकार करत नाही हे त्याचे दुर्दैव.
अनेक संतमहात्मे महाराष्ट्रात होऊन गेले..पण कोणीही राजकारणात रस घेतला नाही..परमेश्वर भक्ती, परमेश्वर उपासना, नीतिमत्ता याचेच धडे दिले सर्व संतांनी.....पण रामदास स्वामी हे एकमेव संत आहेत की ज्यांनी परमेश्वर भक्ती बरोबरच समाजकारण आणि राजकारणाचे धडे दिले... त्यांनी इतक्या वर्षांपूर्वी मांडलेले विचार आजच्या भरकटलेल्या समाजाला, राजकारण्यांना मार्गदर्शक ठरतील असेच आहेत आणि हेच त्यांचे वेगळेपण आहे..आणि म्हणूनच संत नामावलीमध्ये श्री समर्थ रामदास स्वामी हे "यासम हा" असेच आहेत.
- सौ माधवी यशवंत मसुरकर

Listen Our Podcast on Your Favorite Platform:
Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor
Follow Us on Social Media Platforms: