top of page
Search

मन में है विश्वास-विश्वास नांगरे पाटील

पुस्तकाचे नाव – मन में है विश्वास

लेखक – विश्वास नांगरे पाटील

पृष्ठ -२०४

IPS विश्वास नांगरे पाटील लिखित ‘मन में है विश्वास’ हे एक आत्मचरित्रपर पुस्तक आहे. या पुस्तकात त्यांनी IPS या पदापर्यंत पोहोचण्यासाठी केलेले कष्ट, केलेला संघर्ष या पुस्तकामध्ये मांडलेला आहे. यामध्ये त्यांनी त्यांचे कोकरूड या छोट्याश्या गावातील बालपण, लहानपणी तंबूतून पाहिलेले सिनेमे, शिराळ्यातील आत्याच्या घरची असणारी कडक शिस्त, लहानपणी T.V. बघण्यासाठी केलेली गर्दी, नदीकाठावर केलेली मजा, दहावीच्या बोर्डात चांगले मार्क मिळाल्यावर झालेला आनंद, अकरावी-बारावीत कोल्हापुरात अभ्यासावरून विचलित झालेले लक्ष पण तिथेच गगराणी यांचे भाषण ऐकून मिळालेली स्फूर्ती व त्याचा परिणाम म्हणून बारावी group ला मिळालेले 91%, होस्टेलवरील दादागिरी करणाऱ्या मानकर दादाची मोडलेली खोड, त्यांना अण्णा हजारेंनी केलेले मार्गदर्शन, त्यांनी पुढाकार घेऊन गावात सुरु केलेलं ग्रंथालय, त्यांची वाट चुकत असताना त्यांना विकास सरांनी केलेले मोलाचे मार्गदर्शन, त्यांनी मुलींना pink rose देण्याचा केलेला प्रयत्न, गावात मारामारी करून वाईट मार्गाला लागतानाच पोलीस असणाऱ्या निकम साहेबांनी केलेली कानउघडणी, गावाकडून आल्यामुळे त्यांना मुंबईत येणाऱ्या अडचणी, S.I.A.C. केलेला दिवस-रात्र अभ्यास, पाहिलेले सिनेमे व नाटक यांचा उत्तर लिहताना केलेला सुंदर उपयोग, पाहिल्यावेळेस U.P.S.C. व M.P.S.C. देताना त्यांची असलेली मानसिकता, तसेच पहिल्यांदा U.P.S.C. मध्ये अपयश आल्याने आलेली निराशेची भावना आणि मुख्य interview चे केलेले वर्णन व मार्गदर्शन हे या पुस्तकाला अधिकच प्रेरणादायी बनवते.

तसेच, या पुस्तकातून हे ही समजते की, विश्वास नांगरे-पाटलांवर त्यांच्या गुरुजनांचा खूप प्रभाव आहे. त्यामुळे त्यांना दिगवडेकर सरांनी शिकवलेले ‘यौवनं धनसंपत्ति प्रभुत्वमविवेकिता | एकैकमप्यनर्थाय किमु यत्र चतुष्टयम ||’ म्हणजे तारुण्य, संपत्ती, सत्ता व अविवेक यांपैकी प्रत्येक कारण एकेकटही अनर्थ घडवण्यास पुरेसं आहे; मग चारही एकत्र असल्यावर काय घडू शकेल. हे सुभाषित त्यांच्या मनात घर करून केले. तसेच त्यांना खारगे सरांनी केलेले मार्गदर्शनही अत्यंत महत्वाचे आहे ते म्हणतात, “विश्वास, तू कॉलेजसारख्या मौजमजेत वेळ वाया घालवू नकोस. नाहीतर तरुणपण घोडचुका, प्रौढत्व संघर्ष आणि म्हातारपण पश्चाताप करण्यात निघून जाईल.’त्यामुळे ते पुन्हा जोमाने अभ्यास करू लागले.

तसेच विश्वास नांगरे-पाटील यांनी या पुस्तकामध्ये U.P.S.C. व M.P.S.C. या स्पर्धापरीक्षांची पूर्ण माहिती दिलेली आहे. तसेच, त्यांनी कसा अभ्यास केला हे ही सांगितले आहे. म्हणूनच ज्यांना या परीक्षांची तयारी करायची आहे त्यांनी हे पुस्तक नक्कीच वाचावे. ते म्हणतात, ‘बारीक नियोजन हे या परीक्षांचे सूत्र आहे. कारण, महानुभावी असणारे देखील फक्त नियोजन नीट न केल्याने सपाटून मार खातात. If we fail to plan, we plan to fail’ या उक्ती प्रमाणे वेळेचं नियोजन व smart अभ्यास यश-अपयश ठरवतात. आपण SMART अभ्यास करायचा पण SMART म्हणजे Specific, Measurable, Achievable, Realistic & Timebound.’

तसेच, लेखकांनी या पुस्तकामध्ये आजकालच्या तरुणायीला महत्वाचे सल्ले व मार्गदर्शन केलेले आहे. काही-काही ठिकाणी त्यांचे IPS झाल्यावरचे काही किस्से ही वर्णिले आहेत.

म्हणूनच IPS विश्वास नांगरे-पाटील लिखित ‘मन में है विश्वास’ हे अत्यंत प्रेरणादायी, आपणही असेच उतुंग काहीतरी करू शकतो ही प्रेरणा प्रत्येकामध्ये जागवणारे, आत्मविश्वासाची मशाल पेटवणारे हे पुस्तक सर्वांनी नक्कीच वाचले पाहिजे.

- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी

 

Listen Our Podcast on Your Favourite Platform: Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor Follow Us on Social Media Platforms: Linkedin | Instagram | Facebook

bottom of page