top of page
Search

मराठी दिवस विशेष कविता


बोलते हृदयातुनी, माय माझी मराठी..

अंतरातील भाव ओठी आणते मराठी...


बोललो भाषा किती जरी, भावते मराठी,

ताटव्यातील फुलांच्या मोगरा जणु मराठी....


आईच्या हातास अस्सल, चव जशी मराठी,

धाक बाबांचा दिसे ती, थोडी राकट मराठी..


गुपित बहीणींचे मनातील, अलवार जैसी मराठी..

सणांमध्ये सण दिवाळी, सजवते ही मराठी..


मैत्र कवितेशी करविते, शब्द देते मराठी..

रंग टिपण्या सृष्टीचे अन्, नेत्र होते मराठी


स्फुरण पोवाड्यात दिसते मावळ्यांना मराठी

स्वराज्याचे स्वप्न पूर्ण करविते ती मराठी...


ज्ञानियाची, तुकोबाची गोड वाणी मराठी

रचविते जी अभंगातून गोड गाणी मराठी..


रंग भक्तीचे मनातून, खुलविते मराठी..

ठायी ठायी विठ्ठलाचा, टिळा होते मराठी..


- डॉ.अंजली देशपांडे

bottom of page