top of page
Search

स्वातंत्र्यवीर सावरकर परिचित-अपरिचित : अक्षय जोग

पुस्तकाचे नाव: स्वातंत्र्यवीर सावरकर परिचित-अपरिचित

लेखक: अक्षय जोग

स्वातंत्र्यवीर सावरकर परिचित-अपरिचित हे अक्षय जोग लिखित पुस्तक म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावरील जणू एक शोधनिबंधच आहे. या पुस्तकातील लेखन हे अत्यंत अभ्यासपूर्ण व पुराव्यानिशी प्रस्तुत केलेले आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर परिचित-अपरिचित या पुस्तकाची आणखी एक विशेष खासियत म्हणजे या पुस्तकामध्ये मध्ये आपल्याला सावरकरांची दुर्मिळ छायाचित्रे पाहायला मिळतात. या पुस्तकामध्ये फक्त सावरकरांच्या गोष्टी व प्रसंग नसून त्यांच्या विचारांचा व कृतींचा आजच्या काळातील relevance त्यामध्ये अत्यंत उत्तम पद्धतीने दाखवण्यात आलेला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर व शहीद भगतसिंग यांचे सर्वसाधारणपणे वाचनात न येणारे किंवा प्रकाशात न येणारे अनेक प्रसंग किंवा भगतसिंग यांच्यावरील सावरकर विचारांचा प्रभाव याचे उत्कृष्ट विवेचन आपल्याला या पुस्तकामध्ये सापडते. त्याच बरोबर सावरकरांनी त्यावेळी केलेली चीन संबंधाची काही भाकित जी आज खरोखरचं खरी ठरत आहेत, याचेही उत्तम विवेचन उदाहरणासहित या पुस्तकांमध्ये करण्यात आले आहे.


त्याचबरोबरीने आपल्याकडे अनेकदा राजकीय स्वार्थासाठी किंवा सोयीसाठी सावरकर विरुद्ध गांधी असे चित्र उभे केले जाते. परंतु लेखक अक्षय जोग यांनी अत्यंत सुरेख पद्धतीने स्वातंत्र्यवीर सावरकर व महात्मा गांधी या दोन्हीही थोर आणि असामान्य व्यक्तिमत्वातील समान धागे, त्यांच्यातील समान विचार, त्यांचे अनेक विषयांवर असणारे एकमत यावर प्रकाश टाकलेला आहे.


त्याच बरोबर या पुस्तकांमधील अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर या पुस्तकाचा एक भन्नाट आणि रोमहर्षक प्रवास कसा कसा झाला हे देखील अत्यंत रोचक पद्धतीने सांगण्यात आलेले आहे आणि बरोबरीनेच सावरकरांचे कश्मीरच्या प्रश्नावरील अत्यंत स्पष्ट आणि दूरदर्शी विचार या पुस्तकामध्ये आपल्याला सापडतील.


म्हणूनच सुरुवातीला म्ह्टल्याप्रमाणे लेखक अक्षय जोग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर परिचित-अपरिचित या पुस्तकाच्या रूपानं फक्त काही प्रसंग किंवा गोष्टी न सांगता अत्यंत अभ्यासपूर्ण असा हा शोधनिबंध वाचकांसाठी एक पर्वणीच ठरणार आहे. तेव्हा सर्व सावरकरप्रेमी व सावरकर अभ्यासकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर अधिक जाणून घेण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचावे.

- अपूर्व कुलकर्णी

 

Listen Our Podcast on Your Favorite Platform:

Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor

Follow Us on Social Media Platforms:

LinkedIn | Instagram | Facebook

bottom of page