top of page
Search

हरवलेले पुस्तक


सीन १:

नेहमीप्रमाणे विनायक व्ही. टी. स्टेशनवर आला आणि ६.३५ अंबरनाथ फास्ट लोकलची वाट बघू लागला. स्टेशनवरच्या त्या अफाट गर्दीत तो एक बिंदू होऊन मिसळून गेला होता. जणु काही त्याला काही अस्तित्वच नव्हते. गाडी आली आणि लोकांची एकच झुंबड उडाली. विनायक देखील एका डब्ब्यात ढकलल्या गेला, बसायला गेला तर काय, सीटच्या वर रॅक मध्ये एक पिशवी दिसत होती. अजून तर कुणी गाडीत चढलेले नव्हते. चढणाऱ्या कुणाचीच ती बॅग नव्हती. अचानक विनायकला काय वाटले, कुणास ठाऊक, तो उठला, त्याने पिशवी अलगद काढली, पण ती चांगली जड होती, तिच्या भाराने त्याचा हात अचानक खाली आला. बघतो तर काय आत एक चांगले जाडजूड पुस्तक होते. त्याने पुस्तक उघडून बघितले, पुस्तकावर नाव होते, "श्रीरंग गोगटे". इंजिनियरिंग अभ्यासक्रमाचे अगदी नवेकोरे पुस्तक होते ते. त्याची किंमत होती ६०० रुपये. बापरे, म्हणजे आपल्या पगाराच्या अर्ध्या किमतीचे हे पुस्तक आहे, विकले तर नक्की ३०० रुपये मिळतील. एवढ्या गडबडीत सुद्धा त्याच्या मनात हा विचार आला. घरात पैशांची चणचण होतीच. बायकोचे दिवस भरत आले होते, आणि ती कधीही बाळंत होऊ शकत होती. हा विचार मनात आला पण त्याने लगेच झटकून टाकला. कारण पुस्तकाला देव मानण्याची आपली संस्कृती आहे, हे त्याला चांगले ठाऊक होते. एव्हाना बॅग मध्ये धोकादायक काही नाही, हे बघून पब्लिक दाटीवाटीने स्थिरावली होती. विनायक देखील आपल्या जागेवर बसला. आता त्याने बॅग मध्ये आणखी काय आहे हे बघितले. त्यात दिवाळी भेट कार्डे घातलेली २०-२५ पाकिटे होती. सगळ्यांवर सुबक अक्षरात पत्ते लिहीलेले होते. पण स्टॅम्प्स चिकटवले नव्हते आणि फ्रॉम मध्ये फक्त "रमा" एवढाच शब्द होता. "अरे देवा, म्हणजे हा विद्यार्थी हे पुस्तक घेऊन आणि आईने दिलेली कार्डे पोस्ट करण्यासाठी घेऊन जात असावा आणि उतरण्याच्या गडबडीत बॅग विसरून गेला असावा." विनायकाचे विचारचक्र सुरूच होते. आता त्या पुस्तकाची किंमत त्याला ६०० रुपयांहून अधिक जास्त वाटली. हे पुस्तक हरवले म्हणून एखाद्याचा अभ्यास चुकायला नको. जरी घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण अपुरे राहिले आणि विनायक नोकरीला लागला तरी शिक्षणाची किंमत त्याने जाणली होती. काहीही करून हे पुस्तक ज्याचे आहे त्याला परत करायचेच असे त्याने ठरवले. गाडीने आता वेग घेतला होता. आता अंबरनाथला उतरल्या नंतरच आपल्याला स्टेशनवर हे पुस्तक देता येईल असा विचार त्याने केला. पण हे पुस्तक दिले तर ही कार्डे पण परत करायला लागतील, हा विद्यार्थी कधी ती घेईल? दिवाळी तर जवळ आली आहे, मग हि कार्डे वेळेवर पोचणार नाहीत. त्यापेक्षा असे करावे का आपणच स्टॅम्प्स लावून हि कार्डे पोस्ट करावीत. थोडा खर्च होईल, पण ठीक आहे, दिवाळीच्या बोनस मधून काढूयात थोडे पैसे. म्हणून मग अंबरनाथ ला उतरल्यावर त्याने पोस्टाचे स्टॅम्प्स विकत घेतले. ते चिकटवून कार्ड्स पोस्ट केले. एका कार्डावर त्याला मुंबईचा पत्ता दिसला होता तो टिपून घेतला. पत्ता बघून त्याने दिनकर जोशींचा नंबर डिरेक्टरीतून शोधून काढून त्यांच्याकडे फोन केला. त्याने जोशींना सांगितले, कि तुमच्या नात्यातल्या विद्यार्थ्याचे हरवलेले पुस्तक मला सापडले आहे, मी माझा पत्ता देतो, त्याला ते रविवारी माझ्याकडून घेऊन जायला सांगा. माझ्याकडे फक्त रविवारचा दिवस मोकळा असतो. मी देखील गेलो असतो वेळ काढून, पण सध्या घरी अडचण आहे, म्हणून मी नाही जाऊ शकणार.

त्याला एकदम हलके हलके वाटले, त्याचे मन एका अलौकिक समाधानाने भरून गेले. आता तो त्या स्टेशनवरच्या गर्दीतला एक बिंदू नव्हता, तर एक तेज:कण झाला होता.

सीन २:

रमा आणि संजू घरातून निघाले, रमाने तिच्या मैत्रिणीच्या मैत्रिणीकडून आणलेले पुस्तक तिला पवई ला जाऊन परत करायचे होते. दिवाळी जवळ आलेली, त्यामुळे पवईलाच पोस्टात जाऊन सगळी भेटकार्डे पोस्ट करूयात असा विचार त्यांनी केला, म्हणून तीही बरोबर घेतली. त्यावेळी डोंबिवलीपेक्षा पवईहून पत्रांची डिलिव्हरी फास्ट होत असे. पिशवी चांगलीच जड होती गर्दीत पुस्तक खराब होऊ नये म्हणून पिशवी बाजूच्या रॅकवर ठेवली. गप्पांच्या नादात स्टेशन कधी आले ते कळलेच नाही. विक्रोळी ला उतरून गेले, बॅग विसरून. लोकल फास्ट होती. त्यावेळेस शेवटचे स्टेशन व्ही. टी. स्टेशन होते. लक्षात येताच ते लगेच पुढच्या ट्रेनने निघाले, व्ही. टी. ला. तेथे जाऊन बघितले तो ट्रेन पुन्हा अंबरनाथ कडे रवाना झालेली होती, आणि कुणीही हरवून सापडलेल्या (लॉस्ट & फॉऊंड) सामनामध्ये ती परत केलेली दिसत नव्हती. दोघेही खूपच हताश झाले. लग्नानंतरची त्यांची पहिली दिवाळी होती. रमाने नुकतीच पुढच्या शिक्षणाला सुरुवात केली होती. तिची परीक्षा तोंडावर आलेली होती. दिवाळीला माहेरी जाणे तिला जमणार नव्हते. दिवाळीला सगळ्या नातेवाईकांना पाठवायचे म्हणून हौसेने "ग्रीटिंग कार्ड्स" घेतले होते. त्यावर सगळ्यांचे पत्ते लिहून ठेवले होते. आता काय करायचे? उदास होऊन दोघे घरी परत आले. दुसऱ्याची वस्तू आपल्या हातून हरवल्याचे रमाला खूप दुःख झाले. पुढे काही दिवसांनी पैशांची जुळवाजुळव करून तिने नवे पुस्तक घेतले. ते मैत्रिणीच्या मैत्रिणीला साभार परत केले.

त्यावेळी रमाच्या घरी फोन नव्हता. म्हणून बूथवर जाऊन नातेवाईकांना फोन करावा लागे. दिवाळीला तिने मावशीला फोन केला, तेव्हा मावशीने सांगितले, की तुमचे दिवाळी ग्रीटिंग्स आम्हाला मिळाले. हे ऐकून रमा उडालीच. ग्रीटिंग्स तर बॅग मध्ये हरवले होते. पुन्हा काही तिने कार्डे विकत घेतली नव्हती. मावशीने पुन्हा आश्चर्याचा एक सुखद धक्का तिला दिला. ती म्हणाली, "अंबरनाथहून एक फोन आला होता, विनायक शिंदेंचा. त्यांनीच तुझी सगळी कार्डे पोस्टात जाऊन स्टॅम्प्स लावून पोस्ट केली. त्या कार्डां बरोबर त्यांना एक पुस्तक पण त्यांना मिळाले आहे. ते बहुतेक तू कुणाकडून वाचायला घेतले असावेस, कारण पुस्तकावरचे नाव काही वेगळेच होते बघ. त्यांनी त्यांचा पत्ता दिलेला आहे, तेव्हा तू जाऊन ते घेऊन येऊ शकतेस. तू पत्ता तेवढा लिहून घे, आणि हे बघ, फक्त रविवार बघून जा. ते फक्त रविवारीच घरी असतात". हे ऐकून रमाचा आनंद गगनात मावेना. तिने लगेच पत्ता लिहून घेतला. आता सध्या तिला त्या पुस्तकाची गरज नव्हती, पण पुस्तकाची कदर जाणणाऱ्या व्यक्तीच्या हाती ते गेले हे ऐकून ती नकळत सुखावून गेली. सगळ्या नातलगांना दिवाळी शुभेच्छा पण पोचल्या होत्या.

काही दिवसांनीं संजू त्यांच्याकडे जाऊन ते पुस्तक घेऊन आला. "स्टॅम्प्स" चे पैसे द्यायला तो विसरला नाही. विनायक अगदी छोट्या झोपडीवजा घरात राहत होते. कुठल्याशा प्रायव्हेट कंपनीत साधी नोकरी होती त्यांची. पगार पण जेमतेम असावा असे त्याच्या घराकडे बघून सहज लक्षात येत होते. त्यांनी संजूचे स्वागत केले, त्याच्या पत्नीने चहा बनवून आणला. त्यादिवशी काय घडले ते त्यांनी सांगितले. पुस्तक हरवले त्यादिवशी ते व्ही. टी. ला सगळ्यात आधी ट्रेन मध्ये चढले. चढता क्षणी त्याचे पिशवीकडे लक्ष गेले, विनायकने पिशवी उचलली. ना जाणो त्याला काय वाटले पण त्याने ती उघडून बघितली. त्यात पुस्तक बघितले. हे फार किमती पुस्तक आहे हे सुद्धा बघितले. आणि कुणी विद्यार्थी ते विसरला असावा असा कयास बांधला. एखाद्या विद्यार्थ्याचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांनी कार्डावरचा मुंबईचा पत्ता बघून ताबडतोब फोन केला, आणि हरवलेले पुस्तक मिळाले. संजू-रमाला दिवाळीची अनोखी भेट मिळाली होती. विनायकची शिक्षणाबद्दलची आस्था खरोखर कौतुक करण्यासारखी होती. त्याच्यासारखा विचार करणारे आणि मुख्य म्हणजे ते विचार आचरणात आणणारे अभावानेच आढळतात. कारण मनात कितीही असले तरी मुंबई सारख्या शहरात एवढा वेळ असतोच कुणाकडे? दुसर्‍यांचे सोडाच, स्वत:साठी तरी कुठे वेळ असतो? त्यामुळे कुणीतरी आपल्यासाठी स्वत:चा वेळ दिला तर ती एक अनमोल भेट मिळाली असेच समजायला हवे.

सीन 3:

रमाचे उच्चशिक्षण पूर्ण झाले. तिला आज चांगली नोकरी मिळाली आहे. संजूही त्याच्या कंपनीत चांगल्या मोठ्या हुद्द्यावर आहे. दर दिवाळीला दोघेही आवर्जून विनायकच्या घरी जातात. विनायकची मुलगी राधा, रमाला आत्या म्हणते. राधाला डॉक्टर व्हायचे आहे आणि तिच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी रमा आणि संजू ने घेतली आहे.

कधी कधी रक्ताची नाती काळाच्या ओघात दुरावलेली दिसतात. माणसाच्या मनाचे हे काय गूढ आहे, कोणास ठाऊक, पण कधी कधी असे अचानक ऋणानुबंध जुळून येतात. जसे एका हरवलेल्या पुस्तकामुळे एक अभंग नाते जुळून आले होते.


- डॉ. अंजली देशपांडे

 

Listen Our Podcast on Your Favorite Platform: Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor Follow Us on Social Media Platforms: LinkedIn | Instagram | Facebook

bottom of page