कोविड - महाराष्ट्रासाठी समाजशास्त्रीय अग्रक्रम : सचिन सनगरे

कोविड सारख्या जागतिक आपत्तीने भांडवलशाहीत उलथा पालथ होणार यात वाद नाही . जगभरातल्या देशांतील अर्थव्यवस्थांची यामुळे पुनर्रचना करावी लागेल आणि त्याची पायाभरणी आतापासून करावी लागेल. सर्व शक्यतांचा आढावा घेऊन सकारात्मक आणि कृतीशील भूमिकांची जबाबदारी तळापासून ते शिखरापर्यंत अशा स्वरुपात घ्यायला लागणार आहे. सर्व प्रकारची सामाजिक स्थित्यंतरे होणार हे सामाजिकशास्त्रांनी विचारात घेऊन स्वयंपूर्ण भारतासाठी श्रमाचे व्रत स्वीकारावे लागेल हेच खरे. विज्ञान आणि सामाजिक शास्त्रांच्या एकत्रित कार्याशिवाय स्वयंपूर्णतेचे ध्येय प्राप्त होऊ शकणार नाही. विचार , कायदे आणि प्रशासन यांतील बदलांशिवाय समाज व्यवस्थेतील विकासप्रक्रिया वेगवान होणार नाहीत. राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या उभारणीतील अनेक निर्णय हे लोकांना पटणारे असतील असे नाही, पण असे निर्णय घ्यावे लागणारच.
यातही समाजव्यवस्थांमध्ये होत जाणारे परिवर्तन हे सामाजिक जाणीवांतून सामाजिक जबाबदारीकडे वळणारे असायला हवे. त्यासाठी प्रत्येक घटकांसंबंधातील जाणीव ही आपलेपणाकडे वळणारी हवी. हा देश माझा, हा समाज माझा आणि या देशातील संस्कृती, धर्म, परंपरा या माझ्या वारसा आहेत अशी भावना जेव्हा व्यक्तीमनात निर्माण होते तेव्हा अधिकार, कर्तव्य यापलीकडे जाऊन आपली आद्य जबाबदारी याकडे व्यक्ती वळतो. समाजात सकारात्मक परिवर्तन याचा अर्थ नेमका कोणता घ्यायचा या बद्दल मतभेद होऊ शकतात. आपण चर्चा करणार आहोत ती स्वयंपूर्णतेच्या दिशेने आणि ज्या त्या प्रदेशाच्या शाश्वत विकासाच्या दिशेने.
शेती क्षेत्रातील रोजगाराच्या कमतरतेतून आणि शहरांच्या अनाठाई मोहापायी गावाकडून शहरांकडे झालेले बेहिशेबी स्थलांतर आजच्या घडीला सर्वात घातक बाब झाली आहे. आपल्या घराकडे वळण्याची मानवाची नैसर्गिक वृत्ती असली तरी ती आजच्या निर्बंधांच्या परिस्थितीत सर्वात घातक बाब ठरणार आहे. याचसाठी प्रत्येक गाव आणि प्रत्येक प्रदेश स्थानिक लोकसंख्येच्या तुलनेत सक्षम बनविणे अत्यावश्यक आहे. जीवनावश्यक आणि ऐषारामी यांत सहज वर्गीकरण करता येईल आणि त्याच आधारावर स्थानिक संसाधनांचा सुयोग्य वापर करून रोजगारव्यवस्था उभारली जाणे आवश्यक आहे. यासाठी मेड इन भारत म्हणजेच आपल्याच गावात आपल्या सर्व गरजा पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.
श्रम आधारित अर्थव्यवस्था श्रेष्ठ की तंत्रज्ञानावर आधारित असलेली?. हा वाद न घालता स्वयंपूर्णतेवर आधारलेली अर्थव्यवस्था निर्माण करणे ही आजची गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण , मनोरंजन अशी गरजांची प्राधान्यक्रमाने यादी करून आपल्या स्थानिक संसाधनांशी मेळ घालणे गरजेचे आहे. याच्याही आधी सर्वात महत्वाचे काम करावे लागेल ते म्हणजे प्रत्येक गावासाठी पाण्याची उपलब्धता. यासाठी कठोर नियोजन आणि प्रगत तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे.
शेतीनिष्ठ विकेंद्रित अर्थव्यवस्थेला पर्याय दिसत नाही. अन्न आणि आरोग्य या व्यवस्थांचा अग्रक्रम नाकारता येण्यासारखा नाही. कृषी आणि कृषीपूरक व्यवसायांच्या माध्यमातून हजारो वर्षांची संस्कृती सुफळ होत आल्याचे आपले ऐतिहासिक दाखले आहेत. तंत्रज्ञान युगात वाढलेल्या भांडवलशाही आकर्षणातून व स्पर्धेतून आपण आजच्या स्थितीला पोहचलो आहोत. कोविड सारख्या आकस्मिक संकटातून बाहेर पडण्याचे उपचार सापडतील देखील, पण अर्थव्यवस्थेत होणारी उलथापालथ सांभाळण्यासाठी पोटाला घास आणि हाताला उद्योग मिळवून द्यावाच लागेल. हे काम करताना संख्यात्मक सुरक्षितता आणि सामाजिक अंतर यासारख्या नियमनांची अंमलबजावणी करायची वेळ आल्यास त्यासाठी प्रयत्नपूर्वक तयार होणे गरजेचे आहे. कृषीक्षेत्राच्या सर्वांगीण विकासातून हे शक्य आहे.
कृषी क्षेत्रात अमर्यादित श्रमिकांना सामावून घेण्याची ताकद आहे. त्या शक्तीचा वापर सकारात्मक वृत्तीने करण्याची गरज आहे. सर्व प्रकारच्या प्राथमिक गरजा गावात पूर्ण होणार असतील, श्रमाला योग्य किंमत असेल आणि अपेक्षित असलेले सुखी जीवन व्यक्तीला गावातच प्राप्त होणार असल्यास सहसा कोणीही गाव सोडणार नाही. नैसर्गिक आपत्ती, रोजगाराची अनुपलब्धी, जगण्याचा संघर्ष अशा विषयांना कंटाळून लोक शहरांकडे वळतात. त्या कारणांची मीमांसा करून गावातील श्रम गावातच वापरले जावेत अशा व्यवस्था निर्माण करण्याची गरज आहे. प्रत्येक गावात सार्वजनिक उत्पादन केंद्र निर्माण करायला हवे ज्यातून त्यांना किमान रोजगार प्राप्त होईल आणि गरजांची पूर्तता करता येईल. राज्याराज्यातील स्थलांतरासाठीही सुयोग्य कायदे व नियमाने हवीत कारण त्यातून स्थलांतरित लोकसंख्येवर नियोजनबद्ध नियंत्रण ठेवता येईल .
विज्ञान तंत्रज्ञान, उच्च शिक्षण, परदेशी चलन, आंतरराष्ट्रीय संबंध, आयात निर्यात या बाबी देखील महत्वाच्याच आहेत. त्यांचा ताळमेळ स्थानिक व्यवस्थांनी जुळवून घ्यायला हवा. आज लाखोंच्या संख्येने असलेले श्रमजीवी गावांतून शहरांकडे आले आणि आज काही काळासाठी काम बंद झाल्यावर परतीच्या प्रवासासाठी आटापिटा करीत आहेत. श्रमजीवींना शहरात काही काळासाठी परिपूर्णत्व देणारी व्यवस्थाच आपण निर्माण करू शकलो नाहीत ही बाब मान्य करुनच भविष्यातील नियोजन करावे लागेल.
आरोग्य, शिक्षण आणि रोजगार हे विनासायास मिळावयास हवे हे स्वप्न म्हणून खूपच देखणे आहे, पण वास्तवात अशा सामाजिक, आर्थिक परिस्थितीसाठी अन्य क्षेत्रात किती विलक्षण मेहनत घ्यावी लागेल याचाही विचार तितकाच वास्तव वादाने करायला हवा आहे. स्पर्धेमुळे आत्महत्त्याही होतात आणि चमत्कारही होतात. त्यामुळे स्पर्धेला दूर सारून अलिप्ततावादी धोरण योग्य ठरणार नाही. प्रत्येक पिढीसमोरील आव्हाने वेगळी होती त्यांचेकडे असणारी साधन सुचीतही वेगळी होती याचे ज्ञान घेऊन आजच्या पिढीने आपल्या कर्तृत्वाच्या दिशा सुनियोजित करावयास हव्या. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा आयाम वाढून तो चौदा हजारांवर पोहचला असताना आपल्या कौशल्याच्या खुजेपणाकडे पहात न राहता यापैकी आपल्याला साजेशी कला आत्मसात करायला हवी आहे . कौशल्य विकास अभियान अंतर्गत लाखो युवकांनी अशी संधी घेतली आहेच. या योजने अंतर्गत एक हजार एकशे वीस कोटी इतका निधी शासन स्तरावर उपलब्ध करून देण्यात आला असून चौदा लाख युवकांना या संधीचा लाभ घेता येणार आहे. सक्षम युवक, सक्षम भारत घडवू शकेल असा आशावाद यामागे आहे.
भारतीय लोकशाही आणि भारतीय समाज याचा विचार करता असे वाटते की भारतीय लोकशाहीची मुळे आता कुठेशी तग धरू लागली आहेत. हजारो वर्षांचा सांस्कृतिक वारसा सांभाळण्याची ताकद अजून यायची आहे. लोकशाही शासनप्रणालीतील आपला सहभाग जेवढा वाढेल तेवढी ती सक्षम आणि न्याय्य होणार आहे. देशाचा नागरिक म्हणून मी देशाचा लाभार्थी असेन आणि कर्तव्य पालनापासून जर मी दूर जात असेन तर देशातील गैर सोयींबद्दल बोलण्याचा मला अधिकार प्राप्त होत नाही. नागरिक म्हणून मी कायद्याचे पालन करणारा असेन, लोकशाही प्रती सकारात्मक आणि सक्रीय असेन तर जाब विचारण्याचा संविधानिक हक्क मी प्राप्त करण्यास लायक ठरेन. या भावनेतून उदयोन्मुख नव्या भारताच्या, नव्या महाराष्ट्राच्या रचनेत माझा खारीचा का होईना वाटा असेल.
देश ही संकल्पना भूभागाच्या नकाशाची किंवा विशीत लोकसंख्येच्या आधाराची बाब नसून देश ही सकारात्मक मानसिकता आहे. एक भारत, आपला भारत म्हणून देशातील प्रत्येक व्यवस्थेकडे बघण्याची वेळ आली आहे. सद्य काळातील अशांततेचे अंधकार हे काही काळापुरतेच असतील. असमानतेतून समानतेकडे , नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे , अनारोग्याकडून आरोग्याकडे आणि अनेकत्वाकडून एकत्वाकडे जाण्याची हिच खरी वेळ आहे.
गंगेचे तिर्थ प्राप्त करण्यासाठी भगीरथाला आपल्या अनेक पिढ्या कष्टावे लागले हिच बाब आपल्या उभरत्या देशाच्या उज्वल भविष्याला लागू पडते. पिढ्यांच्या कष्टाशिवाय आणि श्रमिकांच्या घामाशिवाय सुख पदरात पडत नाही . पूर्वजांच्या घामारक्ताने संचित रुपात मिळालेल्या या स्वातंत्र्याला सुदृढ बनविण्यात, सक्षम बनविण्यात अल्पस्वल्प रुपात का होईना माझ्या आणि आपल्या सर्वांच्या योगदानाची गरज आहे. आपला देव आणि आपण यामध्ये आपला देश आहे आणि आपल्या देशाला आपले आराध्य स्वरुपात नागरिक म्हणून पाहायला लागल्यास महासत्ता नाही, पण महान लोकशाही , लोकसत्ता म्हणून आपला देश नावाजला जाईल .
- सचिन सनगरे

Listen Our Podcast on Your Favorite Platform:
Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor
Follow Us on Social Media Platforms: