top of page
Search

"नेतृत्व आणि कर्तृत्व "


"विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता"

समाजात मान मान्यता, प्रतिष्ठा, लौकिक मिळवण्यासाठी काही व्यक्ती दान देण्याचा अवलंब करतात. काही जनसेवा करण्याचे नाटक करतात. आपले भाट जमवून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतात. आपले नाव लोकांपुढे यावे म्हणून धडपडतात. पण खऱ्या कार्यकर्त्याची ओळख त्याच्या कार्यातूनच पटते. तो कधीही पुढे पुढे करताना दिसत नाही, परंतु त्याच्या व्यक्तिमत्वाचे तेज लपून राहू शकत नाही. अशा कार्यकर्त्याचे वर्णन करताना वरील वाक्प्रयोग वापरला जातो.


संपूर्ण श्लोक: नाभिषेको न संस्कार:, सिंहस्य क्रियते मृगे:, विक्रमार्जितसत्वस्य स्वयमेव मृगेंद्रता।। "नेतृत्व आणि कर्तृत्व" ह्या लेखाचा Podcast ऐकण्यासाठी खाली click करा.

सिंहाला कुठलाही अभिषेक किंवा राज पदाचा संस्कार न करतादेखील सर्व प्राणी राजा म्हणून मान देतात. मला राजा म्हणा अथवा राज्यपद द्या असे त्याला सांगावे लागत नाही. त्याचे शौर्य, त्याचा रुबाब, त्याची चाल, त्याचे सामर्थ्य या सर्वांमुळे तो आपोआपच जंगलाचा राजा ठरतो, असा या श्लोकाचा अर्थ आहे.

Be a Leader/Master/King by virtue of your own attributes and heroism" राजा कसा असावा, राज्यपदासाठी योग्य व्यक्तीच्या अंगी कोणते गुण असावेत हे पितामह भीष्म यांनी युधिष्ठिराला "राजधर्म" म्हणजे काय हे सांगताना सांगितलेली आहेत. त्यात राजा हा प्रजेच्या हितासाठी काम करणारा हवा हे सगळ्यात महत्वाचे आहे. अर्थात हा खूप मोठा विषय आहे. आपण इथे बघतोय की एखाद्या व्यक्तीच्या अंगी असलेल्या तेजस्वितेमुळे ती व्यक्ती कशी मोठ्या पदाला पोचते.


एखादी व्यक्ती तेजस्वी आहे असे आपण केव्हा म्हणतो? एखाद्या व्यक्तीचे दिसणे आपल्याला दिपवते, तर एखाद्याचे चालणे आपल्याला ऐटबाज वाटते. काही लोकांचे तेजस्वी व्यतिमत्व त्यांच्या बोलण्यातून प्रतीत होते. पण अशा व्यक्तींना "मी असा दिसतो, किंवा असा चालतो-बोलतो" याची जाहिरात करायची गरजच नसते. ही तेजस्विता लोक अनुभवतात, व आपोआप मनात अशा व्यक्तीला राज्याभिषेक सुद्धा करतात. संत तुकाराम त्यांच्या अभंगातून सांगतात, "न लगे चंदना सांगावा परिमळ । वनस्पतिमेळ हाकारुनी, अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी । धरिता ही परी आवरेना" चंदनाला त्याच्या परिमळाचा अर्थात सुगंधाचा धिंडोरा पिटवण्याची गरज नसते, सूर्य काही प्रकाश किरणांना सांगत नाही की "लोकांना जागे करा, आणि मोराला काही मेघ नाचायला सांगत नाहीत. जे अंतरंगी असते तेच दिसून येते. तसेच "रहीम के दोहे" मधील "बडे बडाई ना करे, बडे ना बोले बोल, रहिमन हिरा कब कहे, लाख टका मम मोल" हा दोहा देखील हेच सांगतो, की हिऱ्याला सांगावे लागत नाही कि त्याचे मोल काय आहे, ते त्याच्या तेजस्वितेवरून ठरते.


आजकाल सगळीकडे जाहिरातबाजी होताना दिसते. नेते आपल्या नावाचे मोठमोठाले बॅनर्स रस्त्यारस्त्यांवर लावून ठेवतात. त्यात एखाद्याचा वाढदिवस असतो, आणि दहा लोक त्याला शुभेच्छा देतात. कुठेतरी उद्घाटनाचा प्रसंग असतो, आणि तिथे एखादा नेता, एखादा हिरो प्रमुख अतिथी म्हणून येणार असतो, त्याचीही खूप जाहिरात होते. सोशल मीडिया तर "माकडाच्या हाती कोलीत" दिल्यासारखी आहे. सिने नटनट्या प्रसिद्धीच्या झोतात राहावे म्हणून उगाच नको तेवढा आणि नको तसा सोशल मीडियाचा वापर करताना दिसतात. पण त्यामुळे ते श्रेष्ठ होत माहीत. लोक गम्मत किंवा टाईम पास म्हणूनच त्याकडे बघतात.

सोशल मीडिया ही खूप जपून वापरायला हवी.. तिचा उपयोग जर एखादी व्यक्ती स्वत:च्या फायद्यासाठी करीत असेल, तर लोक तेवढ्या पुरते त्या व्यक्तीचे कौतुक करतील, म्हणून ती व्यक्ती काही एखाद्या क्षेत्रातील सर्वश्रेष्ठ व्यक्ती ठरत नाही. तिला लोकप्रियता लाभणार नाही. त्यासाठी तसे कर्तृत्व दिसायला हवे. असे कर्तृत्व जेव्हा इतरांना अनुभवायला मिळेल, दिसून येईल तेव्हा ती व्यक्ती आपोआप लोकांना आवडायला लागेल. सचिन तेंडुलकर हा काही त्याच्या Instagram Posts मुळे प्रसिद्ध नाही झाला. त्याने क्रिकेट च्या क्षेत्रात मोलाची कामगिरी करून दाखविली. म्हणून त्याला लोक अव्वल दर्जाचा क्रिकेटपटू म्हणून मान देतात. आणि मुळात ज्या व्यक्ती ला खरोखर कुठल्या क्षेत्रात नेतृत्व करायचे आहे, त्या व्यक्तीला असे काही मी करतोय हे सांगण्याची गरज नाही. APJ अब्दुल कलाम हे काही त्यांच्या सोशल मीडिया वरील अस्तित्वामुळे श्रेष्ठ नाहीत तर त्यांची बुद्धिमत्ता, देशासाठी देशाच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान यामुळे ते सर्वोत्तम ठरतात.


अशी अनेक उदाहरणे आपल्याला इतिहासात सापडतात. स्वातंत्र्यवीर सावरकरांना कुणी राजा बनवले नाही, त्यांना तशी लालसाही नव्हती. परंतु, हिंदू जनांच्या, हिंदू मनांच्या हृदय सिंहासनावर ते अधिष्ठ आहेत. भगतसिंग, राजगुरू, वासुदेव बळवंत फडके यांच्या अंगी देशप्रेमाची जाज्वल्य ज्योत तेवत होती, त्याचे तेज त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून विलसत होते. त्यामुळे सर्व देशप्रेमी लोकांच्या मनाचे ते राजेच आहेत. त्यांना कुणी मुगुट चढवायची गरजच नाही. दत्ताजी शिंदे हे मराठ्यांचे शूर सेनापती होते. पानिपतच्या युद्धात नजीबखानाने त्यांना ठार मारले. मरण्याच्या अगोदर नजीबने त्यांना विचारले 'क्यूॅं मरहट्टे और लढोगे ?' त्यावर दत्ताजीने दिलेले 'क्यूॅं नही, बचेंगे तो और भी लढेंगे" हे उत्तर युद्धभूमीवर जखमी अवस्थेत असलेल्या दत्ताजींची तेजस्विता दर्शविते.

स्वामी विवेकानंद हे तर तेजस्वितेचे मूर्तिमंत प्रतीक होते. ऐन तारुण्यात दीक्षा घेऊन त्यांनी हिंदुधर्माचा प्रसार केला. ११ सप्टेंबर १८९३ रोजी अमेरिकेतील शिकागो येथे झालेल्या सर्वधर्म परिषदेत "अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो" या शब्दांनी आपल्या ओजस्वी वाणीने त्यांनी सगळ्यांना मंत्रमुग्ध केले. स्वामी विवेकानंदांनी हिंदु समाजाच्या सीमा किती विस्तृत आहेत, हे सगळ्या जगाला दाखवून दिले. परकीयांकडून देण्यात आलेली घृणास्पद वागणूक व अपमान यांचा चिखल उडालेल्या हिंदु धर्माला त्यांनी त्याच्या मूळ तेजस्वी रूपासह जागतिक सर्वधर्मपरिषदेत सर्वोच्च आसनावर विराजमान केले. स्वामीजींच्या प्रत्येक शब्दात श्रद्धा, त्याग, सेवाबुद्धी प्रतीत होत असे. म्हणून त्यांच्या शब्दांचा लोकांवर प्रभाव पडत असे. स्वामीजींनी म्हटले होते, कि मला जर १०० तेजस्वी तरुण मिळालेत, तर मी या अवघ्या भारत देशाला देदीप्यमान करीन. अशी ही तेजस्विता महान आहे.


अशी अनेक व्यक्तिमत्वे त्यांच्या तेजस्वितेमुळे अवघ्या जगावर प्रभाव टाकून गेली, आणि खऱ्या अर्थाने त्यांनी देशाचे नेतृत्व केले. नेताजी सुभाषचंद्र बोस हे खरेखुरे नेता होते. आधुनिक भारताच्या इतिहासात एक धडाडीचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे बघण्यात येते. तरुणांना देश प्रेमाकडे आकर्षित करणारी त्यांची विचारसरणी होती. नेताजींनी भारत देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक देशांसोबत संपर्क साधला. इतर राष्ट्रांबरोबर संपर्क साधताना त्यांना त्या राष्ट्रांचा प्रवासही करावा लागला. या प्रवासात त्यांनी कामगारांना, जनतेला आणि कैद्यांना एकत्रित केले आणि एका विशाल सेनेचे निर्माण केले. त्या विशाल सेनेचे नाव ‘आझाद हिंद सेना’ असे ठेवण्यात आले. नेतांजींकडे "तेजस्विता" जन्मजातच होती. शाळेत असतानादेखील त्यांनी इंग्रजी मुलांचे वर्चस्व कधीच सहन केले नाही. सावरकरांनी सुरु केलेल्या सशस्त्र क्रांतीच्या स्वप्नाला नेताजींनी पूर्णत्व दिले. त्यांनी केलेल्या चळवळीचा भारताला स्वातंत्र्य मिळण्यात खूप महत्वाचा वाटा आहे, यात काहीच संशय नाही. विश्वास पाटील लिखित "महानायक" कादंबरी ही नेताजींच्या जीवनावर आधारित आहे. तिचे शीर्षक नेताजींच्या व्यक्तिमत्त्वाला केवढे समर्पक आहे!


"अब्राहम लिंकन" यांच्याकडे योग्य शिक्षण, देखणे रूप, संपत्ती नसूनही ते अमेरिकेच्या इतिहासात सर्वात प्रभावी राष्ट्रपती ठरले. त्यांचे एक वाक्य "Things may come to those who wait, but only the things left by those who hustle" , त्यांचा दृढनिश्चयी स्वभाव दर्शविते. एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेले लिंकन यांनी फक्त १८ महिने शालेय शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी हाती येतील तशी पुस्तके वाचून काढली आणि स्वत:चे शिक्षण स्वत:च पुरे केले. वयाच्या २२ व्या वर्षी घरातून निघून जाऊन त्यांनी कायद्याचा अभ्यास केला, राज्य विधानमंडळात (स्टेट लेजिस्लेटर) ते एक यशस्वी मुखत्यार झाले (attorney ) झाले. पुढे राष्ट्रपती झाले आणि अमेरिकेसारख्या देशाला अतिशय संघर्षाच्या काळोखातून, वादळातून निघण्यास मार्गदर्शन केले.

एका सामान्य रशियन ज्यू कुटुंबातील मुलगी "गोल्डा", ज्यूंसाठी स्वतंत्र भूमी असावी या विचाराने जेव्हा झपाटलेल्या जाते, तेव्हा इस्रायलच्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर सही करणारी एकमेव स्त्री ठरते आणि वयाच्या सत्तराव्या वर्षानंतर पंतप्रधान होते. वीणा गवाणकर लिखित "गोल्डा-एक अशांत वादळ" हे गोल्डाचे जीवनचरित्र तिच्या जीवनातील संघर्षाचे आणि तिच्या तेजस्वितेचे यथार्थ दर्शन घडविते.

प्रत्येकच व्यक्तीच्या मनात आपण तेजस्वी दिसावे, लोकांनी आपल्याला मान द्यावा अशी इच्छा असते. पण अशा इच्छेला योग्य कृतीची जोड आवश्यक आहे. हे तेज बाह्यरूपाचे नाही, तर अंतर्मनाचे असावे. खूप भारी कपडे घालून, चेहऱ्याची रंगरंगोटी करून तेज वाढत नाही, तर तेज हे कर्तृत्वाने वाढते. आणि कर्तृत्ववान बनायचे असेल, तर आयुष्यात काहीतरी ध्येय असायला हवे. याचा अर्थ कसेही गबाळे राहून चालेल असा मात्र नाही. मला इथे "लक्ष्य" हा सिनेमा आठवतो. "करण शेरगील" हा आयुष्यात काहीही ध्येय नसलेला एक तरुण. आयुष्यात काय करायचे हेच त्याला ठरविता येत नसते. मित्र अर्ज करतो,म्हणून हा देखील सैन्यात भरती होण्याचा अर्ज करतो. पण मित्र त्याचा विचार बदलतो, आणि आता करणला काय करावे काहीच सुचत नाही. यावेळी त्याच्या मैत्रिणीने केलेल्या कानउघाडणीमुळे तो सैन्यात भरती होतो. काही दिवसांनी मात्र सैन्यातील कडक शिस्त न मानवल्यामुळे घरी पळून येतो. यावर त्याची मैत्रीण त्याची कठोर शब्दात निर्भत्सना करते, म्हणून तो पुन्हा सैन्यात परत येतो. यानंतर जेव्हा तो ध्येयाने पेटून उठतो, तेव्हा एक आर्मी ऑफिसर तर होतोच, पण युद्धात लक्षणीय कामगिरी करून दाखवतो.


आपल्या ध्येयमार्गावर चालत असताना, अंगी कणखरपणा असला पाहिजे, मनावर संयम हवा, तसेच शरीर देखील सुदृढ ठेवायला हवे. कधी कधी शरीर बलवान असूनही, मन जर दुर्बल असेल, तर ध्येय सध्या करता येणार नाही. कधी कधी आपल्या अंगी असलेल्या गुणांना, शक्तींना कुणीतरी जागृत करावे लागते. लंकेला जाताना जेव्हा समुद्र पार करायचा होता, त्यावेळी कसे काय करता येईल याची सगळ्यांना चिंता होती. हनुमंत अतिशय पराक्रमी, महाशक्तिमान असूनही समुद्राकडे बघून, इतर सैनिकांप्रमाणे मान खाली घालून बसला, तेव्हा जांबुवंताने त्याला त्याच्या अंगी असलेल्या शक्तीची जाणीव करून दिली. त्यानंतर प्रचंड रूप धारण करून हनुमानाने एका उडीत समुद्र पार केला अशी एक गोष्ट सांगतात. या उदाहरणांवरून असे दिसते, की तेजस्वितेची ज्योत कधीतरी जाणीवपूर्वक पेटवावी लागते. पण नेहमीच कुणीतरी मला भेटेल आणि माझ्या आयुष्यात चमत्कार घडून येतील असे होऊ शकत नाही.


तसेच पूर्वजांच्या बळावर किंवा पुण्याईवर कुणी खऱ्या अर्थाने राजा बनू शकत नाही. त्यासाठी राजपदाला आवश्यक गुण अंगी असावे लागतात. सुपर ३० हा असाच आणखी एक चित्रपट. या सिनेमातील 'आज राजा का बेटा राजा नही बनेगा, राजा वही बनेगा जो हक्कदार होगा.' हा संवाद खूप गाजला. केंब्रिज विद्यापिठात प्रवेश मिळूनही, केवळ गरिबी आड येऊन तेथे प्रवेश घेऊ न शकणाऱ्या आनंदकुमार याने आपल्या बुद्धीच्या सामर्थ्यावर श्रीमंतांची मक्तेदारी असलेल्या कोचिंगच्या क्षेत्रात आपले वर्चस्व प्रस्थापित केले. योग्य शिक्षणापासून वंचित म्हणावे अशा विद्यार्थ्यांना शिकवून त्याने आय. आय. टी. च्या प्रवेश परीक्षेत त्यांना भरघोस यश मिळवण्यास मदत केली. अशी अनेक उदाहरणे आपल्याला बघायला मिळतात. तेजस्विता ही काही पैसे देऊन खरेदी करण्याची वस्तू नाही, हेच खरे.


आपल्या अवतीभवती बरेचदा आपल्याला अशा व्यक्ती दिसतात की काहीही कर्तृत्व नसताना कुणाच्यातरी मेहेरबानी मुळे वरच्या पदावर अधिष्ठित असतात. अशा व्यक्तींना कामाचा अनुभव नसतो, पण एकदम वरच्या पदावर गेल्यामुळे ते अती आत्मविश्वासाचे बळी ठरतात, आपल्याला सर्वांनी मान द्यावा असे त्यांना वाटत असते, "स्थानं प्रधानं न बलं प्रधानं, स्थाने स्थित: कापुरूषोपि शूर:" अशी ही स्थिती असते. पण "जिथे चमत्कार, तिथे नमस्कार" ही रीत आहे. त्यामुळे त्यांना हवा तसा मानसन्मान मिळत नाही. मग ते उगाच लोकांवर चिडचिड करतात, आगपाखड करतात, पण यातून काहीच साध्य होत नाही. याउलट एखादी व्यक्ती मोठ्या पदावर नसेल, पण विचारांनी प्रगल्भ असेल, तेजस्वी असेल, तर आपोआप लोक त्याचे अनुकरण करतील, त्याच्या शब्दाला मान देतील. म्हणजेच त्याला "राजपद" बहाल करतील. मग त्या व्यक्तीकडे कुठलेही मोठे पद नसले तरी काहीही फरक पडत नाही. सुधा मूर्ती हे नाव कुणाला माहिती नाही? एक संगणक शास्त्रज्ञ व अभियंता, सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका अशा अनेक उपाधी त्यांच्याकडे आहेत. त्यांच्या "थ्री थाउजंड स्टिचेस" या पुस्तकात, त्यांनी त्यांच्या इंजिनीअरिंग विद्यालयातील अनुभव सांगताना लिहिले आहे, कि त्यांच्या वर्गात त्या सोडून इतर सर्व मुलगेच होते. त्यावेळी कॉलेजमध्ये लेडीज टॉयलेट सुद्धा नव्हते. तसेच ही मुलगी काय इंजीनियरिन्ग करणार असाच वर्गातील सर्वांचा समाज होता, पण त्यांनी वर्गात सर्वप्रथम येऊन सगळ्यांचा तो समज खोटा ठरविला. त्यानंतर कुणीही त्यांना कधी कमी लेखले नाही. त्यांनी भारती विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग काॅलेजमधून बी.ई. इलेक्ट्रिकलची पदवी सुवर्णपदकासह मिळवली.


या सगळ्या उदाहरणांवरून हेच दिसून येते की, तेजस्विता हि काही कुणा एकाची मक्तेदारी नाही. तिला वय, जात, धर्म, लिंग, गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेद नाही. ती ज्याच्याकडे आहे ती व्यक्ती आपोआपच सगळ्यात उठून दिसते. तिचे विचार लोकांना आकर्षित करतात आणि लोक नकळत त्या व्यक्तीला "राजपद" बहाल करतात. अर्थात कर्तृत्व असेल तर नेतृत्व आपोआपच प्राप्त होते.

- डॉ.अंजली देशपांडे

 

Listen Our Podcast on Your Favorite Platform:

Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor

Follow Us on Social Media Platforms:

LinkedIn | Instagram | Facebook

bottom of page