top of page
Search

'स्वान्त सुखाय' अर्थात स्वतःच्या सुखासाठी!


सुमा अविवाहित, पंचेचाळीशीला आलेली, मनसोक्त जगणारी अगदी फिट आणि फाईन अशी ललना आणि तिच्या शाळेतल्या मैत्रिणी एका शनिवारी तिच्याच घरी निवांत गप्पा मारत आहेत. आणि एकीकडे सुमीने केलेल्या पदार्थावर यथेच्छ ताव मारत आहेत.

भेळेचा तोबरा भरून मधुरा सुरू होते,"काय सांगू तुम्हाला, माझ्या मुलाची बारावीची परीक्षा चालू होती, त्याला काय हवं नको बघण्यात, त्याच्यासाठी 4 ला उठण्यात, त्याची तब्येत नीट राहावी म्हणून नीट खाणं पिणं करण्यात, त्याला सगळ्या वस्तू हातात देण्यात अगदी दिमतीतच म्हण ना इतके दिवस गेले म्हणून सांगू, अगदी पिट्टा पडला माझा!"

तेवढयात तावातावाने सोहा बोलायला लागते, "अगं माझ्या सासूबाईं अचानक तोल जाऊन पडल्या आणि मग पुढचे काही दिवस काय सांगू तुम्हाला, माझंच कम्बरडं मोडायची वेळ आली आहे अगदी!"

तेवढ्यात मंजू,"आमच्याकडे दैवकृपेने असलं काही नाही बरं, पण आमच्या नौरोबाला नुसता लाडावून ठेवलंय सासूबाईंनी. डबाच काय अगदी रुमाल, सॉक्स हातात द्यायचे, यांना तहान लागली की आपली कामं बाजूला ठेऊन पाणीही हातात द्यायचं, जेवताना तव्यावरची पोळी ताटात पडली पाहिजे नाहीतर भडकतेच स्वारी, मी म्हणून टिकले बाई!

तुमचं तरी विशेष नाही काही, मी तर नोकरी पण करते, घरातलंही सगळं करावंच लागतं, चार कामांना बायका असल्या तरी घरची आवरा आवरी, भाजीपाला आणणे, दळणं आणणे करावंच लागतं. सर्वाच्या आवडीचं काय करायचं हे बाईंना सांगावंच लागतं , काम नाही तरी तो विचार करावाच लागतो ना!"

लग्न न केलेल्या सुमाकडे पाहून म्हणते,"हिचं आपलं बरं आहे. स्वतःच्या घरात काही काम नाही, दुसऱ्याच्या मदतीला मात्र हजर!"

सुमा सहज हसत हसत,"हो मी करते मदत इतरांना, त्यामुळे मला आनन्द मिळतो. आणि जगतो कशासाठी आपण? आनंद मिळवण्यासाठी ना?"

मधुरा तिला थांबवत,"अगं हो, पण रोज काही काम पडत नाही दुसऱ्याच्या मदतीला जाताना, मग त्यात आनंद मिळेल नाहीतर काय? आमच्यासारखं 24 तास संसाराला वाहून घ्यायला लागलं असतं ना तर कळलं असतं. स्वतःला आवडेल ते करायला तू तर मोकळीच की!"

सुमाही जरा वैतागतेच पण थोडा विचार करून म्हणते, "खरं असेलही तुमचं पण तुम्हीही थोडं माझ्यासारखं जगून बघा, अगदी संसार सोडणं नाही पण स्वतःच्या इच्छांचा विचार करून बघा, त्यासाठी निक्षून वेळ काढा. करा स्वतःची बकेट लिस्ट! आणि इतरांच्या कामातून जरा बाजूला व्हा आणि तुमच्या इच्छा पूर्ण करा. आपण बरोबर एक महिन्याने भेटूच, तेव्हा पुन्हा सगळं शेअर करूया."

 

बरोबर एक महिन्याने पुन्हा सुमाचेच घर - मधुरा, सोहा नि मंजू सगळ्या जमल्या आहेत. पण बऱ्यापैकी गप्पच आहेत. सुमाच विषय काढते,"काय मग मुलींनो, काय म्हणते बकेट लिस्ट?"

थोड्याशा निराश सुरात मंजू बोलू लागते,"नाही गं जमलं काहीच करायला. मी असा आत्ता माझ्यासाठी वेळ नाही काढू शकत, मला जबाबदाऱ्या आहेत गं खूप आणि त्या पूर्ण नाही केल्या तर नाही बरं वाटणार मला! नवऱ्याचं प्रमोशन जवळ आलंय, मुलांची महत्वाची वर्ष आहेत मी फक्त माझ्या आनंदाचा विचार नाही करू शकत अगं, नवऱ्याच्या प्रमोशन मध्ये, मुलांच्या प्रगतीत मलाही आनंदच आहे की, त्यासाठी पडले थोडे जास्त कष्ट तरी करायलाच हवेत ना!"

मंजूचं म्हणणं पटतं आहे अशी मान डोलवत मधुरा म्हणते,"खरं गं, मी मुलाच्या शिक्षणात गुंतले, त्याच्याभोवती फिरत राहिले कारण त्याच्या प्रगतीत मलाच आनंद आहे, आत्ता तरी तोच आनंद सगळ्यात मोठा आहे."

सोहा जराशी कसनुशी हसून म्हणते,"खरं सांगू का, सासूबाईंच्या सगळ्या कामात स्वतःकडे बघायलाही होत नाही मला पण मी आत्ता तरी केलंच पाहिजे ना त्यांचं!"

तिला मध्येच थांबवत मंजू म्हणते , "हो ना, नाहीतर आयुष्यभर तुला नावंच ठेवतील ना, आले गेले सगळेच. त्यांच्या सगळ्यांच्या दृष्टीने तूच वाईट ठरायची!त्यामुळे तूला एवढं तरी करावंच लागणार!"

सोहा म्हणते, " खरंतर कोणी नावं ठेवेल म्हणून नाही पण माझं मलाच त्यांचा असा त्रास बघवणार नाही गं, आणि मग मी काही नाही केलं त्यांचं सगळं नीट तर माझं मनच मला छळत राहील."

तेवढ्यात सुमा गरमा गरम चहा आणि भजी घेऊन येते आणि म्हणते, "मी हे खरंतर तुमच्या साठी नाही माझ्यासाठी केलं आहे!" सगळ्या डोळे मोठे करून भरून वहात असलेल्या भज्यांच्या डिश कडे पाहून म्हणतात, एवढी भजी फक्त तुझ्यासाठी??"


सुमा हसत हसत प्लेट भरून देत,"अरेच्या, तशी काही एकटी नाही खाणार मी एवढी भजी, खाणार तुम्हीच! घ्या ना गरमागरम... पण तुमच्यासाठी तुमच्या आवडीचे चार पदार्थ करायला मलाही आवडतं. मला आवडतं तुमच्यासाठी काहीतरी करायला म्हणून केलं, खाणार तुम्ही पण आनंद मला मिळणार ना! सोहाला तिच्या आवडीची तळलेली मिरची देत म्हणते सोहा,तू सासूचं सगळं करतेस ते कोणासाठी? तुला सगळ्यांच्या गुड बुक्स मध्ये राहायचं आहे अगदी स्वतःच्याही, त्याने तुला आनंद मिळणार आहे म्हणून!

मधुरा मुलासाठी इतकं करतेय कारण त्याची प्रगती झाली की सगळे हिच्याही श्रमाचं कौतुक करणार आणि तिला स्वतःला सुद्धा मुलाच्या प्रगतीचा आनंद मिळणार म्हणून!

आणि ही मंजू , घरचं- ऑफिसचं सगळं करतेय पण नवऱ्याचं प्रमोशन, मुलांची प्रगती हे सगळं हिला हवं आहे म्हणून, तिच्या स्वतःच्या आनंदकरीता!

आपण इतरांसाठी जे जे काही करतो ते सरते शेवटी आपल्याच आनंदाकरिता. अगदी कोणीही कोणाला कितीही मदत केली तरी ती करण्याची बुद्धी त्याला होते कारण आत कुठेतरी आनंद मिळतो, समाधान मिळतं. म्हणजे दुसऱ्यासाठी म्हणून केलेली प्रत्येक गोष्ट ही खरं तर माणूस स्वतःसाठीच करत असतो.

या सगळ्यात आपली वैयक्तिक बकेट लिस्ट बाजूला पडतही असेल पण ते ही आपल्या आनंदाचा प्राधान्यक्रम वेगळा असतो म्हणून. मला खूप कष्ट पडतात, मी सतत घरातल्यांसाठीच कष्ट करत राहते, इतरांना त्याची काही तमाच नाही असे विचार मनात येणारी व्यक्ती प्रत्यक्षात मात्र तेच ते करत राहते कारण कितीही कष्ट पडले तरी मिळणारा आनंद तिचाच असतो!

अगदी रामचरितमानस ची रचना करताना तुलसीदासही म्हणतात

"स्वान्त सुखाय तुलसी रघुनाथगाथा"

अर्थात

"ही गाथा मी स्वतःच्या आनंदाकरिता लिहिली आहे"

खरंच, हा स्वानंद शोधता आला पाहिजे, कुटुंबवत्सल स्त्रीला तिच्या कुटुंबाच्या आनंदात, एखाद्याला गाण्यात, एखाद्याला एखाद्या कलेत, काहींना निसर्गात, काहींना खेळात तर काहींना वाचन- लेखनात, एखाद्याला प्रवासात तर एखाद्याला दुसऱ्याची सेवा करण्यात सुद्धा हा आनंद गवसू शकतो.

बृहदारण्यक उपनिषदात महर्षी याज्ञवल्क्य पत्नी मैत्रेयीला हेच सांगत असतात की आनंद ही आत्मिक भावना आहे. दुसऱ्या कोणावरही असलेले प्रेम, ममत्व हे त्या दुसऱ्या व्यक्तीमुळे नसतेच तर त्या प्रेमाच्या अभिव्यक्तीने आपल्याला स्वतःला अत्यानंद मिळतो म्हणून. माणूस कोणतीही गोष्ट, कृती करतो ती त्याने त्याला स्वतःला आत्मिक समाधान मिळते म्हणून. म्हणून आत्मशोध घेतला पाहिजे. या महर्षींनी सांगितलेला आत्मशोध घेण्याइतकी आपल्यासारख्या सामान्य माणसांची झेप नक्कीच नाही. पण किमान सगळं आपल्याच आनंदासाठी चाललं आहे हे मनात पक्कं असावं अजून जे हवं आहे ते मिळवायचा आनंदाने प्रयत्न करावा, जे मिळत आहे ते आनंदाने स्वीकारावे व त्यात आनंद मानावा एवढे तरी आपण नक्कीच करू शकू. काय म्हणता??

- शर्वरी ताथवडेकर

 

Listen Our Podcast on Your Favorite Platform: Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor Follow Us on Social Media Platforms: LinkedIn | Instagram | Facebook

bottom of page