उपदेश आणि सल्ला
"उपदेशो हि मूर्खाणां" हा वाक्प्रयोग जेव्हा एखादी व्यक्ती कुणी जाणकाराने दिलेला मोलाचा उपदेश अंगीकारत नाही, आणि आपल्या मनाने चुकीचा मार्ग निवडते आणि संकटात सापडते अशा वेळी वापरतात. उपदेश केलेला सहसा कुणाला आवडत नाही. त्यातून उपदेश करणारी व्यक्ती प्रत्यक्ष मदत न करता नुसताच उपदेश करीत असेल, तर त्या व्यक्तीबद्दल मनातून चीडच येते. त्यातूनही एखाद्या सुजाण व्यक्तीला उपदेश केला तर त्याला फायदा होईल, पण मूर्खाला उपदेश करणे व्यर्थच आहे. पावसात भिजलेल्या माकडांना चिमण्या उपदेश करतात कि तुम्ही आमच्यासारखे आधीच घरटे का बांधून ठेवीत नाही, त्यावर चीड येऊन माकडे चिमण्यांची घरटी उध्वस्त करून टाकतात. संपूर्ण श्लोक असा आहे,
उपदेश आणि सल्ला ह्या लेखाचा Podcast ऐकण्यासाठी click करा.
"उपदेशो हि मूर्खाणां, प्रकोपाय न शांतये
पय:पानं भुजंगानां केवलं विषवर्धनम्"
म्हणजे उपदेश केल्याने मूर्ख माणसे शांत न होता त्यांचा कोपच वाढतो, जसे दूध पाजले तरी सापाचे विष वाढण्यास मदत होते. थोडक्यात काय तर दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांवर उपकार केला तरी ते दुष्टपणा सोडत नाहीत.
उपदेश करणे म्हणजे "अमुक एक काम असे कर किंवा तसे कर, आता कर किंवा नंतर कर, किंवा करूच नकोस " असे दुसऱ्यांना सांगणे. अगदी रोजच्या आपल्या जीवनात आईवडील मुलांना सांगतात, जास्त जागरण करू नकोस, पावसात जास्त वेळ भिजू नकोस, किंवा अरबट चरबट खाऊ नकोस. हे अगदी साधे साधे उपदेश झाले. शहाणी मुले असतील, तर ती चटकन ऐकतील. कारण त्यांना माहिती असते कि वडीलधारी मंडळी काहीतरी अनुभवातून हे सांगत असतात. पण काही मुले अशा उपदेशांमुळे आई बाबांवर चिडचिड करतील. काय हे, आम्हाला मनाप्रमाणे वागूही देत नाहीत म्हणून.
थोडी मोठी, वयात आलेली मुले असतील तर, "वेगात वाहन चालवू नकोस, रात्री उशिरापर्यंत बाहेर राहू नकोस, अमुक एखाद्याची संगत सोड", असाही उपदेश कधीतरी घरातील वडीलधाऱ्यांना करावाच लागतो. आता इथे सुद्धा काही गोष्टी केल्यानंतर परिणाम काय होणार आहेत हे त्यांना माहिती आहे म्हणून ते मुलांच्या प्रेमापोटी उपदेश करतात. बरेचदा मुलांना वाटते कि आपण आता मोठे झालोय, आणि मोठ्यांनी आता आपल्या कारभारात लुडबुड करू नये. पण होते काय कि हि मोठी मंडळी उपदेश केल्याशिवाय जगूच शकणार नाहीत. कारण त्यांच्याकडे अनुभवांची शिदोरी असते आणि त्याचा फायदा आपल्या मुलांना व्हायला हवा असे साहजिकच त्यांना वाटत असते. त्यामुळे त्यांनी केलेल्या उपदेशाने चिडून न जाता जेवढे शक्य होईल तेवढे उपदेशाचे पालन करावे. त्यात तुमचाच फायदा आहे. आमच्या पिढीला आईवडिलांनी केलेल्या उपदेशाची सवय होती. पण आज परिस्थिती बदलत चाललीय. प्रत्येक जण स्वत:ला हुशार आणि स्वावलंबी समजू लागलाय, त्यामुळे कोणी सांगितलेले आचरणात आणण्याची त्यांची मनोवृत्तीच नाही. त्यातही सगळ्या गोष्टी गूगल करण्याची सवय लागलेली असते. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आपल्या कडे आहेच अशी चुकीची भावना झालेली असते.
पण जर लहानांनी मोठ्यांचे ऐकायचेच नाही असे ठरवले तर अनुभवाने येणारे जे शहाणपण असते त्याचा उपयोग आपण कसा करणार? त्याचबरोबर मोठ्यांनी सुद्धा लक्षात ठेवायला हवे कि, "लालयेत पंचवर्षाणि, दशवर्षाणि ताडयेत, प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रं मित्रसमाचरेत्।।"
पाच वर्षाचे होईपर्यंतच मुलांचे लाड करावेत. त्यापुढे दहा वर्षे त्यांना योग्य वळण लावण्याचा प्रयत्न करावा, पण एकदा का मुलगा किंवा मुलगी १६ वर्षांचे झाले कि त्यांना मित्राप्रमाणे वागवावे. उपदेश करताना कुठे आपण मुलांना दुखावत तर नाही आहोत ना, याची खात्री करून घ्यायला हवी. नाहीतर ती मुले आपल्याला कायमची पारखी होतील, किंबहुना आपण त्यांच्या प्रेमाला, आदराला पारखे होऊ.
घरातील एक प्रसंग बघूया, सगळे टेबलाभोवती जेवायला बसलेले असताना सगळ्यांसमोर वडील मुलावर ओरडतात आणि त्याला सांगतात, "किती खाणार आहेस? बकासुर शिरलाय का तुझ्यात? नुसता खातो आणि बसतो, व्यायामाचे नाव नाही, वाढलेले वजन कमी व्हायला नको का?". आता यामागील उद्देश चांगला आहे. पण पद्धत योग्य नाही. त्यामुळे हा मुलगा मनातून दुखावल्या जातो, वडिलांच्या धाकामुळे उघडउघड काही बोलत नाही. पण तो स्वत:वर चिडतो, मनातल्या मनात कुढतो आणि आई वडीलांशी संवाद करणे टाळू लागतो, त्यांच्यासोबत जेवायला बसणे टाळतो. हाच उपदेश जर वडिलांनी योग्य प्रकारे केला किंवा शांतपणे उदाहरणातून दाखवला तर जास्त फायदा होईल. मग काय करायला हवे, कि फिटनेसशी संबंधित एखादी चांगली फिल्म बघावी, चांगल्या डायटेशियन कडून घरातील सगळ्यांचाच आहार व्यवस्थित लिहून घ्यावा, प्रमाण आणि पदार्थ दोन्हीही. घरातील सगळे काहीतरी चांगली गोष्ट करताहेत म्हटले कि आपोआप मुले अनुकरण करतील. हा कृतीतून उपदेश झाला..
आता आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा विचार करूया. बरेचदा आपण असेही बघतो कि काही माणसे सगळ्यांना उपदेशच करीत असतात. मग त्यांना कोणी काही सल्ला विचारला असो व नसो. हे देखील योग्य नाही. "The worst vice is Advice" असे म्हणतात ते उगाच नाही. मुळात लोक दुसऱ्याला उपदेश का करतात याची अनेक कारणे असू शकतात, जसे कुणावर तरी वर्चस्व गाजवण्याची इच्छा, कुणाशीतरी वाद करून येणारी मजा, किंवा खरोखर एखाद्याबद्दल आत्मीयता वाटते म्हणून करण्यात येणारा उपदेश. आपल्याला एखाद्या गोष्टीचा पुरेपूर अनुभव असेल, ज्ञान असेल तर नक्कीच उपदेश करावा पण जर तो ऐकल्याने समोरच्याचा फायदा होणार असेल तरच. अन्यथा शांत राहणेच योग्य. आता समोरचा शहाणा असेल, तर तो ऐकेल. नाहीतर पालथ्या घागरीवर पाणी. सध्या तर जो उठतो तो अमुक एक काढा घ्या, वाफ घ्या, हि औषधे घ्या, अमुकच व्हॅक्सिन घ्या असे सल्ले पण देऊ लागलाय. आता हा उपदेश आपल्या डॉक्टर ने केला तर ठीक आहे. किंवा आपण विचारल्यानंतर कुणी सांगितले तरी ठीक आहे.
बरेचदा आपण आपल्या मित्रमैत्रिणींना सल्ला विचारतो, किंवा एखाद्या निर्णयाप्रत येण्यासाठी बऱ्याच लोकांचा सल्ला घेतो. अशावेळी केलेला उपदेश हा स्वागतार्ह असतो. पण आपल्याला नको असताना कुणी उपदेश करू लागले तर आपल्याला ते आपली निंदा करताहेत, आपल्याला कमी लेखताहेत अशी भावना निर्माण होऊ शकते. बरेचदा अशा उपदेशाचा मानसिक त्रास होतो आणि नकळत आपण अशा लोकांना टाळू लागतो. एखाद्या व्यक्तीची ऐपत नसेल तरी तिला तू घरात AC का बसवत नाहीस, किंवा एखादा कम्प्युटर का घेत नाहीस असे सल्ले उगाचच देऊ नयेत. कारण त्यांनी तुम्हाला "मी काय करू" हे विचारले नाहीये. कधी आपण केलेला उपदेश जर कुणी पाळला नाही, तर आमचे ऐकले नाही म्हणून असे झाले, असे जर आपण म्हटले तर परिस्थिती आणखीच बिघडेल. खरेतर आपण काही मदत करू शकणार असलो, तरच कुणाला उपदेश करायला पुढे यावे.
उपदेश करणारे दोन प्रकारचे असतात, एक ज्यांना खरोखर आपल्याबद्दल काहीतरी वाटते ते लोक, किंवा आपल्याला संकटात टाकण्यासाठी किंवा आपले वाईट झालेले बघून आनंदित होणारे लोक. या दोघांमध्ये आपल्याला फरक करता यायला हवा. कुणीतरी केलेला उपदेश आंधळेपणाने पाळणे हे देखील बरोबर नाही. बरेचदा आपण म्हणतो "ऐकावे जनांचे, करावे मनाचे". याचा अर्थ समजून घ्यावा. अगदी लहान वयात समज येण्यापूर्वी कदाचित आपल्याला असे करता येणार नाही. पण एकदा का आपल्याला चांगले काय वाईट काय याची समज आली, कि मित्र कोण आणि शत्रू कोण हे सहज समजू लागते. त्यामुळे सगळ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे, त्यावर विचार करून स्वतःचा निर्णय घ्यावा. संत कबीर म्हणतात त्याप्रमाणे
"कहते को कही जान दे, गुरु की सीख तू लेय।
साकट जन औश्वान को, फेरि जवाब न देय।
लोकांना वाटेल ते बोलू द्यावे, उपदेश मात्र गुरूचा मानावा. दुष्ट लोक आणि भुंकणारे कुत्रे याना उलटून उत्तर देऊ नये.
महाभारतातील युद्धाच्या वेळेस अर्जुन त्याचा क्षात्रधर्म विसरला होता, तेव्हा त्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी भगवान कृष्णांनी भगवद्गीतेच्या माध्यमातून उपदेश केला. अर्जुन हा जगातील सगळ्यात मोठा भक्त. कृष्णावर त्याची अपरंपार श्रद्धा आणि प्रेम होते. तरीही त्याने आपल्या मनातील सगळ्या शंकांचे निरसन करून घेतले. प्रत्यक्ष भगवंतच ते. त्यामुळे त्यांनी केलेला उपदेश हा अर्जुनासाठी योग्यच होता. कृष्ण त्या युद्धात अर्जुनाचे सारथ्य करीत होता. त्या दोघांचे नाते तेवढे प्रगल्भ होते. म्हणूनच कृष्णाने उपदेश केला आणि तो अर्जुनाने शिरसावंद्य मानला. एक गमतीदार पण विचार करायला लावणारी गोष्ट आठवते. एकदा एक श्रीमंत माणूस हवापालटासाठी एका निसर्गरम्य ठिकाणी, शहराच्या गजबजाटापासून दूर फिरायला जातो. तेथे त्याला एक छोटीशी नाव चालवणारा नावाडी भेटतो. श्रीमंत माणूस नावाड्याला विचारतो, "तुला माझ्यासारखे श्रीमंत व्हावे असे वाटते का?, नावाडी विचारतो, "श्रीमंत होऊन मी काय करू?" प्रवासी म्हणतो, "शहरात चांगला बंगला बांध, मोटार घे", नावाडी म्हणतो, "पुढे काय करू?", प्रवासी उत्तरतो, "मग अधून मधून माझ्यासारखे हवापालटाला जात जा". यावर नावाडी मंदसे हसतो आणि म्हणतो, "साहेब, हेच तर करतोय ना मी". इथे नावाड्याला श्रीमंतांच्या उपदेशाची काहीच गरज नव्हती, आणि त्याने सल्ला पण विचारला नव्हता, पण हे महाशय स्वतःला अति हुशार समजत होते. पण नावाडी शहाणा होता. त्याला उपदेशाची गरज नव्हती. त्यामुळे त्याने नम्रपणे हा उपदेश परतवून लावला. पण जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचे ज्ञान नसते, आणि आपल्यापेक्षा कुणी जाणकार व्यक्ती आपल्या समोर असते, तेव्हा त्या व्यक्तीच्या ज्ञानाचा फायदा करून घ्यायला हवा. अकबर बादशाह नेहमी बिरबलाचा सल्ला घेत असे, कारण त्याला पूर्ण खात्री होती, कि बिरबल हा अतिशय चतुर आहे, आणि राज्यावर येणाऱ्या मोठ्यात मोठया संकटातून सुद्धा तो चातुर्याने आपली सुटका करू शकतो. समर्थ रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांना राजकारणातील खूप मोलाचे सल्ले दिले. ते राजांचे गुरु होते. ते संत कवी असले तरी तत्कालीन राजकारण आणि डावपेच त्यांना अवगत होते. त्यांनी सामान्य माणसाला संसारात योग्य वाट दाखवण्यासाठी "मनाचे श्लोक" आणि "दासबोध" लिहून ठेवले. जे आजही संसारात कसे वागावे याबद्दल आपल्याला मार्गदर्शन करतात. समर्थ रामदासांची एक प्रसिद्ध गोष्ट आहे. एका स्त्रीला खूप अहंकार होता कि मी रोज या गोसवड्याला, म्हणजे समर्थांना जेवण वाढते, त्या बदल्यात त्याने मला उपदेश करावा. समर्थानी तिला उपदेश बघा किती मार्मिकपणे केला. ते भिक्षेसाठी घाणीने भरलेला कटोरा घेऊन गेले. ती म्हणाली हा कटोरा धुवून आणा म्हणजे मला भिक्षा वाढता येईल. तेव्हा नम्रपणे समर्थ म्हणाले, कि बाई तुमच्या मनातील अहंकार तुम्ही धुवून काढा म्हणजे मी तुम्हाला काही उपदेश करू शकेन. ते ऐकून त्या बाईंच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले. आता ती केलेला उपदेश समजून घेण्यास योग्य झाली होती. उपदेश करणारा आणि उपदेशाची आवश्यकता असलेला या दोघानांही या सुभाषितातून धडा मिळतो. उपदेश करणाऱ्याने आपली योग्यता आणि समोरच्याची गरज बघूनच उपदेश करावा. तसेच समोरच्या व्यक्तीमध्ये तेवढी प्रगल्भता आहे कि नाही हे देखील बघूनच उपदेश करावा. ज्याला उपदेशाची गरज आहे त्याने त्याला मिळणारा उपदेश योग्य आहे कि नाही याची खात्री करून तो अमलात आणावा.
Listen Our Podcast on Your Favorite Platform: Spotify | Google Podcast | Gaana | Saavn | Anchor Follow Us on Social Media Platforms: LinkedIn | Instagram | Facebook