top of page
Search

वसंत येई घरा...

माझी आई आम्हाला तिच्या लहानपणच्या गोष्टी सांगत असे. तिचे कुटुंब मोठे होते. तिचे एक काका सुप्रसिद्ध कवी, तर एक काका नेताजी सुभाषचंद्र बोसांबरोबर आझाद हिंद सैन्यात होते. अशा अनेक गोष्टींमुळे तिच्याकडे सांगण्यास खूप काही असायचे. पण नोकरीमुळे ती सतत कामात असायची, त्यामुळे तिला जास्त वेळ मिळत नसे. तरी उन्हाळ्याची सुटी सुरू झाली, की आम्ही भावंडे तिला गळ घालून गोष्ट सांगण्यास भाग पाडत असू.

तिच्या आजीबद्दल बोलताना ती सांगायची की आजी खूप छान कविता करायची. एक प्रसंग असा होता, की तिचे काका युद्धावर गेले असताना, वार्‍याने दार हलले की आजीला सतत ते परत आल्याचा भास होत असे. त्यावर तिने काही लिहिले होते. पण ते कुणाच्या स्मरणात राहिले नाही. हा प्रसंग का कोण जाणे मनावर कोरला गेला आणि कवितेच्या रूपात प्रकट झाला...


माघामधला बेभान वारा, का हलवी माझ्या दारा..

सीमेवरी जीव माझा, येई परी ना घरा||१||


वाट पाहूनी थकले, रात्र अन दिन

त्याच्या विना झुरते सदा, उदास हे मन||२||


वैशाख वणवा कधी

जसा, दाह देई राना

अंतरीची आस बाई, पोळी माझ्या मना||३||

श्रावणाची ओली सर, लपवी न माझी भिजली नजर

त्याच्या ओल्या आठवाने, माझ्या जीवा लागे घोर||४||


येता शरदाची चाहूल, मन माझे वेडेपिसे

व्याकुळ करिती मना, चांदण्यांचेकवडसे||५ ||


शिशिराची पानगळ, माझ्या मनी खळबळ

काही केल्या थांबे ना, ही अंतरीची तळमळ ||६||


दिस येती दिस जाती,

स्थिरावली माझी दिठी

किती मनाने झुरावे,

एका सांगाव्याच्या साठी||७ ||

परत आल्यानंतर


देवपण देव्हाऱ्याला, येता वीर माझा घरा

जणु युगांनी खुले ग घरादाराचा चेहरा||८||


हसे दारीची रांगोळी, मोहरल्या जाईजुई

कानाकोपरा घराचा नाचतो ग थुईथुई ||९||


जणु फाटके जुनेर शोभे चंद्रकळेवाणी

घास मुखीचा ग आज आनंदाने गाई गाणी ||१०||


सारे मास सारे ॠतू छळूनी मना गेले जरी,

येई वसंत हासरा, संगती गं त्याच्या परी॥११॥


थोर त्याच्या कर्तव्याने, उर भरे अभिमानी

मनी भरून पावले धन्य जनक जननी ||१२||


- डॉ.अंजली देशपांडे

१५ ऑगस्ट २०२०


bottom of page