top of page
Search

‘बहुआयामी’ लोकमान्य

सदर लेख १ ऑगस्ट २०२० ला 'तरुणभारत' या वृत्तपत्रात प्रसिद्ध झाला आहे.


आज १ ऑगस्ट २०२० म्हणजे १०० वर्षांपुर्वी आजच्याच दिवशी एका थोर क्रांतिकारकाला, लोकनेत्याला, तत्ववेत्याला आपण दुरावलो. पण असे जरी असले तरी ते जाताना मागे इतके काही ठेउन गेले की, आजही आपण त्या प्रेरणादायी गोष्टी विसरू शकत नाही. असे थोर महापुरुष म्हणजे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. यांची आज शंभरावी पुण्यतिथी. लोकमान्य टिळक म्हटले की, एक पगडी, भारतीय पद्धतीचा पोशाख आणि हातात काठी अशी काहीशी भारदस्त मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते. टिळक म्हटले की पहिले वाक्य आठवते ते म्हणजे, ‘मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही’. तसेच, ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ आणि ‘असंतोषाचे जनक’.

पण खरेच लोकमान्यांना काय फक्त येवढ्यावरूनच लोकमान्य म्हटले जात होते का? किंवा लोकमान्य टिळक म्हणजे इतकेच का? तर नक्कीच नाही. याचे कारण आहे ते म्हणजे, लोकमान्यांची दूरदृष्टी, खरेच लोकांनी निवडलेले लोकनेते आणि महत्वाचे म्हणजे राजकारणी असून देखील असलेलं प्रकांड पांडित्य आणि सतत अभ्यासत राहण्याची वृत्ती. हे गुण आजकाल राजकारणात आपल्याला खूप कमी दिसतात तो भाग वेगळाच.लोकमान्य टिळक आणि आगरकर हे अगदी घनिष्ट मित्र. दोघांनी मिळून २ जानेवारी आणि ४ जानेवारी १८८१ साली ‘मराठा’ हे इंग्रजी आणि ‘केसरी’ हे मराठी वृत्तपत्र चालू केले. राजकीय आणि सामाजिक सुधारणा यांमध्ये कोणाला प्राधान्य द्यायचे यावरून या दोघांमधील वाद तसेच जग-जाहीरच होते. १८९३ साली गणेश उत्सव आणि १८९६ साली रायगडावर शिवजयंती तसेच शिव राज्याभिषेक हे सार्वजनिक सोहळे त्यांनी चालू केले. पण सार्वजनिक सोहळ्यांमध्ये अग्रणी असणारे लोकमान्य जेंव्हा १८९६ साली मोठा दुष्काळ पडला व त्यानंतर लगेचच आलेल्या भयानक प्लेगच्या साथीमध्ये देखील लोकांना आपल्या न्याय हक्कांची जाणीव करून देण्यात आणि कित्येक ठिकाणी अक्षरशः स्वतः काम करण्यात देखील ते तितकेच पुढे होते. त्यात, मलाच प्लेग झाला तर काय करू, जाऊदे त्यापेक्षा घरी बसून आपण आपले लिखाणाचेच काम करू. असा विचार कधी त्यांच्या मनाला शिवला देखील नसेल.

‘या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ आणि ‘राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे’ अशा प्रखर, निर्धारी आणि धारदार शब्दात इतक्या वर्षात ब्रिटिश सरकारवर अशी टीका करण्याचे धाडस कोणीही केले नव्हते. ते टिळकांनी करून दाखवले. मग तेव्हा सत्ताधाऱ्यांचा आपल्यावर रोष तर येणार नाही ना, आपल्या सरकारी सवलती बंद तर होणार नाहीत ना? हा विचारच नव्हता.

गणेश खिंडीमध्ये वॉल्टर रँड या जुलमी इंग्रज अधिकाऱ्याचा वध करणाऱ्या चापेकर बंधूंचे प्रेरणा स्थान देखील लोकमान्यच होते. याच आरोपात त्यांना २७ जुलै १८९७ रोजी मुंबई येथे अटक देखील झाली. पण आपण सुटावे म्हणून कोणतीही तडजोड करणे हे लोकमान्यांच्या तत्वातच नव्हते.

असे म्हटले जाते की धोरणी आणि धीट हे दोन्ही गुण सहसा एकत्र बघायला मिळत नाहीत. पण लोकमान्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे या दोघांचा एक प्रीतिसंगमच होता जणू. यामुळेच लोकमान्यांचा त्याकाळी लोकांवर इतका प्रभाव होता की, नंतर कट्टरवादी म्हणून ओळखले जाणारे बॅरिस्टर महंमदअली जीना यांनी देखील एकेकाळी स्वतः टिळकांसाठी हायकोर्टामध्ये खटला लढवला होता.

पण तसे पाहायला गेले तर राजकारणापेक्षाही टिळकांची मूळ वृत्ती ही संशोधकाची. कोणतीही गोष्ट वर-वर न करता त्याच्या मुळाशी जाऊन त्याचा स्वतः शोध घेण्याची त्यांची वृत्ती. यातूनच त्यांनी येरवड्यात कैदेत असताना ‘ओरायन’ हा भारतीय तत्वज्ञानावरील ग्रंथ लिहिला. त्यांचा हा ग्रंथ वाचून जर्मन तत्ववेत्ता मॅक्समुलर चांगलाच प्रेरित झाला होता. तसेच त्यांनी आर्यांच्या मूळ स्थानाविषयी ‘The Arctic Home In The Vedas’ हा संशोधनात्मक ग्रंथ लिहिला.

नंतर एका खटल्यात टिळकांना सहा वर्षांची मंडालेच्या काळ्या पाण्याची शिक्षा झाली. या विरोधात गिरणी कामगारांनी सहा दिवस संप केला होता. एखाद्या राजकीय नेत्यासाठी कामगारांनी संप करण्याचा हा पहिलाच प्रकार.

या मंडालेच्या काळ्या पाण्याच्या कारावासात त्यांनी भगवद्गीतेतील कर्मयोगावर भाष्य करणारा ‘गीतारहस्य’ हा अत्यंत अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला. पुढे मंडालेला जिथे टिळकांना ठेवण्यात आले होते, तिथेच सुभाषचंद्र बोस यांनाही ठेवण्यात आले होते. त्यावेळी सुभाषचंद्र म्हणाले होते की, ‘या अशा भयानक आणि घाणेरड्या वातावरणामध्ये टिळकांनी ‘गीतारहस्य’ यासारखा ग्रंथ लिहिला तरी कसा याचेच मला आश्चर्य वाटते.’

टिळक मंडालेला असताना १९१२ साली त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर १९१४ साली सुटका होऊन जेव्हा टिळक घरी परतले तेव्हा इतका कणखर माणूस देखील आपल्या पत्नीच्या आठवणीने गहिवरून गेला होता.

त्या काळात टिळक म्हणजे पुणे आणि पुणे म्हणजे टिळक हे समीकरण होते आणि याचा प्रत्यय आला तो म्हणजे १७ जून १९१४ ला जेव्हा टिळक मंडालेहून परतले. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी किंवा फक्त त्यांचे दर्शन घेण्यासाठी मध्यरात्री हजारो लोक त्यांच्या वाड्याबाहेर जमले होते. असे असूनही त्यांच्या साठीच्या निमित्ताने पुण्यात झालेल्या कार्यक्रमामध्ये ते म्हणाले, ‘माझ्यासारख्या माणसाने केलेल्या य:कश्चित कामगिरीने आपण तृप्त होऊ नका. आज आपणा सर्वांपुढे जे राष्ट्रीय कार्य आहे ते इतके मोठे, इतके व्यापक आणि इतके जरुरीचे आहे की, त्याला आपण सर्वांनी माझ्यापेक्षा कितीतरी अधिक पट निश्चयाने आणि स्फूर्तीने लागले पाहिजे. आपली मातृभूमी आपणा सर्वांना या उद्योगाला लागण्याबाबत आवाहन करीत आहे. मातृभूमीच्या या अपेक्षेकडे लक्ष देऊन, कोणताही भेदभाव मनात न ठेवता आपण सर्वजण ‘राष्ट्रदेव’ होऊया.’ गीतेतील कर्मयोगावर टिळकांनी फक्त ‘गीतारहस्य’ हा ग्रंथच लिहला नव्हता तर त्यातील ‘कर्मण्ये वाधिकारस्ते…’ प्रमाणे स्थितप्रज्ञताही स्वतः आत्मसाद केली होती.

टिळकांनी लंडनमध्ये जाऊन साम्राज्यवादाच्या विरोधात असलेल्या पक्षाच्या लोकांना भेटून क्रांतीचे बरेच कार्य केले होते. अशाच एका इंग्रज मंत्र्यांनी याबाबत लिहले आहे की, ‘कोणत्याही प्रकारच्या दडपणामुळे किंवा कसल्याही प्रकारच्या अमिषामुळे आम्हाला वश न होणारे एकच भारतीय गृहस्थ आहेत आणि ते म्हणजे टिळक. इतरांना आम्ही काही प्रमाणात तरी आमच्या कडे वळवू शकतो.’

टिळकांच्या व्यक्तिमत्त्वाचा आपल्यातल्या अनके जणांना माहित नसलेला आणखी एक पैलू म्हणजे त्यांचे अर्थ विषयक विचार. टिळक हे जाणून होते की राजकारण आणि अर्थकारण हे वेगळे नाही. जेथे राजकारण आहे तिथे अर्थकारण असणारच आणि अर्थकारण आले की राजकारण आपसूकच आले. त्यामुळे पोलिटिकल इकॉनॉमी (Political Economy) हे शब्द त्यांनी प्रथम वापरले. तसेच टिळकांनी चलनाचे महत्त्व प्रतिपादित करणारे अनेक लेख त्या काळात लिहिले.

एवढेच नाही तर भारतीय कंपन्यांनी जॉइंट स्टॉक कंपनी (Joint Stock Company) म्हणजे अनेकांनी एकत्र येऊन आपले थोडे-थोडे भांडवल टाकून एक कंपनी स्थापन करावी हा विचार आजच्या काळात जरी प्रचलित असला, तरी त्या काळात हे विधान अत्यंत दूरदृष्टीचे होते. यासाठीच त्यांनी ‘इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया’ ही संस्था स्थापन केली होती. तसेच या संस्थेमार्फत त्यांनी पुण्यामध्ये ‘औद्योगिक परिषद’ देखील घेतली होती.

आज आपण सगळीकडे ऐकतो की, लघु आणि मध्यम उद्योगांना चालना मिळाली तरच देश पुढे जाऊ शकतो. पण हे टिळकांनी कित्येक वर्षांपूर्वीच हे विषद केले होते. तसेच ‘महाराष्ट्रासाठी साखरेचे महत्व’ ह्या शीर्षकाचा लेखही त्यांनी लिहिला होता.

शेती हा देशाचा आणि अर्थकारणाचा कणा आहे असे त्यांचे स्पष्ट मत होते. थोडक्यात ते देशातील पहिले Agro-Economist होते. शेतीचे अर्थशास्त्र या विषयावर त्यांनी बराच उहापोह केला होता. एके ठिकाणी याबद्दल लिहिताना ते असे म्हणतात, ‘शेतकऱ्यांच्या दैन्यावस्था याचे मूळ कारण सावकारांचा जुलूम नसून, तो सरकारचा नाकर्तेपणा आहे.’ आज १०० वर्षानी देखील या विधानाची सत्यता काय हे वेगळे सांगण्याची काहीच गरज नाही.

‘ऐपतीप्रमाणे कर रचना असायला हवी’ असेही त्यांनी प्रतिपादन केले होते.’ मार्क्स आणि लेनिन यांच्या Benevolent Democracy म्हणजे कल्याणकारी हुकूमशाही वर टीका करताना ते म्हणतात, ‘कल्याणकारी हुकूमशाही कधीही अस्तित्वात नसते.’ याचा प्रत्येय १९९१ साली सोव्हिएत युनियन च्या विघटीकरणानंतर आलाच. तसेच, ‘भारतीय उद्योगाला परकीय भांडवलाची गरज आहे’ हे लोकमान्यांचे विधान आपल्याला शेवटी १९९१ साली नाईलाजाने का होईना पण पटले.

त्यामुळे लोकमान्य टिळक हे काही फक्त ‘असंतोषाचे जनक’ किंवा फक्त एक ‘स्वातंत्र्यसेनानी’ नव्हे तर ते एक खरेच दूरदृष्टीचे लोकनेते, एक संशोधक व लेखक, गणिती, खगोलशास्त्रचे अभ्यासक, पंचांगकर्ते आणि अर्थतत्ज्ञ देखील होते. अशा या लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांच्या आचार, विचार आणि तत्वज्ञानाची त्यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्त परत एकदा उजळणी करण्याची गरज आहे. हीच आपली त्यांना आदरांजली.

  • अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी

apoorvskulkarni.blogspot.combottom of page