top of page
Search

सावरकर एक विचारधारा - ‘एमडेन’ कधी येणार ? अर्थात भाग 8

सावरकर एक विचारधारा : कोलूचे यातनाकांड अर्थात भाग 7 वाचण्यासाठी येथे click करा.

मागील भागामध्ये आपण पाहिले की, सावरकरांचे अंदमानच्या सेल्युलर जेल मध्ये प्रचंड हाल केले जात होते. त्याविरुद्ध त्यांनी स्वतःसाठीच नव्हे तर इतर कैद्यांसाठी देखील अंदमान मध्ये बंड पुकारले. याचा परिणाम म्हणून त्याकाळचे भारताचे गृहमंत्री क्रॉडॉक यांनी खुद्द अंदमानला येऊन सावरकरांना भेटून समझोता केला होता.

अंदमानातील इतक्या हालअपेष्टा नंतरही सावरकरांच्या मनातील देशप्रेम किंचितही कमी झाले नव्हते. कारण मुळात ‘ की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने’ या वाक्याप्रमाणेच सावरकरांना या कार्यात पडण्याआधीच या साऱ्याची कल्पना होती. हे देश कार्याचे व्रत हे त्यांनी अंधतेने स्विकारले नव्हते . या यज्ञात त्यांनी स्वतःला पुरते झोकून दिले होते.पहिले महायुद्ध सुरू झाले आणि अंदमानमध्ये ‘एमडेन’ हा शब्द चांगलाच गाजू लागला. पण हे ‘एमडेन’ नक्की प्रकरण तरी काय आहे? तर, चंपकरमण पिल्ले हे सावरकरांचे ‘अभिनव भारत’ मधील एक सहकारी महायुद्ध सुरू होण्याच्या आधीच जर्मनीला गेला व तेथे राहून जर्मन व त्यातल्याही काही वरिष्ठ नौदल अधिकाऱ्यांशी बोलणी चालवली होती व त्यांना सांगितले की, ‘या वेळेस तुम्हाला जर हिंदुस्तान मध्ये मोठा क्रांतिकारी उठाव घडवून आणायचा असेल तर त्यासाठी सावरकरांचे मुक्त होणे अत्यंत गरजेचे आहे’. त्यासाठी म्हणूनच ‘एमडेन’ ही जर्मन युद्धनौका सावरकरांची सुटका करण्यासाठी बंगालच्या उपसागरामध्ये आली होती. पण ब्रिटिश सैनिकांनी ती अंदमानच्या जवळच समुद्रात बुडवली. त्यामुळे आणखी एक क्रांतिकारी प्रयत्न फसला.

त्यानंतर काहीच काळात लाहोरमध्ये शीख सैनिकांनी उठाव केला म्हणून त्यांच्या संपूर्ण पलटणीला अंदमानच्या काळ्यापाण्याच्या शिक्षेसाठी पाठवण्यात आले होते. त्यात आलेले सैनिक आल्या-आल्या सावरकरांचे दर्शन घेत होते आणि त्यांना सांगत होते की, तुमचा ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ ग्रंथ वाचूनच आम्हाला उठाव करण्याचे मनोबल लाभले आणि आम्ही उठाव करून उठलो. आपल्या पुस्तकाने एवढा तरी फरक पडावा याचा सावरकरांना मनोमन आनंद वाटला.

आता १९१६ साल उजाडत आले होते. अंदमानातील अत्यंत निकृष्ट जेवणाने व वागणुकीने सावरकरांच्या तब्येतीवर चांगलाच आघात केला होता. त्यांच्या शरीरातून सतत रक्त पडत असे, जेवण पचत नसे. अंगात ताप मुरत जात होता. पोळी खाता येईना म्हणून फक्त भात वरण चालू केले. पण नंतर तेही पचत नाही म्हणून तर फक्त भात आणि पाणी यावरच जेवण उरकू लागले.

अखेर ३० मे १९१९ साली सावरकर परिवाराला अंदमानात या दोघांना भेटण्याची परवानगी मिळाली. या दोघांना भेटायला सावरकरांची पत्नी येसूबाई, धाकटे भाऊ नारायणराव आणि त्यांच्या पत्नी असे तिघे आले होते. पण या साऱ्यांत येसू वाहिनी मात्र सावरकरांना कुठे दिसत नव्हत्या. त्यांनी तसे विचारल्यावर नारायणराव म्हणाले, ‘आम्हाला अंदमानला येण्याची परवानगी मिळण्याच्या बरोबर एक दिवस आधी येसू वाहिनी गेल्या’. हे ऐकता सावरकर बंधूंच्या अंगावर दुःखाचा डोंगरचं कोसळला. गणेशरावांनी आपली अर्धांगिनी गमावली होती तर विनायकाने आपली आईसमान वाहिनी, मैत्रीण.

पण आता अक्षरशः १५ वर्षांनी हे तीनही भाऊ एकत्र भेटत होते. एकत्र एकमेकांना पहात होते. पण तेथेही मनमोकळ्या अश्या गप्पा करणे शक्य नव्हते. कारण, इंग्रज सार्जंट तेथेच ठाण मांडून बसला होता. पण ही मात्र अतिशय ह्रदय द्रावक होती.

१९२० साली काँग्रेसच्या कार्यकारणीमध्ये सावरकर बंधूंची त्वरित बिनशर्त मुक्तता करण्या संबंधीचा ठराव मंजूर केला गेला व सरकारकडे असा तगादा लावण्यात आला. याचाच परिणाम म्हणून सावरकरांच्या हातातील दोरखंड सुटले आणि ९ वर्षात प्रथमच त्यांना कारकुनीचे काम देण्यात आले. पण आता भारतातील सावरकरांना सोडण्याच्या मागणीचा जोर वाढत चालला होता. यापुढे सावरकरांना अंदमानमध्ये ठेवणे सरकारला जड जाऊ लागल्यामुळे २ मे १९२१ रोजी सावरकर बंधुंना अंदमानातून हलवण्यात आले. त्यांना अंदमानातून निरोप द्यायला रस्त्याच्या दुतर्फा लोक जमले होते. अनेकजण चाफ्याच्या फुलांचे हार हातात घेउन उभे होते याबद्दल त्यांना इंग्रज शिपायांचा मार देखील खायला लागत होता. पण तरीही हे सर्व सावरकर बंधूंच्या गळ्यात हे हार घालत होते. कारण या क्षणी कोणालाही इंग्रज शिपायांची परवा नव्हती, आपल्या सावरकर बंधुंना निरोप देणे या सर्वांना महत्त्वाचे वाटत होते.

परत नेण्याकरिता सावरकर बंधुंना त्याच ‘महाराजा’ बोटीने अंदमानातून कलकत्याला आणले गेले. कित्येक वर्षानंतर दोन भाऊ इतका वेळ एकमेकांजवळ होते. लंडन आणि नाशिकमध्ये या काळात काय-काय झाले याबद्दल दोघांच्या भरपूर गप्पा झाल्या. कलकत्त्याहून दोघांना अलीपूरच्या तुरुंगामध्ये नेण्यात आले. इथे मात्र परत दोघा भावांचे रस्ते वेगळे झाले. इथून पुढे विनायक सावरकरांना रेल्वेने मुंबई आणि तेथून बोटीने रत्नागिरीला नेण्यात आले. पण गणेश सावरकरांना कोठे व कसे देण्यात आले त्याबद्दल मात्र विनायकाला काहीही कळू शकले नव्हते.

रत्नागिरीच्या तुरूंगामध्येही त्यांच्यासाठी तुरुंगाचा एक संपूर्ण भाग रिकामा करण्यात आला होता. म्हणजे येथेही ‘मार्सेलिस’ च आडवे आले. रत्नागिरीच्याच तुरुंगामध्ये सावरकरांनी ‘माझी जन्मठेप’ हा ग्रंथ लिहायला घेतला. येथेही कागद-पेन मिळण्याचा संभव नव्हताच. तर त्यांनी लाल विटेने भिंतीवर जिवंतपणीचा हा नरकवास एका कादंबरीच्या स्वरूपामध्ये शब्दबद्ध करायला सुरुवात झाली. पण यानंतर सावरकरांच्या सुटकेच्या मागणीचा जोर भारतामध्ये खूपच वाढू लागला होता. त्यामुळे सावरकरांना आता तुरुंगात ठेवणे ही सरकारला अवघड जायला लागले.म्हणूनच त्यांना रत्नागिरीहून पुण्याच्या येरवड्याच्या तुरुंगात हलवण्यात आले. तेथे काही दिवस राहिल्यानंतर सरकारने त्यांच्यासमोर एक प्रस्ताव ठेवला की, ‘तुम्ही पाच वर्षे राजकारणात सहभाग घेणार नाही आणि रत्नागिरी जिल्हा सोडणार नाही असे जर आम्हाला लिहून देत असाल तर आम्ही तुमची सुटका करतो’. नाहीतरी तुरुंगात राहून आयुष्य वाया घालवण्यापेक्षा बाहेर राहून निदान राजकारण नाही पण समाजकारण तरी करता येईल असा विचार करून सावरकरांनी हा प्रस्ताव मान्य केला आणि अखेर ६ जानेवारी १९२४ रोजी सावरकर या साखळदंडातुन आणि त्या काळकोठडीतून बाहेर पडले. पण ते काही कायमचे नव्हते, त्यांना नंतर देखील इकडे बरेचदा यावे लागणार होते. २५ फेब्रुवारी १९११ मिळालेली काळकोठडीची साथ अखेर संपला. अक्षरश १८ वर्षांनी सर्व सावरकर परिवार एकत्र आला होता, पण कमी फक्त एकच होती ती म्हणजे येसूवहिनींची.

आपणाला हा प्रश्न पडू शकतो की एखाद्याने आपल्या आयुष्यातील उमेदीची १८ वर्षे राष्ट्रकार्यासाठी म्हणून कारावासात का घालवावी? आणि त्यांना असे काय बळ मिळाले की हा नरकवासही ते सहन करू शकले. तर,

मूल्य म्हणुनि मृत्यूच्या यातनाहि की

समजुनि कर्तव्य सहू सिद्ध असेचीया

या सावरकरांच्याच कवितेप्रमाणे त्यांचे आयुष्य होते. सावरकर रत्‍नागिरीत स्थानबद्द झाले. आता आपल्याला राजकारणात उघडपणे सहभाग घेता येत नाही म्हटल्यावर त्यांनी आपले सारे लक्ष समाजकारण वळवले आणि तेथेही समाज क्रांती घडवून आणली.

त्यांच्या याच समाज क्रांतीच्या गोष्टी आणि त्यांचे कार्य आपण पुढील लेखामध्ये पाहू.


- अपूर्व श्रीनिवास कुलकर्णी


सावरकर एक विचारधारा : राजकारण नाही तर समाजकारण अर्थात भाग 9 वाचण्यासाठी येथे click करा.

bottom of page